आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'

Ex Mumbai Indians Player Suspended: भर मैदानात कर्णधाराची हुज्जत घालून नंतर तो ड्रेसिंग रुममध्ये निघून गेला...

IPL 2019 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना अवघ्या १२ धावांत ६ बळींचा विक्रम रचणारा विंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ ( Alzarri Joseph ) वर बंदीची कारवाई करण्यात आली.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मैदानाबाहेर गेल्यामुळे आणि कर्णधाराशी मैदानातच गैरवर्तन केल्यामुळे त्याच्यावर २ सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

जोसेफचा कर्णधार शाई होपसोबत फिल्ड प्लेसमेंटवरून वाद झाला. त्यानंतर तो रागाच्या भरात मैदानाबाहेर गेला. या घटनेमुळे वेस्ट इंडिजच्या एका षटकांत केवळ १० खेळाडूच मैदानावर होते.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे दरम्यान ही घटना घडली. जोसेफ गोलंदाजी करत होता आणि त्याला फील्ड प्लेसमेंटमध्ये अपेक्षित जागी फिल्डिंग देण्यात आली नाही.

याबाबत त्याने कर्णधार शाई होपशी चर्चा केली, मात्र चर्चेचे रूपांतर नंतर वादात झाले. यानंतर जोसेफ रागाच्या भरात मैदान सोडून ड्रेसिंग रूममध्ये गेला.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने (CWI) जोसेफच्या गैरवर्तणुकीची गंभीर दखल घेतली आणि त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला.