शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त 15,000 रुपये गुंतवून 'या' TATA कंपनीचे भागीदार व्हा; जाणून घ्या संपूर्ण माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 6:14 PM

1 / 6
Tata Technologies IPO : देशातील सर्वात जुन्या आणि दिग्गज व्यवसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहाच्या एखाद्या कंपनीत तुम्हाला भागीदार बनायचे असेल, तर एक मोठी संधी चालून आली आहे. तुम्ही टाटा ग्रुपच्या टाटा टेक्नॉलॉजीज IPO मध्ये गुंतवणूक करू शकता. जवळपास दोन दशकांनंतर हा आयपीओ येत आहे. या कंपनीत फक्त 15,000 रुपये गुंतवून तुम्ही कंपनीचे भागीदार होऊ शकता. कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यास तुम्हालाही त्याचा फायदा होईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, इतकी छोटी रक्कम भरुन भागीदारी कशी होऊ शकते? तर जाणून घेऊया...
2 / 6
20 वर्षांनंतर IPO मार्केटमध्ये प्रवेश- टाटा टेकच्या IPO बद्दल बोलायचे झाले, तर 2004 सालानंतर म्हणजेच जवळपास 20 वर्षांनंतर टाटा ग्रुपच्या एखाद्या कंपनीचा IPO लॉन्च होत आहे. गेल्या वेळी कंपनीने आपल्या आयटी फर्म टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चा IPO लॉन्च केला होता, तेव्हापासून समूहाने स्वतःला IPO मार्केटपासून दूर ठेवले. Tata Technologies IPO 22 नोव्हेंबर 2023 रोजी रिटेल गुंतवणूकदारांसाठी उघडणार आहे.
3 / 6
24 नोव्हेंबरपर्यंत पैसे गुंतवू शकता-शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी कमाईची मोठी संधी आणणारा Tata Technologies चा IPO 22 नोव्हेंबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि त्यात 24 नोव्हेंबरपर्यंत पैसे गुंतवता येतील. या IPO द्वारे प्रवर्तक त्यांचे स्टेक कमी करणार आहेत आणि हा स्टॉक पूर्णपणे ऑफर फॉर सेलवर आधारित असेल. या IPO द्वारे टाटा टेक्नॉलॉजीजने आधी 9.57 कोटी शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला होता, पण नंतर तो बदलून 60,850,278 शेअर्स करण्यात आला.
4 / 6
हे प्रमोटर्स भागभांडवल कमी करतील-जे प्रमोटर्स आयपीओद्वारे शेअर्स विकून त्यांचे स्टेक कमी करत आहेत, त्यात टाटा मोटर्स 4.62 कोटी शेअर्स, अल्फा टीसी 97.1 लाख शेअर्स आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड 48 लाख शेअर्स विकणार आहेत. JM Financial, Citi Group, Global Markets India, BofA Securities India यांना टाटा टेक IPO साठी लीड मॅनेजर नियुक्त केले आहेत. कंपनीने रजिस्ट्रार म्हणून लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती केली आहे.
5 / 6
हा प्राइस बँड निश्चित केला -22 नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओचा एकूण आकार 3,042.51 कोटी रुपये आहे. IPO लॉन्च होण्याआधीच तो ग्रे मार्केटमध्ये चर्चेत आला आहे. कंपनीने IPO अंतर्गत त्याची किंमत बँड देखील जाहीर केली आहे. कंपनीने IPO साठी 475-500 रुपये प्रति इक्विटी शेअरचा प्राइस बँड निश्चित केला आहे. IPO बंद झाल्यानंतर शेअर्सचे वाटप 30 नोव्हेंबर रोजी होईल, तर डिमॅट खात्यातील शेअर्स 4 डिसेंबर 2023 रोजी जमा होतील. टाटा टेक शेअर्सची शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची संभाव्य तारीख 5 डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे.
6 / 6
या IPO द्वारे टाटा टेकचे भागीदार कसे होऊ शकता, ते जाणून घ्या. किंमत बँडसह कंपनीने इतर तपशील देखील शेअर केले आहेत. त्यानुसार या IPO साठी लॉट साइज 30 शेअर्स ठेवण्यात आला आहे. याचा अर्थ गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी गुंतवणूक करावी लागेल. आता जर आपण 500 रुपयांच्या प्राइस बँडनुसार एका लॉटच्या किंमतीबद्दल बोललो तर ती 15,000 रुपये आहे. ही रक्कम गुंतवून तुम्ही कंपनीचा एक भाग व्हाल. (टीप- शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)
टॅग्स :Tataटाटाshare marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसा