Fakhar Zaman Run Out : क्विंटन डी कॉकनं पाकिस्तानी फलंदाजाचा 'पोपट' केला, मोठा वादच निर्माण झाला; Video

South Africa Vs Pakistan : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातला दुसरा वन डे सामना थरराक झाला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पाकिस्ताननं अखेरच्या चेंडूवर जिंकल्यानंतर यजमान आफ्रिकेनं दुसऱ्या सामन्यात जोरदार पलटवार केला. आफ्रिकेनं हा सामना १७ धावांनी जिंकून मालिका १-१अशी बरोबरीत आणली. Fakhar Zaman Run Out In Controversial fashion

दुसऱ्या वन डे सामन्यात पाकिस्तानकडूनही सडेतोड उत्तर मिळालं. एकट्या फखर जमान ( Fakhar Zaman) यानं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. १९३ धावांवर असताना तो धावबाद झाला अन् त्याच्या बाद होण्यानं नवा वाद निर्माण झाला. आफ्रिकेचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक ( Quinton De Kock) हा या वादाच्या केंद्रस्थानी आहे.

आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३४१ धावांचा डोंगर उभा केला. क्विंटन डी कॉक ( ८०), कर्णधार टेंबा बवूमा ( ९२), रॅसी व्हॅन डेर ड्युसन ( ६०), डेव्हिड मिलर ( ५०*) आणि एडन मार्कराम ( ३९) यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली. मिलरने तर २७ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचून ५० धावा पूर्ण केल्या.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचे फलंदाज झटपट माघारी परतले. फखर जमान हा एकट्यानं आफ्रिकेचा सामना करत होता. त्यानं अखेरच्या षटकापर्यंत सामन्याची चुसर कायम राखताना अनेक विक्रम मोडले. फखर जमाननं १५५ चेंडूंत १८ चौकार व १० षटकारासह १९३ धावा चोपल्या.

जमाननं १९३ धावांची खेळी करून आफ्रिकेविरुद्ध सर्वोत्तम वैयक्तिक खेळीच्या विक्रमात दुसरे स्थान पटकावले. त्यानं न्यूझीलंडच्या मार्टीन गुप्तीलचा ( १८०*, हॅमिल्टन, २०१७) विक्रम मोडला. आफ्रिकेविरुद्ध सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम हा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याच्या नावावर आहे. त्यानं २०१०मध्ये ग्वालियर येथे नाबाद २०० धावा चोपल्या होत्या.

वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक दोन वेळा १९०+ धावा करणाऱ्या फलंदाजांत जमान दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. आफ्रिकेविरुद्धच्या खेळीपूर्वी त्यानं झिम्बाब्वेविरुद्ध २१० धावांची खेळी केली होती. रोहित शर्मी तीन द्विशतकासह अव्वल स्थानावर आहे. पण, पहिल्या व दुसऱ्या डावात १९०+ धावा करणारा फखर जमान हा पहिलाच फलंदाज आहे.

दक्षिण आफ्रिकेत वन डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणाऱ्या फलंदाजांत जमाननं अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानं फॅफ ड्यू प्लेसिस ( १८५ वि. श्रीलंका, २०१७) आणि क्विंटन डी कॉक ( १७८) यांचा विक्रम मोडला.

क्विंटन डी कॉकची चतूर खेळी - ५०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तो धावबाद झाला. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक यानं चेंडू नॉन स्ट्राईकला येत असल्याचे जमानला भासवले आणि त्याचा धावण्याचा वेग संथ झाला. पण, प्रत्यक्षात चेंडू हा डी कॉकच्या दिशेनं आला आणि मार्करामने फेकलेल्या चेंडूनं थेट यष्टींचा वेध घेतला. जमानला काही कळण्याआधीच धावबाद होऊन माघारी जावं लागले आणि त्यावरून आता वाद सुरू झाला आहे.

काय सांगतो आयसीसीचा नियम - आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्टच्या कलम ४१.५.१मध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, फलंदाजाला कोणत्याही प्रकारे जर क्षेत्ररक्षक मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते चुकीचे आणि दंडास पात्र आहे.'' यावरून आता वाद सुरू झाला आहे आणि पाकिस्तानी संघ व्यवस्थापनानं सामनाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे.