शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा, पण रेल्वेचा साधा उल्लेखही नाही, समोर आलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 8:07 PM

1 / 7
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर आलेल्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामधून निर्मला सीतारमन यांनी विविध क्षेत्रांसाठी भरघोस घोषणा केल्या. नोकरदार वर्ग, शेतकरी, महिला, तरुण, उद्योग आणि मित्रपक्षांची सत्ता असलेली राज्यं या सर्वांना सरकारनं अर्थसंकल्पामधून काही ना काही दिलं.
2 / 7
पण सुमारे एक तास २० मिनिटे चाललेल्या अर्थसंकल्पाच्या भाषणामधून सीतारमन यांनी देशाचा अर्थसंकल्प संसदेसमोर मांडला. मात्र वित्तमंत्र्यांच्या भाषणामध्ये रेल्वेचा साधा उल्लेखही झाला नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, वित्तमंत्र्यांच्या भाषणामध्ये रेल्वेचा उल्लेख न होण्यामागचं कारण आता समोर आलं आहे.
3 / 7
वित्तमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आत्मनिर्भर भारत, अमृतकाल आदींचा उल्लेख केला. मात्र त्यांच्या भाषणामधून रेल्वे विभाग गायब होता. रेल्वेसाठी या अर्थसंकल्पामधून कुठलीही घोषणा करण्यात आली नाही.
4 / 7
वित्तमंत्र्यांच्या भाषणात केवळ एकदाच उल्लेख आला. तो उल्लेख आंध्र प्रदेशसंबंधी योजनांची घोषणा करताना आला. मात्र एवढा अपवाद सोडल्यास अर्थसंकल्पीय भाषणामध्ये रेल्वेच्या कुठल्याही नव्या गाडीची घोषणा झाली नाही. तसेच कुठल्याही सवलतीचीही घोषणा करण्यात आली नाही.
5 / 7
अर्थसंकल्पामध्ये रेल्वेचा उल्लेख नसल्याने काँग्रेसने त्यावर टीका केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, दररोज रेल्वेचे अपघात होत आहेत. ट्रेन बंद केल्या जात आहेत. डब्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे लोक त्रस्त आहेत. अर्थसंकल्पामध्ये रेल्वेबाबत काहीही सांगितलं गेलेलं नाही.
6 / 7
मात्र आजच्या अर्थसंकल्पामध्ये वित्तमंत्र्यांकडून रेल्वेबाबत कुठलीही घोषणा करण्यात न येण्याचं कारणही आता समोर आलं आहे. ते कारण म्हणजे अंतरिम अर्थसंकल्पामध्ये रेल्वेसाठी ज्या तरतुदी करण्यात आल्या होत्या. त्या कुठलेही फेरबदल न करता यावेळीही कायम राहणार आहेत.
7 / 7
असं असलं तरी या अर्थसंकल्पामधून रेल्वेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने जनतेमध्ये निराशेचं वातावरण आहे. अर्थसंकल्पामधून वंदे भारत, अमृत भारत ट्रेनबाबत काही घोषणा होईल. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या प्रवासाच्या सवलती पुन्हा लागू करण्याबाबत घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र या सर्व बाबतीत लोकांची निराशा झाली.
टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Indian Railwayभारतीय रेल्वेCentral Governmentकेंद्र सरकारNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन