जाणून घ्या, बँकेतून Home Loan घेतल्यानंतर कर्जदाराचा अचानक मृत्यू झाल्यास बाकी कर्ज माफ होतं? By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 1:05 PM
1 / 12 एक काळ होता जेव्हा लोकांना केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा याचीच चिंता असायची. परंतु काळानुसार माणसांच्या गरजा वाढल्या. लहान मुलांचे शिक्षण, लग्न, व्यवसाय, घर, दुचाकी-चारचाकी अशा साधनांची गरज भासू लागली. ज्यासाठी आपली कमाई कमी पडत होती. अशावेळी एक पर्याय समोर आला तो म्हणजे बँकेतून लोन घेण्याचा. 2 / 12 बँक प्रत्येकाच्या गरजेनुसार विविध प्रकारचं कर्ज देतं. यासाठी बँक व्याजदर आकारतं. पर्सनल लोन, होम लोन, कार लोन, बिझनेस लोन, एज्युकेशन लोन अशी कर्ज बँकेकडून दिली जातात. कर्जाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत आपल्याला कर्ज फेडावं लागतं. त्यानंतरच कर्जातून मुक्त होता येते. 3 / 12 अनेकदा असं होतं की कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा अपघाती अथवा कोणत्यातरी आजारातून मृत्यू होतो. कर्ज फेडण्याच्या कालावधीत झालेल्या अचानक मृत्यूनंतर त्या व्यक्तीचं कर्ज माफ होतं का? अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्की असेल. कर्जदार व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचं कर्ज माफ होतं असं काहींना वाटतं. परंतु खरचं असं होतं का? 4 / 12 याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे कटिहार येथील मॅनेजर विजय प्रसाद सांगतात की, अशाप्रकारे अजिबात होत नाही. कर्ज घेतलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही बँक त्यांचे कर्ज वसूल करतं. कर्जफेड करण्यासाठी कोण जबाबदार असतं? त्याचे काही नियम असतात का? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया 5 / 12 जर कोणत्याही व्यक्तीने होम लोन घेतलं असेल आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याचा वारसदार, ज्याला मृत व्यक्तीच्या संपत्तीचा अधिकार मिळतो. त्याच्यावर बँकेचे कर्जफेड करण्याची जबाबदारी येते. कायद्यानुसार, बँकेचे कर्ज फेडल्याशिवाय तो संपत्तीचा अधिकारी बनू शकत नाही. 6 / 12 जर तो व्यक्ती कर्ज फेडण्याच्या स्थितीत नसेल अशावेळी बँक संपत्तीवर कब्जा करतं. बँक कर्जदाराची संपत्तीचा लिलाव करून त्यांचे पैसे वसूल करतं आणि जी काही रक्कम शिल्लक राहील ते कायदेशीर वारसदाराला परत करतं. 7 / 12 बँकेचे कर्ज घेताना ग्राहकाला त्याच्या कालावधीबद्दल माहिती दिली जाते. इंन्श्युरन्सच्या प्रकरणात कर्जदाराच्या मृत्यूनंतर विमा कंपनी बँकेचे कर्ज फेडू शकते. बँक अधिकारी विजय सांगतात की, जर कर्जाला इंन्श्युरन्स पॉलिसीने कव्हर केले असेल तर बँक विमा कंपनीकडे क्लेम करू शकते. 8 / 12 कायदेशीर वारसदाराकडे २ पर्याय शिल्लक असतात. तो वनटाईन सेटलमेंट करू शकतो अथवा कर्ज त्याच्या नावावर वळतं करू शकतो. ज्यानंतर कर्जाचा कालावधी फिटेपर्यंत त्याला हफ्ते भरावे लागतात. कारलोनमध्येही हाच नियम लागू आहे. 9 / 12 कर्जदाराच्या संपत्तीशिवाय बाईक, कार, वाहन बँक जप्त करून त्याचा लिलाव करू शकतं. बँकेला त्यांचे पैसे वसूल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर यातूनही कर्जफेड होत नसेल तर बँक मृतकाची दुसरी संपत्ती जसं घर, जमीन वैगेरे विकून पैसे वसूल करू शकतात. 10 / 12 ज्यावेळी पर्सनल लोन घेतलं जातं तेव्हा बँकेकडून नॉमिनी निश्चित केला जातो. जर कर्जदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला कर्जफेड करावी लागू शकते. परंतु पर्सनल लोनमध्ये नेहमी इंश्योर्ड लोन असतं. ईएमआयसोबत ग्राहकाला इन्शुरन्स प्रीमियमची रक्कम भरावी लागते. अशावेळी कर्जदाराच्या मृत्यूनंतर पैशाची वसूली विमा कंपनीकडून केली जाऊ शकते. 11 / 12 बिझनेस लोनमध्ये निश्चित कालावधी ठरवला जातो. व्यवसाय बुडाला अथवा कर्जदाराचा मृत्यू झाला तर कर्ज कोण फेडणार? कर्जाचं इन्श्युरन्स काढून कर्जदाराकडून प्रीमियमही वसूल केला जातो. त्यामुळे विमा कंपनीकडून ही रक्कम बँक वसूल करू शकतं. किंवा संपत्तीमधील काही भाग विकून पैसे वसूल करू शकतं. 12 / 12 सध्या बरेच लोक क्रेडिट कार्डवरून कर्ज घेतात. निर्धारित तारखेला क्रेडिट कार्डचं बिल भरावं लागतं. नाहीतर त्यावर दंड अथवा व्याज आकारला जातो. जर बिल भरण्यापूर्वी कर्जदाराचा मृत्यू झाला तर ती रक्कम मृतकाच्या वारसाकडून वसूल केली जाते. आणखी वाचा