"मी कर्णधार-फलंदाज म्हणून अपयशी, खूप चुका झाल्या, असे पराभव..."; रोहित शर्माची प्रामाणिक कबुली

Rohit Sharma Team India Loss, IND vs NZ 3rd Test: "आम्ही खूप प्रयोग केले, पण सारे फसले..."; असेही रोहित शर्मा म्हणाला.

भारतीय संघाचा मुंबईच्या वानखेडे मैदानावर न्यूझीलंडने २५ धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने पहिल्यांदा भारताला ३-० असे कसोटी मालिकेत पराभूत केले. घरच्या मैदानावर भारताची इतकी वाईट अवस्था पहिल्यांदाच झाली.

भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, "एखाद्या कसोटी सामन्यात किंवा मालिकेत झालेली हार पचवणे सोपे नसते. आम्हाला उत्तम क्रिकेट खेळणं जमलं नाही. न्यूझीलंड आमच्या विरुद्ध पूर्ण मालिकेत उत्तम खेळले. आम्ही खूप चुका केल्या."

"पहिल्या दोनही सामन्यांमध्ये पहिल्या डावात आम्ही फारशा धावा करू शकलो नाही. या सामन्यात आम्हाला पहिल्या डावात आम्हाला २८ धावांची आघाडी मिळाली होती. आज मिळालेले आव्हान पार होण्यासारखे होते, पण आम्ही सांघिक कामगिरीत कमी पडलो," अशी प्रामाणिक कबुली रोहित शर्माने दिली.

"जेव्हा तुम्हाला अशा आव्हानाचा पाठलाग करायचा असतो तेव्हा तुम्ही धावा करणे अपेक्षित असते. माझ्याही डोक्यात धावांचा विषय होता पण मला धावा काढणं जमलं नाही. आम्ही झटपट धावा काढायला गेलो पण ते आम्हाला जमलं नाही. त्यामुळे आमचीच फजिती झाली," ही बाब रोहितने मान्य केली.

रोहित पुढे म्हणाला, "भारतीय परिस्थितीत जसे खेळायला हवे तसे आम्ही खेळलो नाही, त्याचाच परिणाम पराभवाच्या रुपाने आम्हाला दिसला. पंत, गिल, वॉशिंग्टन यांनी चांगली फलंदाजी केली. आम्ही गेल्या ३-४ वर्षापासून अशा पिचवर खेळतोय. पण यावेळी आमचे प्लॅन फसले"

"आमच्यासाठी ही संपूर्ण मालिकाच विचित्र ठरली. आम्ही बरेच प्रयोग केले, पण आमच्याप्रमाणे काहीच घडले नाही. मी कर्णधार म्हणून उत्तम नव्हतो आणि फलंदाज म्हणूनही फारसा चांगला नव्हतो. एकूणच एक संघ म्हणून आम्ही पूर्णपणे अयपशी ठरलो," असे रोहित शर्मा म्हणाला.