शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मनसुख हिरेन हत्याकांडाला नवं वळण; अँटिलिया स्फोटक प्रकरणीही होणार खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 3:48 PM

1 / 10
ठाण्यातील मनसुख हिरेन यांच्या हत्याकांड प्रकरण मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात बरेच गाजले. या हत्याकांडात बडे बडे पोलीस अधिकारीही तुरुंगात गेले. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवलेल्या स्फोटकावरून या प्रकरणाची सुरुवात झाली होती.
2 / 10
याच मनसुख हिरेन हत्याकांड आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणी नवं वळण मिळाले आहे. या प्रकरणातील आरोपी माजी पोलीस अधिकारी सुनील माने याने कोर्टाला अर्ज करत आपण माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.
3 / 10
सुनील माने याच्या अर्जावर ८ मार्चपर्यंत भूमिका मांडा असं कोर्टाने NIA ला सांगितले आहे. सुनील माने यांनी माफीचा साक्षीदार होऊन सरकारी पक्षाला मदत करण्यास तयार आहे असं सांगितल्याने या प्रकरणाला नाट्यमय वळण आले आहे.
4 / 10
सगळी घडलेली हकिकत, कोण या प्रकरणात दोषी आहे? कुणाच्या सांगण्यावरून हे घडवण्यात आले ही सगळी माहिती आपण देण्यास तयार आहोत. कारागृहात इतका वेळ गेला की या प्रकरणात आपल्याला विनाकारण गोवण्यात आले त्यामुळे पश्चाताप होत असल्याचं सुनील माने यांनी म्हटलं आहे.
5 / 10
हा अर्ज मुंबई सत्र न्यायालयात विशेष NIA कोर्टासमोर सुनील माने यांनी सादर केला आहे. या अर्जाची दखल घेत कोर्टाने NIA तपास यंत्रणेला आपली भूमिका स्पष्ट करत ८ मार्चपर्यंत उत्तर देण्याची मुदत देण्यात आली आहे.
6 / 10
त्यामुळे जर मानेंचा अर्ज स्वीकारला तर या प्रकरणात खळबळजनक माहिती समोर येऊ शकते. सुनील माने यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप NIA ने केला होता. अँटिलियाच्या बाहेर स्फोटक ठेवण्याची मुख्य ऑर्डर सचिन वाझेला कुणी दिली होती?
7 / 10
कुणाच्या सांगण्यावरून हे करण्यात आले. मनसुख हिरेन हत्याकांडाच्या रात्री काय घडले याचा खुलासाही होऊ शकतो. त्यामुळे सुनील मानेचा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज स्वीकारला तर या प्रकरणाला नवं वळण मिळेल हे निश्चित आहे.
8 / 10
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार तसेच ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सुनील मानेला अटक केली होती. त्यानंतर मानेला मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं होतं.
9 / 10
स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला निलंबित एपीआय सचिन वाझेशी मानेची विशेष सलगी होती. माने हा कांदिवली गुन्हे शाखेचा (कक्ष ११) प्रभारी होता. मनसुख प्रकरणानंतर मुंबई आयुक्तालयात येऊन तो सीआययू कार्यालयात वाझेला भेटला होता असा आरोप आहे.
10 / 10
मनसुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीवेळी सुनील माने हजर होता. त्यानंतर त्याच्या हत्येमध्येही माने याने वाझेच्या सांगण्यानुसार महत्त्वाची भूमिका बजावल्याचे एनआयएच्या तपासातून स्पष्ट झाल्याने त्याला अटक करण्यात आली होती.
टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाMukesh Ambaniमुकेश अंबानी