शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Dagadi Chawl : 'डॅडी'च्या बालेकिल्ल्यात दडलंय काय?; लवकरच जमीनदोस्त होणाऱ्या 'दगडी चाळी'ची जबरदस्त गोष्ट

By पूनम अपराज | Published: May 21, 2021 8:30 PM

1 / 11
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडीच्या दगडी चाळीचा लवकरच पुनर्विकास होणार आहे. दगडी चाळ ही भायखळ्यात आहेत. अंडरवर्ल्डचं ठिकाण असलेली दगडी चाळ येथे गगनचुंबी इमारत उभारण्यात येणार आहे.
2 / 11
लवकरच दगडी चाळ येथे पुनर्विकास करण्यात येणार असून म्हाडाने यासाठी हिरवा कंदील दिला आहे. ज्यामुळे येणाऱ्या दिवसात येथे चाळी नसून मोठे टॉवर बांधण्यात येणार आहेत. दगडी चाळीत एकूण दहा चाळी आहेत. दगडी चाळ दक्षिण मुंबईतील भायखळा येथील अंडरवर्ल्ड डॅान अरुण गवळीचं साम्राज्य आणि बालेकिल्ला. याच ठिकाणी १९७० आणि ८० च्या दशकामध्ये जवळपासच्या परिसरात गिरणी कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार राहायचे. दगडी चाळ हा डॅान अरुण गवळीचा किल्ला कसा बनला, ज्या चाळीच्या नावाने अनेक लोकं घाबरतात त्या चाळी चा इतिहास काय? आपण जाणून घेऊया. 
3 / 11
अरुण गवळीचं ‘गीताई’ - दगडी चाळीत एकूण १० इमारती आहेत. त्यापैकी दोन इमारती अरुण गवळीच्या ताब्यात होत्या. त्यात ‘गीताई’ म्हणून त्याचं घर आहे. तर इतर इमारतीमध्ये रहिवाशी होते. नंतर उर्वरित आठ इमारती २००० साली अरुण गवळीने अंदाजे २ कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्या. नंतर अरुण गवळीनं राजकारणात प्रवेश केला. अखिल भारतीय सेना हा पक्ष स्थापन केला. एवढंच नाही तर आमदार म्हणूनही निवडून आला.
4 / 11
अरुण गवळीनं दगडी चाळीत बनवला होता छुपा मार्ग - डॅडी आणि दगडी चाळ’ हे कनेक्शन सगळ्यांचा माहिती आहेच. अरुण गवळीने १९७० आणि १९८० च्या दशकामध्ये याच दगडी चाळीतून आपली गवळी गँग चालवली. त्या काळात अरुण गवळीच्या नावापेक्षा दगडी चाळची दहशत मोठी होती. दगडी चाळीतून निरोप आलाय, असं ऐकताच भल्याभल्यांचा थरकाप उडायचा. पोलिस देखील दगडी चाळीत जायला घाबरत असत.
5 / 11
त्यानं लपण्यासाठी एक खास रुम बनवलेली होती. चाळीच्या तळ मजल्याच्या काही घरांतून एक भुयारी मार्ग बनवण्यात आला होता. खास रुममध्ये जाण्यासाठी किचन ओट्याखाली सिलेंडरच्या खाली एक बोगदा तयार केला होता. अटकेपासून वाचण्यासाठी अरुण गवळी या खाल रुमचा वापर करत होता. तर अरुण गवळी याने दगडी चाळीत एक तपास रुम, सेटलमेंट रुम तयार केली होती. येथे तो मुंबईतील बडे बिल्डर आणि व्यापाऱ्यांना बोलावून खंडणी घेत होता. तर काहींवर याच ठिकाणी तो थर्ड डिग्रीचा वापर देखील करी.
6 / 11
अंडरवर्ल्ड डॉन ते एक राजकारणी असा होता प्रवास - अरुण गुलाब अहिर उर्फ अरुण गवळी उर्फ डॅडी म्हणून ओळखला जाणारा अंडरवर्ल्ड डॉन आणि आता एक भारतीय राजकारणी बनला होता. १९७० च्या दशकात गवळी आणि त्याचा भाऊ किशोर (पप्पा) मुंबई अंडरवर्ल्डमध्ये दाखल झाले.
7 / 11
जेव्हा ते भायखळा, परळ आणि सात रास्ता या मुंबईच्या परिसरात कुख्यात असलेल्या रामा नाईक आणि बाबू रेशीम यांच्या नेतृत्वात असलेल्या भायखळा कंपनीमध्ये दाखल झाले. १९८८ मध्ये, रामा नाईक पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार झाल्यानंतर, गवळी यांनी ती टोळी ताब्यात घेतली आणि दगडी चाळ या त्याच्या निवासस्थानापासून आपली गँग चालवण्यास सुरुवात केली. त्याच्या नियंत्रणाखाली या टोळीने मध्य मुंबई भागातील बहुतेक गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवले जात असे. १९८० आणि १९९०च्या दशकादरम्यान डॅडीची गॅंग दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनी गॅंगला शह देण्यास सहभागी झाली होती.
8 / 11
मध्य प्रदेशातील खंडवा येथून गवळीचे वडील मुंबईत आले. १९७०-८०च्या दशकामध्ये अरुण गवळी गिरणगावातील मिलमध्ये काम करायचा. डॅडी दुध देखील विकायचा. १९८० च्या आसपास मिलचा संप झाला आणि मिल बंद पडल्यामुळे अनेक लोकं बेरोजगार झाले. नंतर दगडी चाळीतील अशाच बेरोजगार लोकांसोबत गवळीने चाळीतून आपली गँग चालवायला सुरूवात केली. या दगडी चाळीत अरुण गवळीचा दरबार भरायचा जिथे गवळी गँग लोकांचे सेटलमेंट, पैशांचा व्यवहार आणि इतर सर्व गँगची कामे चालत असत.   
9 / 11
प्रतिस्पर्धी गुंडांकडून हल्ला आणि पोलिसांच्या अटकेपासून बचाव करण्यासाठी अरुण गवळी त्याची झोपण्याची जागा बदलत असे. गवळी चाळीतील दुसऱ्या रहिवाश्यांच्या खोलीमध्ये जाऊन झोपायचा आणि त्या घरातील लोकांची राहण्याची व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी करण्यात येत असे. अखेर जुलै १९८९ मध्ये डॅडी पहिल्यांदा दगडी चाळीत पोलिसांच्या तावडीत सापडला. तो देखील अनोख्या ठिकाणी. आयपीएस अधिकारी अरविंद इमानदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुरेश वालीशेट्टी आणि त्यांच्या पथकाने त्या दिवशी दगडी चाळीत धाड टाकली. माहिती मिळाली होती की, गवळी एका लाल गाडीमधून दगडी चाळीत आला आहे. गवळी गॅंगचे  ६ वॉंटेड गुंड मिळाले पण गवळी नाही.
10 / 11
सतीश वालीशेट्टी यांना ती लाल रंगाची गाडी दिसली आणि गवळी दगडी चाळीत असल्याची कुणकुण लागली म्हणून पोलिसांनी पूर्ण चाळ शोधून पिंजून काढली आणि एका खोलीतील सोफा हलताना दिसला आणि त्या सोफ्यामध्ये तडीपार केलेल्या अरुण गवळी सापडला. 
11 / 11
२००० मध्ये गवळीने राजकारणात प्रवेश - अखिल भारतीय सेना या त्याच्या पक्षाच्या तिकीटावर तो आमदार म्हणून निवडून आला. त्याच्या पक्षाचे भायखळा परिसरात तीन नगरसेवक झाले. मात्र, त्यानंतरही त्याने अंडरवर्ल्डची साथ कायम ठेवली. शिवसेना नगरसेवक प्रकाश जामसांडेकर हत्येप्रकरणात त्याला दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अरुण गवळी सध्या नागपूर कारागृहात आहे. शिवसेना नगरसेवक प्रकाश जामसांडेकर हत्येप्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. 
टॅग्स :Arun Gawliअरुण गवळीunderworldगुन्हेगारी जगत