शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vasundhara Oswal Arrest :कोण आहे अब्जाधीशाची मुलगी वसुंधरा, जिला युगांडात झालीये अटक, काय प्रकरण, कुटुंबाची संपत्ती किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 10:02 AM

1 / 9
Vasundhara Oswal Arrest : भारतीय वंशाचे अब्जाधीश पंकज ओसवाल यांच्या मुलीला युगांडामध्ये अटक करण्यात आली आहे. आपली मुलगी वसुंधरा ओसवाल हिला बेकायदेशीर कोठडीत ठेवण्यात आल्याचा दावा पंकज ओसवाल यांनी केला. १ ऑक्टोबर रोजी तिला अटक करण्यात आली होती.
2 / 9
यानंतर पंकज ओसवाल यांनी युगांडाच्या राष्ट्राध्यक्षांना एक खुलं पत्र लिहिलं आहे. आपल्या मुलीला मूलभूत हक्क, कायदेशीर प्रतिनिधित्व आणि तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यात येत असल्याचा दावा त्यांनी या पत्रात केला आहे.
3 / 9
वसुंधरा यांचा जन्म १९९९ मध्ये झाला. त्या ओसवाल ग्रुप ग्लोबलच्या मालकीच्या प्रसिद्ध अशा ओसवाल कुटुंबातील आहे. पीआरओ इंडस्ट्रीजमध्ये त्या महत्त्वाची भूमिका बजावतात. ईयू रिपोर्टनुसार, १ ऑक्टोबर रोजी वसुंधरा युगांडामधील ईएनए प्लांटला भेट देत होत्या. त्यावेळी कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी म्हणून काम करणाऱ्या सशस्त्र व्यक्तींनी त्यांना ताब्यात घेतलं.
4 / 9
वसुंधरा यांना वॉरंटशिवाय आणि कोणत्याही औपचारिक आरोपाशिवाय अटक करण्यात आल्याचं अहवालात म्हटलं आहे. त्यांच्या अनेक साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले. यामध्ये कंपनीच्या वकील रीता नागबैर यांचाही समावेश आहे.
5 / 9
दरम्यान, एका माजी कर्मचाऱ्यानं केलेल्या खोट्या आरोपांवरून आपल्या मुलीला ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप पंकज ओसवाल यांनी केला आहे. या कर्मचाऱ्यावर मौल्यवान मालमत्ता चोरल्याचा आणि कुटुंबाला गॅरंटर म्हणून ठेवून दोन लाख डॉलरचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे.
6 / 9
वसुंधरा यांची आई राधिका ओसवाल यांनी युगांडा सरकारकडे आपल्या मुलीशी बोलण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. 'हे प्रत्येक आईसाठी सर्वात वाईट स्वप्न असेल. माझ्या लहान मुलीला परदेशी तुरुंगात डांबण्यात आलं आहे,' अशी प्रतिक्रिया वसुंधरा ओसवाल यांची आई राधिका ओसवाल यांनी दिली.
7 / 9
वसुंधरा यांचा जन्म एका दिग्गज व्यावसायिक कुटुंबात झाला. स्वित्झर्लंड विद्यापीठातून त्यांनी फायनान्सविषयात पदवी मिळवली. सध्या अॅक्सिस मिनरल्सच्या कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असलेल्या वसुंधरा औद्योगिक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत.
8 / 9
पीआरओ इंडस्ट्रीजमधील त्यांचं नेतृत्व विशेष उल्लेखनीय आहे. कार्बन डायऑक्साईड कॅप्चरिंग प्लांटच्या स्थापनेचं नेतृत्व त्यांनी केलं. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी समूहातील विस्तार प्रकल्पांचं नेतृत्वही केलंय. कॉर्पोरेट कर्जही कमी झालं आहे. त्या दर महिन्याचा जवळजवळ अर्धा वेळ कामाच्या ठिकाणांना भेट देण्यात आणि विविध प्रकल्पांवर देखरेख करण्यात घालवतात. पीआरओ इंडस्ट्रीज आणि अॅक्सिस मिनरल्समधील त्यांच्या भूमिकांमध्ये गुंतवणूक व्यवस्थापन, वित्तीय देखरेख आणि सरकारी एजन्सींशी संपर्क यांचा समावेश आहे.
9 / 9
व्यवसायाव्यतिरिक्त ओसवाल कुटुंब आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी ओळखलं जातं. नुकतंच पंकज आणि राधिका ओसवाल हे जगातील सर्वात महागडं घर विकत घेऊन चर्चेत आले होते. स्वित्झर्लंडमधील गिंगिन्स येथे असलेली व्हिला व्हेरी नावाची ही प्रॉपर्टी ४.३ लाख चौरस फुटांवर पसरलेली आहे. ही मालमत्ता यापूर्वी ग्रीक शिपिंग मॅग्नेट अॅरिस्टॉटल ओनासिस यांची मुलगी क्रिस्टीना ओनासिस यांच्या मालकीची होती. २०० मिलियन डॉलर्स (सुमारे १६४९ कोटी रुपये) मध्ये खरेदी करण्यात आली होती.
टॅग्स :businessव्यवसाय