शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA ची मोठी योजना! लंडनमधील ‘ही’ कंपनी ५२५ कोटींना करणार खरेदी; EV क्षेत्रात आणणार क्रांती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 8:23 PM

1 / 15
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर असून, त्यात दिवसागणिक आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता देशातील ग्राहक पर्यायी इंधनाकडे वळताना दिसत आहे. आताच्या घडीला जगभरातील कंपन्यांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे.
2 / 15
सध्या भारतात इलेक्ट्रिक कार क्षेत्रात TATA आपला दबदबा राखून आहे. टाटा मोटर्सच्या नेक्सॉन आणि टिगॉर या इलेक्ट्रिक कार अल्पावधीत लोकप्रिय झाल्या आहेत. तसेच आगामी काळात अल्ट्रोझ आणि पंच या कारही इलेक्ट्रिक स्वरुपात सादर करण्याचा टाटाचा मानस असल्याचे सांगितले जात आहे.
3 / 15
भारत सरकारकडूनही इलेक्ट्रिक कार आणि टू व्हिलरला प्रोत्साहन देत आहे. मात्र, सेमीकंडक्टर चीपचा मोठा तुटवडा आणि इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये पायाभूत सुविधांचा असलेला अभाव यामुळे काही मर्यादा येत आहेत. यावर तोडगा म्हणून TATA ने एक मेगा प्लान आखला आहे.
4 / 15
TATA ग्रुपने लंडन येथील जॉनसन मॅथे हा बॅटरी लिथियमचा ब्रँड खरेदी करण्यासाठी रणनीती आखली आहे. ही कंपनी खरेदी करण्याच्या स्पर्धेत TATA समूह पुढे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीचा खरेदी करार ५२५ कोटी रुपयांमध्ये केला जाऊ शकतो.
5 / 15
लंडन येथील जॉनसन मॅथे ही कंपनी बॅटरी मटेरियल्स आणि सोल्यूशन्स क्षेत्रात जगभरात आघाडीवर आहे. TATA मोटर्स आपल्या इलेक्ट्रिक सेगमेंटच्या सेवा विस्तारासाठी ही कंपनी खरेदी करणार आहे. तसेच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपल्या स्पर्धकांपासून लाभ मिळवण्याचीही टाटाची योजना आहे.
6 / 15
भारतीय इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये वर्चस्व असलेल्या Tata Motors च्या दृष्टीने ही डील महत्त्वाची मानली जात आहे. तसेच पुढील योजनांसाठीही अनुकूल ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. टाटा केमिकल्स आणि जॉनसन मॅथे यांच्यात बोलणी सुरू झाली आहे.
7 / 15
जॉनसन मॅथे कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर रोजी बॅटरी सामग्रीच्या व्यवसायासाठी खरेदीदार शोधण्यास सुरुवात केली आहे. अनेक कंपन्यांशी आम्ही चर्चा करत आहोत. मात्र, यावर कोणत्याही प्रकारची टिपण्णी देणे घाईचे ठरेल, असे प्रवक्त्यांनी सांगितले.
8 / 15
आताच्या घडीला लिथियम बॅटरी तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक गोष्टींमध्ये चीनचे वर्चस्व आहे. तसेच सेमीकंडक्टर क्षेत्रातही चीनची मक्तेदारी आहे. याच क्षेत्रात आता TATA ने उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
9 / 15
TATA ग्रुपने मोठी योजना आखली असून, देशातील तीन राज्यांमध्ये सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्प उभारण्यावर मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, टाटा समूह यासाठी २२५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
10 / 15
TATA ग्रुपची आउटसोर्स्ड सेमीकडंक्टर असेंबली प्रकल्पासाठी तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांशी चर्चा सुरू आहे. तसेच या राज्यांमध्ये जमीन अधिग्रहणाबाबतही बोलणी सुरू असून, लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे.
11 / 15
रॉयटर्सनुसार, टाटा ग्रुप सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्पाबाबत पुढील महिन्यात सर्व गोष्टी अंतिम करू शकतो. TATA ग्रुप सॉफ्टवेअरच्या बाबतीत अद्ययावत, अग्रेसर आणि मजबूत असून, आता हार्डवेअरच्या बाबतीतही टाटा समूहाला मजबूत व्हायचे आहे, असे सांगितले जात आहे.
12 / 15
TATA ग्रुप यासाठी इंटेल, एएमडी आणि एसटी मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स यांच्याशी करार करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सन २०२२ पर्यंत टाटा ग्रुपचा हा सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्प कार्यान्वित होऊ शकेल आणि यामुळे सुमारे ४ हजारांवर रोजगार निर्मिती होऊ शकेल, असे म्हटले जात आहे.
13 / 15
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच TATA ग्रुपने सेमीकंडक्टर क्षेत्रात उतरण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. आताच्या घडीला सेमीकंडक्टर क्षेत्रात चीनची मक्तेदारी आहे. यासंदर्भात टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी याबाबत माहिती दिली होती. सेमीकंडक्टर म्हणजे एक प्रकारच्या सिलिकॉन चिप्स आहेत.
14 / 15
भारताच्या ऑटोमोबाइल क्षेत्रात सेमीकंडक्टरची वाढती मागणी आणि कोरोना संकटामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेली चणचण या पार्श्वभूमीवर TATA ग्रुपने पाऊल उचलले असून, आता सेमीकंडक्टर तयार करण्याच्या क्षेत्रात उतरणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची जागतिक बाजारपेठ सुमारे १ ट्रिलियन डॉलर आहे.
15 / 15
TATA ग्रुपने या मार्केटमध्ये हिस्सा मिळण्याच्या संधींचे आधीच नवीन व्यवसाय उभारले आहेत. सेमीकंडक्टर निर्मितीसाठी प्रचंड गुंतवणुकीची आवश्यकता असते. सध्या जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे आणि भारतात कोणतीही कंपनी सेमीकंडक्टर तयार करत नाही. यात कोरोना संकटाची भर आणि राजकीय कारणांमुळे कंपन्या आता इतर देशावर अवलंबून आहेत. अशा स्थितीत भारताला सेमीकंडक्टर निर्मितीचे जगातील दुसरे सर्वांत मोठे केंद्र बनण्याची चांगली संधी आहे, असे चंद्रशेखरन यांनी सांगितले होते.
टॅग्स :TataटाटाRatan Tataरतन टाटाelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनElectric Carइलेक्ट्रिक कारLondonलंडन