शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Bonus Share : बोनस शेअर्स दिल्यानं गुंतवणूकदारांना काय फायदा होतो माहितीये? काय असतात Bonus Shares, का दिले जातात?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 2:32 PM

1 / 7
रिलायन्स इंडस्ट्रीजचं संचालक मंडळ एका आठवड्यानंतर म्हणजे ५ सप्टेंबर रोजी १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स देण्यावर विचार करेल, अशी घोषणा रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुरुवारी केली. मुकेश अंबानी यांनी बोनस शेअर्सची घोषणा केल्याने गुंतवणूकदारांना रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या लिस्टिंगची प्रतीक्षा करावी लागली आहे.
2 / 7
रिलायन्सचे मार्केट कॅप २०.६ लाख कोटी रुपये आहे आणि ती भारतातील सर्वात मौल्यवान लिस्टेड कंपनी आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीनं सर्वाधिक ७९,०२० कोटी रुपयांचा वार्षिक नफा कमावल्याची माहिती एजीएमदरम्यान देण्यात आली. आम्ही भारतात वेल्थ क्रिएट करणं आणि दररोज प्रत्येक भारतीयाचं जीवनमान उंचावण्याच्या व्यवसायात कार्यरत आहोत, असं अंबानींनी बोनस शेअरबाबात माहिती देताना म्हटलं.
3 / 7
आरआयएलनं आतापर्यंत पाच वेळा बोनस शेअर्स दिले आहेत, ज्याची सुरुवात १९०८० मध्ये ३:५ बोनस इश्यू आणि १९८३ मध्ये ६:१० शेअर्सपासून झाली होती. यापूर्वी १९९७, २००९ आणि २०१७ मधील तीन वेळा बोनस इश्यू १:१ च्या प्रमाणात देण्यात आले होते. बोनस इश्यू अंतर्गत रिझर्व्ह मार्केट कॅपच्या माध्यमातून रेकॉर्ड डेटला विद्यमान शेअरधारकांना बोनस शेअर्स दिले जातात.
4 / 7
आरआयएलच्या बाबतीत, जर संचालक मंडळानं मान्यता दिली तर भागधारकांना प्रत्येक विद्यमान समभागामागे एक बोनस शेअर मिळेल. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे आरआयएलचे १०० शेअर्स असतील तर तुमच्याकडे यानंतर २०० शेअर्स होती. मात्र, बोनस इश्यूमुळे तुमच्या गुंतवणुकीच्या मूल्यात कोणताही बदल होत नाही. कारण शेअर्सचे भाव त्यानुसार अॅडजस्ट होतात.
5 / 7
बोनस शेअर्स हे शेअरहोल्डरकडे असलेल्या शेअर्सच्या संख्येवर आधारित विद्यमान भागधारकांना विनामूल्य दिले जाणारे अतिरिक्त शेअर्स आहेत. हे कंपनीचं संचित उत्पन्न असतं जे लाभांश म्हणून दिले जात नाही, परंतु बोनस शेअर्समध्ये रूपांतरित केलं जातं. बोनस शेअर्सला स्टॉक डिव्हिडंड असंही म्हणतात.
6 / 7
उदाहरणार्थ, जर गुंतवणूकदार A कडे एखाद्या कंपनीचे २०० शेअर्स असतील आणि एखादी कंपनी १:१ बोनस जाहीर करते, म्हणजेच प्रत्येक शेअरसाठी त्याला १ शेअर बोनस, म्हणजेच एकूण २०० शेअर्सचा बोनस मिळतो आणि त्याची एकूण होल्डिंग ४०० शेअर्सपर्यंत वाढेल. पण विशेष म्हणजे ठेवलेल्या शेअर्सची संख्या वाढली तरी बोनस शेअर्स मिळवणाऱ्या गुंतवणूकदाराच्या संपत्तीत वाढ होत नाही, कारण बोनस शेअर्स मिळाल्यानंतर शेअरची किंमत त्याच प्रमाणात अॅडजस्ट होते.
7 / 7
त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाबतीतही बोनस शेअर मिळणे म्हणजे रिलायन्स गुंतवणूकदारांची संपत्ती वाढेल असं नाही. बोनस शेअरचा कंपनीच्या मार्केट कॅपवर परिणाम होणार नाही किंवा गुंतवणूकदारांच्या संपत्तीतही वाढ होणार नाही. बोनस शेअर्स ही कंपनीची केवळ कॉर्पोरेट अॅक्शन आहे.
टॅग्स :Relianceरिलायन्सInvestmentगुंतवणूकshare marketशेअर बाजारMukesh Ambaniमुकेश अंबानी