कुठे हसू तर कुठे अश्रू! न्यूझीलंडच्या महिला चॅम्पियन; आफ्रिकेच्या पोरींच्याही पदरी निराशा Photos

आफ्रिकेच्या महिला संघाला आपल्या पुरुष संघाप्रमाणे विश्वचषकापासून एक पाऊल दूर राहावे लागले.

न्यूझीलंडच्या रुपात आयसीसीला एक नवा चॅम्पियन मिळाला. महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकात न्यूझीलंडने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन विश्वविजेते होण्याचा मान पटकावला.

आफ्रिकेच्या महिला संघाला आपल्या पुरुष संघाप्रमाणे विश्वचषकापासून एक पाऊल दूर राहावे लागले. अमेलिया केर हिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंड महिला संघाने दक्षिण आफ्रिका संघावर ३२ धावांनी मात करताना पहिल्यांदाच आयसीसी महिला ट्वेंटी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीसाठी पाचारण केले. न्यूझीलंडने २० षटकांत ५ बाद १५८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत ९ बाद १२६ धावांवर रोखत न्यूझीलंडने विजय साकारला.

अमेलिया केर सामनावीर आणि मालिकावीर किताबाची मानकरी ठरली. विजयासाठी १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वोल्वार्ड (३३) आणि तजमीन ब्रिट्स (१७) यांनी ५१ धावांची सलामी देत शानदार सुरुवात करून दिली. फ्रान जोनास हिने ब्रिट्सला बाद करत ही जोडी फोडली.

त्यानंतर केरने वोल्वार्डला बाद करत द. आफ्रिकेची बिनवाद ५१ वरून दोन बाद ५९ अशी अवस्था केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेल्या. क्लो ट्रायॉन (१४), एनेरी डर्कसेन (१०) यांनी झुंज दिली, पण शेवटच्या षटकात ३८ धावांचे लक्ष्य द. आफ्रिकेला पेलवले नाही.

न्यूझीलंडकडून रोजमेरी मेयर, अमेलिया केर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर ईडन कार्सन, फ्रान जोनास, ब्रुक हॉलिडे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

त्याआधी, न्यूझीलंडकडून जॉर्जिया प्लीमर (९) झटपट बाद झाल्यावर सुझी बेट्स (३२) आणि अमेलिया केर (४३) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ३७ धावांची भागीदारी केली. कर्णधार सोफी डिव्हाईन (६) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. तिला डि क्लर्क हिने पायचित केले. अमेलियाने बुक हॉलिडे (३८) हिच्या साथीत चौथ्या गड्यासाठी ५७ धावांची भागीदारी करत संघाला अठराव्या षटकात १२७ पर्यंत नेले.

क्लो ट्रायॉन हिने हॉलिडेला बाद करत ही जोडी फोडली. नॉनकुलुलेको मलाबा हिने अमेलियाला बाद केले. अमेलियाने ३८ चेंडूंत चार चौकारांसह ४३ धावांचे योगदान दिले. मॅडी ग्रीन (नाबाद १२) आणि इसाबेला गेझ (३) यांनी संघाला १५८ पर्यंत मजल मारून दिली. द. आफ्रिकेकडून मलाबा हिने दोन, तर खाका, ट्रायॉन, नादिने डि क्लर्क यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

ट्वेंटी-२० विश्वचषकासारख्या मोठ्या व्यासपीठावर किवी संघाने असामान्य कामगिरी करुन दाखवली. स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या भारतीय संघाला नमवून न्यूझीलंडने विजयी सलामी दिली अन् किताबापर्यंत मजल मारली.

अंतिम सामन्यात विजय मिळताच किवी संघाने एकच जल्लोष केला, तर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना अश्रू अनावर झाले. २००० मध्ये वन डे विश्वचषक जिंकल्यानंतर न्यूझीलंडने तब्बल २४ वर्षांनी विश्वचषक जिंकण्याची किमया साधली.

२०१६ च्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचा पराभव करुन न्यूझीलंडने अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. सर्वाधिक पाचवेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागल्याने किवी संघाचा मार्ग थोडा सोपा झाला.