शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Flipkart delivery boy cheating: फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयने फसविले, 50 हजार उडविले; ही ट्रीक वापरली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2021 4:05 PM

1 / 10
दिवाळी धमाका, बंपर सेल, 50 टक्के डिस्काऊंट आदींच्या जाहिराती सुरु झाल्या आहेत. ऑनलाईन शॉपिंगला तर उधान आले आहे. अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या (Flipkart) कंपन्यांनी ऑनलाईन शॉपिंग फेस्टिव्हल सुरु केला आहे. परंतू जर तुम्ही या सीझनमध्ये ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण कंपनीचे डिलिव्हरी बॉय तुम्हाला न कळत हजारो रुपयांचा चुना लावून जाऊ शकतात. (Flipkart delivery boy cheating)
2 / 10
हैराण करणारी ही घटना आहे, दिल्लीच्या पॉश भागातील म्हणजे वसंत विहार येथील. सरोज कुमार या तिथे एका घरात राहतात. सप्टेंबरमध्ये त्यांनी फ्लिपकार्टवरून दोन वस्तू वेगवेगळ्या ऑर्डर केल्या होत्या. दोन्ही वस्तू त्यांना पसंत आल्या नाहीत. यामुळे त्यांनी एक्स्चेंज रिक्वेस्ट टाकली.
3 / 10
एक्सेंज रिक्वेस्ट आल्यावर सरोज कुमार यांच्याकडे फ्लिपकार्टचा डिलिव्हरी बॉय आला, त्याने त्यांच्याकडून एक वस्तू मागितली. परंतू त्या बदल्यात कोणतीही वस्तू दिली नाही. म्हणजेच एक्स्चेंज नाही तर रिटर्न वस्तू मागत होता. डिलिव्हरी बॉयने त्यांना फसवून तुमची ऑर्डर रिटर्न होईल आणि तुमच्या खात्यात पैसे वळते केले जातील, असे सांगितले. यावर सरोज यांनी मला पैसे कसे परत येतील, जर माझा अकाऊंट नंबर फ्लिपकार्टकडे नसेल, असा सवाल त्याला केला.
4 / 10
यावर त्या डिलिव्हरी बॉयने सांगितले की, जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर मला तुम्ही फोन करा. यानंतर तो तेथून ती वस्तू घेऊन गेला. काही दिवसांनी दुसरा डिलिव्हरी बॉय दुसरी वस्तू एक्स्चेंज करण्यासाठी आला. यावेळी महिलेने त्याला पहिल्या वस्तूचे पैसे अद्याप आले नसल्याचे सांगितले.
5 / 10
यावर दुसऱ्या डिलिव्हरी बॉयने त्या पहिल्या डिलिव्हरी बॉयला फोन केला आणि महिलेला बोलण्यास सांगितले. या डिलिव्हरी बॉयने एक नंबर दिला आणि त्या नंबरवर फोन करून तुमची समस्या सांगा तुम्हाला पैसे मिळून जातील असे सांगितले.
6 / 10
पीडित महिलेने जेव्हा त्या नंबरवर फोन लावला तेव्हा तिला आणखी एक नंबर दिला गेला. तो सिनिअर असल्याने त्याच्याशी बोला तो तुम्हाला पैसे देईल असे सांगितले गेले. त्या महिलेने त्या सिनिअरला फोन केला, त्याने तिला फ्लिपकार्टचा कर्मचारी असल्याचे सांगत पैसे मिळण्यासाठी एनीडेस्क अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. तिने ते डाऊनलोड केले.
7 / 10
यानंतर त्याने तिचे डेबिट कार्ड मोबाईलच्या कॅमेरासमोर धरण्यास सांगितले. परंतू तिला तर मोबाईलमध्ये कोणताही फोटो दिसत नव्हता. मात्र, समोरच्याकडे तिच्या डेबिट कार्डची सारी माहिती गेली. काही मिनिटांतच तिच्या खात्यातून 40000 रुपये गायब झाले. त्यानंतर पुन्हा 10000 रुपये गेल्याचा मेसेज आला.
8 / 10
या प्रकाराने हादरलेल्या सरोज कुमार यांनी पोलिसांना फोन केला, तक्रार दाखल केली आणि कारवाई सुरु झाली. परंतू फ्लिपकार्टचे कर्मचारी जे ऑर्डर डिलिव्हर किंवा रिटर्न करण्यासाठी येतात त्यांनीच महिलेला हातोहात फसविल्याने विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
9 / 10
आता राहिला प्रश्न तो आपण फसण्याचा. अशा प्रकारात आपणही फसण्याची शक्यता आहे. कारण तुम्ही केलेली रिटर्न रिक्वेस्ट फक्त फ्लिपकार्टला माहिती असते. ती पुढे डिलिव्हरी बॉयला कळविली जाते. म्हणजे तो खराखुरा डिलिव्हरी बॉय होतो. मग अशावेळी थोडेफार वयस्क, महिला किंवा या गोष्टींचे फारसा अनुभव नसलेल्यांना शिकार केले जाते.
10 / 10
यामुळे कोणी काहीजरी सांगितले तरी कोणत्याही प्रकारचे अॅप डाऊनलोड करू नये, नाही डिलिव्हरी बॉयने सांगितलेल्या किंवा पाठविलेल्या नंबरवर फोन किंवा लिंकवर क्लिक करू नये. तुमच्या कार्डाची माहिती, ओटीपी, पीन आदी माहिती त्यांना देऊ नये. ऑनलाईन खरेदी जेवढी फायद्याची तेवढीच तोट्याची देखील असू शकते. हा धोका ओळखावा. या घटनेचे वृत्त आजतकने दिले आहे.
टॅग्स :Flipkartफ्लिपकार्ट