शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

समलैंगिक संबंधांना विरोध; लिंगबदल शस्त्रक्रियेस नकार; तरुणानं संपूर्ण कुटुंबाला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 11:24 AM

1 / 10
हरयाणाच्या रोहतकमध्ये एका २० वर्षीय तरुणानं कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या केली. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरला. सुखवस्तू कुटुंबात वाढलेला २० वर्षांचा अभिषेक असं काही करेल याची कल्पनादेखील कोणी केली नव्हती.
2 / 10
२७ ऑगस्टच्या सकाळी अभिषेकनं नेहमीप्रमाणे त्याच्या कुटुंबासोबत नाश्ता केला. आई, बाबा आणि आजीसोबत अभिषेक नाश्ता करत असताना त्याची बहिण नेहा (१९) वरच्या खोलीत झोपली होती.
3 / 10
नाश्ता झाल्यावर अभिषेक नेहाच्या खोलीत गेला. त्यानं टीव्ही सुरू केला. तिथेच ड्रॉवरमध्ये असलेली वडिलांचं पिस्तुल बाहेर काढलं आणि नेहाला ठार केलं. इथूनच हत्याकांडाला सुरुवात झाली.
4 / 10
नेहाला मारल्यानंतर अभिषेकनं तिच्या खोलीचा दरवाजा बंद केला. तो खाली आला. गिटार वाजवून दाखवतो म्हणत त्यानं आजी रोशनी देवींना (७०) स्वत:च्या खोलीत बोलावलं. आजी खोलीत येताच अभिषेकनं गोळी झाडली. अभिषेकनं झाडलेली गोळी शरीरातून आरपार गेली आणि समोरच्या भिंतीवर लागली.
5 / 10
जणू काहीच झालंच नसल्याच्या आविर्भावात अभिषेक घरात वावरत होता. पाच मिनिटांनंतर आई संतोषनं (४०) अभिषेककडे आजीबद्दल विचारणा केली. अभिषेकनं दुसऱ्या मजल्याकडे बोट केलं. आई आजीच्या खोलीच्या दिशेनं निघाली असताना अभिषेकनं तिच्यावरही गोळी झाडली.
6 / 10
तिघांच्या हत्या केल्यावर अभिषेक खाली आला. वडील प्रदीप खाटेवर बसले होते. अभिषेक त्यांच्या जवळ गेला. त्यानं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. वडील जिवंत राहू नयेत म्हणून त्यानं तीन गोळ्या झाडल्या.
7 / 10
अभिषेकनं संपत्तीसाठी चौघांची हत्या केल्याचं बोललं जात होतं. मात्र आता पोलीस चौकशीतून वेगळीच माहिती समोर आली आहे. अभिषेकचं एका मुलावर प्रेम होतं. मात्र या समलैंगिक संबंधांना कुटुंबाचा विरोध होता.
8 / 10
अभिषेक समलिंगी असल्याची माहिती २ वर्षांपूर्वीच समोर आली होती. मात्र त्याच्या कुटुंबाला ही गोष्ट मान्य नव्हती. अभिषेकला लिंगबदलासाठी शस्त्रक्रिया करायची होती. मात्र कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळेच त्यानं कुटुंबालाच संपवल्याची माहिती पोलीस चौकशीतून पुढे आली आहे.
9 / 10
चौघांच्या हत्या केल्यानंतर अभिषेक त्याच्या प्रियकरासोबत दिल्ली बायपासजवळ असलेल्या एका मॉटेलमध्ये गेला. तिथून त्यानं कुटुंबीयांना फोन केले. त्यानंतर काकांना फोन करून कोणीच फोन उचलत नसल्याचं सांगत हत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला.
10 / 10
कुटुंबातील चौघांची हत्या करणारा अभिषेक चार-पाच दिवस त्याच्या नातेवाईकांसोबत राहत होता. या कालावधीत पोलिसांनी अभिषेकला चौकशीसाठी बोलावलं. तो अनेकदा जबाब बदलत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच अभिषेकनं हत्यांची कबुली दिली.