शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ambadas Danway: नगरसेवक ते विरोधी पक्ष नेता; एकेकाळी शिवसेनेने दानवेंचा राजीनामाही घेतला होता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 9:36 AM

1 / 9
शिवसेना नेते आणि बंडखोरीनंतर मराठवाड्यात शिवसेनेची तोफ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या अंबादास दानवेंनी शिवसेनेनं मोठी जबाबदारी दिली आहे. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेची निवड करण्यात आली. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी निवडचे पत्र दानवे यांना दिले.
2 / 9
शिवसेनेत झालेल्या बंडाळीमुळे राज्यात राजकीय भूकंप झाला. त्यातूनच, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. या पडत्या काळात मराठवाड्यातून माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी खिंड लढवली. त्यामुळेच, अंबादास दानवेंना पक्षाने ही बढती दिल्याचे दिसून येत आहे. दानवे यांनी अर्थशास्त्र, वृत्तपत्रविद्येत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
3 / 9
औरंगाबादमधील लोकसभा पराभव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागला. मराठा समाजाच्या मतांचे धु्रवीकरण झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर संघटनेत फेररचनेसह नवीन नेतृत्व उदयास आणल्याशिवाय गत्यंतर नसल्याचे पक्षाच्या लक्षात आले.
4 / 9
त्यामुळेच स्पर्धेत नसतानाही अंबादास दानवे यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक मैदानात उतरविण्यात आले. साम, दाम, दंड आणि भेद ही रणनीती मातोश्रीवरून आखली गेली आणि दानवे यांना विधान परिषद सदस्य होण्याचे द्वार खुले झाले.
5 / 9
भाजपमधून बाहेर पडल्यानंतर दानवे यांनी १९९८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. २००० साली नगरसेवक म्हणून अजबनगर येथून निवडून आल्यावर ते मनपात सभागृह नेते झाले. एका वादग्रस्त प्रकरणात पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर चार वर्षे पक्षात फक्त शिवसैनिक म्हणून काम करतांना त्यांनी संयम राखला.
6 / 9
ऑक्टोबर २००४ मध्ये प्रभारी जिल्हाप्रमुख पदाच्या रुपाने त्यांना निष्ठेचे फळ मिळाले. १५ वर्षे संघटनेवर एककलमी अंमल निर्माण करण्यात दानवेंनी मजल मारली. १५ वर्षांत मनपा, जि.प., विधानसभा, लोकसभा निवडणुकींचा अनुभव असलेल्या दानवे यांचा प्रवास आमदार होण्यापर्यंत पोहोचला आहे. आता पक्ष त्यांना २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून पुढे आणील, असे बोलले जात आहे. मात्र, तत्पूर्वीच त्यांना राज्यात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
7 / 9
दानवे यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटविण्यासाठी अंतर्गत गटबाजीतून वारंवार प्रयत्न झाले; परंतु त्याची मातोश्रीवरून त्याची फारशी घेतली गेली नाही. परिणामी, दानवे यांचा आत्मविश्वास दुणावला. त्यामुळे १५ वर्षांत मराठा व इतर समाजातून शिवसेना संघटन सांभाळू शकेल, असे नेतृत्व उदयास आले नाही.
8 / 9
२०१४ साली त्यांना गंगापूरमधून विधानसभेची उमेदवारी मिळाली. मात्र, त्यांना पराभव पत्कारावा लागला. २०१९ साली त्यांना लोकसभा लढण्याची इच्छा होती. मात्र, पक्षाने संधी दिली नाही. दरम्यान, माजी खा. चंद्रकांत खैरे आणि दानवे यांच्यात कायम वाद राहिला. २०१३ मध्ये माजी पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमक्ष झालेल्या झटापटीत खैरेंनी दानवेंवर हातही उगारला होता.
9 / 9
पक्षातील नियुक्त्या, गटबाजीतून त्यांच्यात आणि खैरेंमध्ये कायम खटके उडत राहिले. आ. संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनीदेखील दानवे यांच्या विरोधात आवाज उठविला होता. माजी आ. अण्णासाहेब माने आणि दानवे यांच्यात खैरेंसमक्ष वाद झाला होता. या सगळ्या विरोधांना पाठ देत शिवसेनेत १५ वर्षे जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत राहणारे दानवे हे कदाचित एकटेच असतील. आता तर ते आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते बनले आहेत.
टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbaiमुंबई