शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sanjay Raut Arrested By ED: पत्राचाळच नाही, हजारो कोटींच्या चीट फंडातही संजय राऊतांचे नाव? नेमके आहे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 11:39 AM

1 / 15
मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळा प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या संजय राऊत यांना या प्रकरणात मोठा आर्थिक लाभ झाल्याचा ईडीला संशय आहे. या प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्याकडून हा आर्थिक लाभ झाल्याचा ठपका ईडीने संजय राऊत यांच्यावर ठेवला आहे आणि त्याच अनुषंगाने कारवाई सुरू आहे.
2 / 15
६० हजार कोटी रुपयांच्या देशव्यापी चीट फंड घोटाळ्याप्रकरणीदेखील संजय राऊत यांची ईडी चौकशी करत असल्याचे समजते. या कंपनीने सामान्य लोकांच्या खिशातून गोळा केलेल्या पैशांतून वसई, विरार, पालघर पट्ट्यांत मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केली होती. तसेच, गृहनिर्माण प्रकल्पाचे बांधकामही सुरू केले होते.
3 / 15
२१ मे २०२२ रोजी ईडीने पर्ल ग्रुपवर छापेमारी करत वसई पट्ट्यांतील १८७ कोटी रुपये मूल्याची ५७ एकर जमीन जप्त केली. ६० हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील २ हजार कोटी रुपये प्रवीण राऊत यांना मिळाल्याचा ईडीला संशय आहे आणि यातही राऊत यांना आर्थिक लाभ झाल्याचा आता ईडीला संशय असून त्याची चौकशीही केली जाणार आहे.
4 / 15
पत्राचाळ जागेची आठ बिल्डरना केलेल्या विक्रीतून गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला १०३९ कोटी ७९ लाख रुपये मिळाले.
5 / 15
सन २०१८ मध्ये म्हाडाने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे या प्रकरणी तक्रार केली.
6 / 15
प्रवीण राऊत, राकेशकुमार वाधवान, सारंगकुमार वाधवान, यांच्याविरोधात ही तक्रार होती. फेब्रुवारी, २०२० मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने प्रवीण राऊत यांना अटक केली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये सारंग वाधवान यांना अटक झाली. प्रवीण राऊत यांची जामिनावर सुटका झाली.
7 / 15
एकूण ४७ एकर जागेवर असलेल्या पत्राचाळीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया २००७ मध्ये सुरू झाली.
8 / 15
कामाचे कंत्राट म्हाडाने डीएचएफएल कंपनीची हिस्सेदारी असलेल्या गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले. याच कंपनीत प्रवीण राऊत संचालक होते. पुनर्विकासातून तेथील ६७२ रहिवाशांना घरे देणे तर ३००० फ्लॅट्स म्हाडाला हस्तांतरित करणे अपेक्षित होते.
9 / 15
गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीने पुनर्विकासाचे काम न करता ती जागा व त्यावरील चटई क्षेत्र निर्देशांक यांची आठ बिल्डरना विक्री केली.
10 / 15
या भूखंड खरेदीतील काही व्यवहार हे रोखीने झाल्याचाही ठपका ईडीने ठेवला आहे. या प्रकरणी ईडीने वर्षा राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि किहिम येथील ८ भूखंड एप्रिल महिन्यात जप्त केले. प्रवीण राऊत यांना ईडीने २ फेब्रुवारी रोजी अटक केली. गेल्या आठवड्यात त्यांची दिल्लीत चौकशी झाली.
11 / 15
१ फेब्रवारी २०२२ मध्ये ईडीने या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे हाती घेत ईसीआयआर नोंदवला आणि सात ठिकाणी छापेमारी केली. प्रवीण राऊत आणि त्याचा साथीदार सुजित पाटकर यांच्या घरीही ईडीने छापे टाकले.
12 / 15
प्रवीण राऊत यांच्या चौकशीदरम्यान संजय राऊत यांचे नाव पुढे आल्याचे समजते. पत्राचाळ भूखंड आणि त्यावरील एफएसआयच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांपैकी १०० कोटी रुपये प्रवीण राऊत यांना मिळाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
13 / 15
प्रवीण राऊत यांनी हे पैसे त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि काही व्यावसायिकांच्या खात्यामध्ये फिरवल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे.
14 / 15
याच पैशातील ८३ लाख रुपयांची रक्कम ही प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा झाली.
15 / 15
ईडीची चौकशी सुरू झाल्यानंतर वर्षा राऊत यांनी ५५ लाख रुपये माधुरी यांना परत केल्याचे तसेच याच पैशांचा वापर करून वर्षा राऊत यांनी त्यांचा दादर येथील फ्लॅट खरेदी केल्याचेही ईडीचे म्हणणे आहे. याच कालावधीमध्ये वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावे किहिम येथे आठ भूखंडांचीही खरेदी झाली.
टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयShiv Senaशिवसेना