शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shraddha Murder Case: "तेव्हाच आली होती शंका...;" आफताब संदर्भात श्रद्धाच्या वडिलांचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 9:55 AM

1 / 9
Shraddha Murder Case: श्रद्धा वालकरच्या हत्येचा तपास पोलीस तपास वेगाने सुरू आहे. चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांना सांगितले की, १८ मे रोजी हत्येच्या दिवशी श्रद्धा आणि त्याच्यात घरगुती खर्चावरून भांडण झाले होते. दैनंदिन खर्च कोण करणार यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला, त्यानंतरच त्याने श्रद्धाची हत्या केली.
2 / 9
आतापर्यंतच्या पोलीस तपासावर श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर समाधानी असल्याचं त्यांनी NDTV शी बोलताना सांगितलं. दरम्यान, २०२१ पासूनच श्रद्धाशी कोणतंही बोलणं होत नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्या मुलाबद्दल जाणून घेतल्यानंतर नाराजी व्यक्त केल्याचंही ते म्हणाले.
3 / 9
“मी मुलीला प्रश्न विचारले होते कशी आहेस तू? काय करतेय आणि कुठे राहतेयस? परंतु त्यानंतर तिला राग आला होता. आपण आफताबसोबत राहत असल्याचं तिनं सांगितलं. मी रागावल्यानंतर आमचं बोलणं बंद झालं,” असं श्रद्धाच्या वडिलांनी सांगितलं.
4 / 9
२०२० मध्ये कोरोनामुळे माझ्या पत्नीचं निधन झालं. त्यादरम्या आफताबशी माझी भेट झाली. मी त्याला पाहूनच हा मुलगा आवडत नसल्याचं सांगितलं. तसंच चांगल्या ठिकाणी लग्न लावून देईन असंही म्हटलं. त्यानंतर श्रद्धा आपल्याला टाळू लागल्याचंही त्यांनी म्हटलं.
5 / 9
“एका मुस्लीम मुलासोबत तिनं राहावं किंवा लग्न करावं असं मला वाटत नव्हतं. आफताबद्दल सुरूवातीपासूनच तिला मी नकार दिला होता. तो मला आवडत नव्हता. काहीतरी गडबड वाटत होती, परंतु तिनं मानलंच नाही. मी पहिले आफताबला भेटलो नव्हतो. परंतु पत्नीच्या निधनानंतर तो येत जात होता. दोन वेळा भेटीनंतर मला त्याच्यावर संशयही आला होता,” असं श्रद्धाच्या वडिलांनी सांगितलं.
6 / 9
“आमचं बोलणं होत नव्हतं. परंतु श्रद्धाच्या मित्रांकडून तिच्याबद्दल माहिती मिळत होती. त्यांनी दिल्लीत घर घेऊन राहण्यास सुरुवात केल्याचंही त्यांच्याकडूनच समजलं. १४ ऑगस्टला श्रद्धाच्या मित्रानं तिचा मोबाईल २ महिन्यांपासून बंद येतोय असा माझ्या मुलाला फोन केला होता. कोणतीही माहिती मिळाली नाही. तिच्याबद्दल चिंता वाटू लागल्यामुळे मी तिच्या मित्रांनाही भेटण्यास सुरूवात केली,” असं ते म्हणाले.
7 / 9
आफताबला पोलिसांनी बोलावलं होतं. तेव्हा तो दोन चार दिवसांसाठी आला होता. तेव्हा त्याला श्रद्धा कुठे आहे असं विचारलं. त्यावेळी त्यानं आमचं ब्रेकअप झालं आणि ती दुसरीकडे निघून गेल्याचं म्हटलं. अडीच वर्षे तुम्ही एकत्र राहत होता आता ती सोबत राहत नाही, हे आम्हाला सांगायला हवं होतं ना असंही त्याला म्हटलं. यावर उत्तर देतान तुमच्याशी नातंच नाही तर ब्रेकअप बद्दल का सांगू असं उत्तर त्यानं दिलं. त्यामुळेच त्याच्यावर संशय आला आणि तो काहीतरी लपवतोय असं वाटल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं.
8 / 9
हत्येवेळी श्रद्धा प्रेगनंट असण्याची शक्यता दिल्ली पोलिसांना तपासात आढळून आली आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन किंवा घरी किंवा तिच्या मोबाइल फोनवर आढळलेल्या चॅटवरून ती गर्भवती असल्याचा खुलासा होऊ शकतो.
9 / 9
श्रद्धाचा खून केल्यानंतरही आफताबने तिचे इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया अकाऊंट चालवले. जून महिन्यापर्यंत त्याने श्रद्धाचा मोबाईलही चालू ठेवला होता, मात्र तो कोणाशीही बोलत नव्हता आणि फक्त मेसेजच्या माध्यमातून उत्तर देत होता. २६ मे रोजी त्याने श्रद्धाच्या खात्यातून ५४ हजार रुपयेही काढले होते.
टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरMaharashtraमहाराष्ट्र