शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण: पोलीस या ११ पुराव्यांच्या बळावर लढणार, ५ महत्वाचे साक्षीदारही मिळाले!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 8:32 AM

1 / 10
१८ मे रोजी श्रद्धा वालकरची गळा दाबून हत्या केल्यानंतर आफताब पूनावालाने पुढील १० तास बाथरूममध्ये शॉवर चालू ठेवून तिच्या शरीराचे तुकडे केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानंतर ३५ तुकडे पॉलिथिनमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवले होते. मग त्यानं Zomato वरून जेवण ऑर्डर केलं, जेवला, मद्यपानही केलं आणि Netflix वर वेबसीरिज पाहून झोपी गेला.
2 / 10
इतक्या क्रूरपणे हत्या करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली असली तरी त्यानं केलेला गुन्हा सिद्ध करण्यासाठी पोलिसांना सबळ पुरावे कोर्टासमोर सादर करावे लागणार आहेत. यूपीचे माजी डीजीपी विक्रम सिंह यांच्या माहितीनुसार आफताब स्वतः त्याच्या डेथ वॉरंटवर सही करून गेला आहे. शरीराचे तुकडे केल्यानं आणि खुनाचे हत्यार लपवून ठेवल्यानं तो वाचेल असं जर त्याला वाटत असेल तर तो त्याचा गैरसमज आहे. त्याच्याविरुद्ध आता पुरावे सापडले आहेत की जे त्याला फासावर लटकवू शकतात.
3 / 10
श्रद्धा हत्येप्रकरणी आफताबला कोर्टाकडून आणखी ५ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. मात्र, पोलिसांना १० दिवसांची कोठडी हवी होती. पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलिस आफताबला उत्तराखंड आणि हिमाचलमध्येही घेऊन जाणार आहेत. त्याचबरोबर आफताबची नार्को टेस्ट करण्याची परवानगीही पोलिसांना मिळाली आहे.
4 / 10
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पोलिसांना श्रद्धा हत्याकांडाशी संबंधित ११ महत्त्वाचे पुरावे आणि साक्षीदार सापडले असून, त्यापैकी अधिक परिस्थितीजन्य पुरावे आहेत. गुन्ह्यासाठी वापरलेले हत्यार किंवा मृतदेहाचे शीर अद्याप सापडलेले नाही.
5 / 10
आरोपी आफताबला गुरुवारी मेहरौलीतील त्याच फ्लॅटमध्ये आणण्यात आलं होतं जिथं श्रद्धाची हत्या करण्यात आली होती. पोलिसांसोबत फॉरेन्सिक टीमही पोहोचली आणि या टीमचं नेतृत्व संजीव गुप्ता करत होते. फॉरेन्सिट टीमने फ्लॅटच्या प्रत्येक कोपऱ्यातून पुरावे गोळा करण्यात तासन् तास घालवले. गुन्ह्याच्या ठिकाणी, टीमला स्वयंपाकघरात फक्त एकाच ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले आहेत.
6 / 10
१. आफताबच्या घरी श्रद्धाची बॅग मिळाली आहे. २- कॉल रेकॉर्डिंग आणि लोकेशनशी संबंधित माहिती. ३- किचनमध्ये सापडले रक्ताचे डाग. ४- आफताबच्या हाताला झालेल्या जखमेवर उपचार केलेल्या डॉक्टरांचा जबाब. ५- आफताबला चाकू विकणाऱ्या दुकानदाराचा जबाब. ६- श्रद्धाचे वडील आणि तिच्या मित्रांचे जबाब. ७- श्रद्धाच्या बँक अकाऊँट ट्रान्झाक्शन डिटेल्स. ८- जंगलात मिळालेले शरीराचे तुकडे. ९- शरीराचे तुकडे ठेवण्यासाठी विकत घेतलेल्या फ्रीचं बिल आणि दुकानदाराचा जबाब. १०- आफताबचा कबुली जबाब आणि ११ वा पुरावा म्हणजे डेटिंग अॅप 'बंबल'चा संपूर्ण डेटा पोलिसांनी जमा केला आहे.
7 / 10
आफताबनं ज्या हत्यारानं श्रद्धाचा खून केला ते हत्यार अद्याप सापडलेलं नाही. श्रद्धाचं शीर अद्याप सापडलेलं नाही. हत्येच्या दिवशी तिनं परिधान केलेले कपडे आणि श्रद्धाचा मोबाइल फोन अद्याप पोलिसांना हाती लागलेला नाही. याचा पोलीस कसून तपास करत आहेत.
8 / 10
पोलिसांकडून कोर्टासमोर ५ महत्वाचे साक्षीदार उभे केले जाणार आहेत. यात श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नादर याचा जबाब महत्वाचा ठरणार आहे. कारण श्रद्धाचा नेहमी लक्ष्मणसोबत फोनवरुन संवाद असायचा. जूनमध्ये जेव्हा तिचा फोन बंद असल्याचं निदर्शनास आलं तेव्हा त्यानं श्रद्धाच्या वडिलांना याची माहिती दिली होती. दिल्लीतील घरमालक राजेंद्र कुमार याचाही जबाब महत्वाचा ठरणार आहे. श्रद्धा आणि आफताब यांनी महरौली येथे टू बेडरुम किचन फ्लॅट भाड्यानं घेतला होता. आफताबनं घर भाड्यानं घेतल्यानंतर पाण्याचं बिल जास्तीचं येऊ लागलं होतं असं घरमालकानं पोलिसांना सांगितलं आहे.
9 / 10
पोलिसांच्या माहितीनुसार रक्ताचे डाग पूर्णपणे मिटवण्यासाठी आफताबनं पाण्याचा प्रचंड वापर केला होता. आफताबच्या जखमेवर उपचार करणारे डॉ. अनिल सिंह यांचाही जबाब पोलीस कोर्टासमोर ठेवणार आहेत. आफताब मे महिन्यात त्याच्या हाताला झालेल्या जखमेवर उपचार करण्यासाठी क्लिनिकमध्ये आला होता असं डॉ. अनिल सिंह यांनी सांगितलं आहे. चौथा साक्षीदार म्हणजे आफताबनं ज्या दुकानदाराकडून चाकू खरेदी केला होता तो दुकानदार सुदीप. दिल्लीत छतरपुर परिसरात सुदीप याचं होम अँड किचन अप्लायन्सेसचं दुकान आहे. याच दुकानातून आफताबनं चाकू खरेदी केला होता. दुकानाचे सीसीटीव्ही कॅमेरा तपासले जात आहेत.
10 / 10
पाचवा साक्षीदार म्हणजे आफताबनं ज्या दुकानदाराकडून फ्रीज खरेदी केला होता तो तिलकराज. आफताबनं १९ मे रोजी तिलकराजच्या दुकानातून एलजी कंपनीचा २६० लीटरचा डबर डोअर फ्रीज खरेदी केला होता. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे ठेवण्यासाठी या फ्रीजची खरेदी करण्यात आली होती.
टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारी