tata sons new owner of air india story of how profitable company convert in loss making airlines
Air India कंपनी तब्बल ४६ वर्ष नफ्यात होती, मग कर्जात बुडाली कशी? वाचा संपूर्ण कहाणी... By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 10:47 PM1 / 13कर्जात बुडालेली एअर इंडिया (Air India) कंपनी विकण्यासाठी सरकारनं लिलावाची तारीख पुढे ढकलली होती. कारण कर्जात बुडालेल्या एवढ्या मोठ्या कंपनीला विकत घेण्यासाठी खरेदीदार मिळत नव्हता. अखेर टाटा कंपनीनं एअर इंडियाला विकत घेण्यास स्वारस्य दाखवलं आणि सरकारनं अखेर त्यावर आज शिक्कामोर्तब केलं. 2 / 13आता Tata Sons कंपनीनं एअर इंडिया कंपनी पूर्णपणे विकत घेतली आहे. टाटा कंपनीनं एअर इंडियाला विकत घेण्यासाठी १८ हजार कोटींची बोली लावली. 3 / 13निर्गुंतवणूकीच्या बाबतीत केंद्र सरकारचं हे मोठं यश मानलं जात आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून एअर इंडियावरील कर्जात मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. पण यामागे एक मोठी कहाणी आहे. आधी एअर इंडिया कंपनी नफ्यातच होती. पण एकदा तोट्याचं ग्रहण कंपनीला लागलं आणि त्यातून बाहेर पडणं काही कंपनीला जमलं नाही. जसं जसं कर्ज वाढत गेलं तसं सरकारनंही एअर इंडियापासून दूर राहणं पसंत केलं. 4 / 13सुरुवातीला एअर इंडियातील काही हिस्सा विकण्याची गोष्ट समोर आली होती. पण विमान कंपनी चालवणं हे काही सरकारचं काम नाही अशी भूमिका घेत संपूर्ण कंपनीचा लिलाव करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. सरकारला आपल्या डोक्यावरचं लोढणं कमी करायचं होतं. 5 / 13खरंतर एअर इंडियासारखी मोठी कंपनी इतक्या मोठ्या तोट्यात जाईल असा विचार एका दशकापूर्वी कुणीही केला नव्हता. कारण त्यावेळीही एअर इंडिया कंपनी नफ्यात नव्हती. पण परिस्थितीवर मात करुन नफा कमावेल अशी अपेक्षा होती. 6 / 13१९५४ साली विमान कंपन्यांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं. सरकारनं हवाई वाहतूक देण्यासाठी दोन कंपन्या निर्माण केल्या. देशांतर्गत वाहतूकीसाठी इंडियन एअरलाइन्स आणि देशाबाहेरील सेवेसाठी एअर इंडिया. तेव्हापासून ते २००० सालापर्यंत कंपनी नफा कमावत होती. 7 / 13२००१ साली कंपनीला पहिल्यांदाच ५७ कोटींचा तोटा झाला. यासाठी हवाई मंत्रालयानं त्यावेळी तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक मायकल मास्केयरनहास यांना दोषी ठरवत पदावरुन काढून टाकलं होतं. 8 / 13२००७ साली एअर इंडियामध्ये इंडियन एअरलाइन्सचं विलनीकरण करण्यात आलं. विलनीकरणावेळी दोन्ही कंपन्यांचा एकूण तोटा ७७१ कोटी रुपये इतका होता. विलनीकरणापूर्वी इंडियन एअरलाइन्सचा तोटा फक्त २३० कोटी रुपये इतका होता. कंपनी लवकरच नफ्यात येईल असा अंदाज होता. एअर इंडिया कंपनी विलनीकरणाआधी ५४१ कोटी इतक्या तोट्यात होती. २००६-७ सालचा हा अहवाल होता. 9 / 13दोन्ही कंपन्यांच्या विलनीकरणानंतर एक अशी मजबूत कंपनी तयार होईल की दरवर्षाला कंपनी कोट्यवधींचा नफा कमावेल असा दावा केला गेला होता. पण तसं झालं नाही. विलनीकरणानंतर कंपनीचा तोटा वर्षा गणिक वाढत गेला. कंपनीचा तोटा कमी करण्यासाठी कंपनीनं कर्ज घेण्यास सुरुवात केली आणि कंपनी कर्जाच्या ओझ्याखाली येण्यास सुरुवात झाली. 10 / 13माध्यमांमधील माहितीनुसार २००५ साली १११ विमानं खरेदी करण्याचा निर्णय देखील एअर इंडियाला आर्थिक संकटात टाकण्याचं एक मोठं कारण ठरला. या व्यवहारात तब्बल ७० हजार कोटी रुपये खर्च झाले होते. इतका मोठा करार करण्याआधी कोणतंही नियोजन केलं गेलं नव्हतं असा आरोपही करण्यात आला होता. यावरुन बरच राजकारणही झालं होतं. 11 / 13एअर इंडिया कंपनीचा ढिला कारभार देखील कंपनी तोट्यात जाण्याचं एक कारण ठरलं. एअर इंडियाच्या विमानांच्या उड्डाणाला खूप विलंब व्हायचा. वेळापत्रकावर काटेकोर अंमलबजावणी केली जात नव्हती. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची तक्रार तर नेहमीचच दुखणं बनलं होतं. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागायचं. २०१८ साली एअर इंडियाकडे फक्त १३.३ टक्के मार्केट शेअर होता. 12 / 13चुकीचं व्यवस्थापन आणि सरकारी सेवांसाठी वापर यामुळे एअर इंडियाचा हवातसा वापर केला गेला. सरकारी थकबाकी वेळेवर न मिळाल्यानं कंपनीवरील ओझं वाढत गेलं. त्यात २००९ साली एअर इंडियाचे प्रमुख अरविंद जाधव यांनी तीन वर्षात कंपनीला सावरण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या. यात कर्मचारी कपात आणि इतर उपाय सुचवण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कंपनीविरोधात उपोषण आंदोलनं सुरू केली. पायलट देखील आंदोलनात सहभागी होत राहिले आणि कंपनीला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. 13 / 13एअर इंडियाला सर्वप्रथम जेआरटी टाटा यांनी १९३२ साली टाटा एअरलाइन्स नावानं लाँच केलं होतं. १९४६ साली कंपनीचं नाव बदलून एअर इंडिया करण्यात आलं होतं आणि १९५३ साली सरकारनं टाटांकडून कंपनी खरेदी केली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications