- अमृता कदमपोलंडमधलं छोटंस गाव झाल्पि. इथल्या बहुसंख्य लोकांचा मुख्य व्यवसाय शेती. या गावात राहणाऱ्या 70 वर्षांच्या आजीबाई दान्ता दिमॉन. सध्या त्या व्यस्त आहेत आपल्या घराचं विटांचं कुंपण रंगवण्यात. सुंदर, नाजूक फुला-फुलांच्या नक्षीनं त्या आपल्या घराचं कुंपण सजवत आहेत. या टुमदार शेतकरी गावात दिमॉन आज्जीबाई त्यांच्या या रंगीबेरंगी घरासाठीच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या घराचं छत, भिंती, पडदे, उशा, किटल्या बॉइलर, लाकडी चमचे आणि बरंच काही त्यांच्या फुलाफुलांच्या नक्षीनं सजली आहेत.पण हातात कुंचला घेऊन घर सजवणा ऱ्या झाल्पिमधल्या त्या एकट्याच नाहीत. गेल्या शतकभरापासून झाल्पिमधल्या स्त्रिया आणि अगदी क्वचित पुरूष परंपरागत लोककलांचा वापर करत आपल्या घराच्या भिंती आतून आणि बाहेरुन सुशोभित करतात. त्यामुळेच केवळ वृक्षवेलीच नाही तर ‘बहरलेल्या’ घरांचं हे पोलिश गाव पर्यटकांनाही आकर्षित करत आहे.गेल्या वर्षी जगाच्या वेगवेगळ्या भागांतून 25,000पर्यटक अवघ्या 700 लोकवस्तीच्या या गावाला भेट द्यायला आले होते. जपान, अमेरिका, रशियामधून पर्यटक झाल्पिमधल्या घराघरांवर अवतरलेला ‘वसंत’ पहायला आले होते. मका, कोबी, स्ट्रॉबेरीच्या शेतांमधली ही टुमदार रंगीबेरंगी कुसर केलेली घरं पाहात गावांतून फेरफटका मारणं हा डोळ्यांना आणि मनाला सुखावणारा अनुभव आहे.घरांवर नक्षीकाम करण्याच्या पद्धतीचा उगम 19 व्या शतकाच्या शेवटी-शेवटी झाला. खरंतर या कलाकुसरीला सुरूवात चुलींच्या धुरांमुळे काळवंडलेल्या घराच्या भिंतींना ठीकठाक करण्याच्या हेतूनं केली गेली, असं या गावातल्या कम्युनिटी सेंटरच्या प्रमुख वाँडा शालास्टावा यांचं म्हणणं आहे.घरगुती पद्धतीनं तयार केलेला कुंचला घेऊन स्त्रियांनी व्हाईटवॉशच्या मदतीनं या काळवंडलेल्या भिंतींना दुरूस्त करायला सुरूवात केली. हळुहळू त्या भिंतीवर ठिपके, रेषा, वर्तुळांच्या माध्यमातून आकृत्या चितारल्या आणि घरांवर डिझाईन काढण्याच्या परंपरेचा उगम झाला अशी माहिती स्वत:ला ‘हाऊस पेंण्टर’ म्हणवून घेणाऱ्या कम्युनिटी सेंटरच्या प्रमुख शालास्टावा देतात.पहिल्यांदा चितारलेल्या या फुलाफुलांच्या डिझाइन पांढर्या, काळ्या आणि हलक्या करड्या रंगामध्येच रंगवलेल्या असायच्या. हे रंग घरच्या घरीच बनवले जायचे. ब्रशही घोड्याच्या किंवा गार्इंच्या शेपटीच्या केसांपासून बायका घरीच तयार करायच्या.पर्यटकांच्या वर्दळीमध्ये 80 वर्षांच्या मारिया शालास्टावा यांनीही आपल्या काही आठवणींना उजाळा दिला. बऱ्याचदा घरांवर केलेलं हे नक्षीकाम हे पावसामुळे धुतलं जायचं आणि बायका पुन्हा रंग आणि कुंचला घेऊन सज्ज व्हायच्या. आता आलेल्या अॅक्रेलिक कलर्समुळे हे चित्र बदललं आहे. रंगामधलं वैविध्यही कमालीचं वाढलं आहे.मारिया यांच्या आई ही कलाकुसर करायची. त्यांना पाहतच लहानपणापासूनच त्या चित्रकला शिकल्या. त्यानंतर पुढची पिढी म्हणजे मारिया यांची मुलगी आणि आता नातही हातात रंग आणि कुंचला घेऊन चित्र काढत आहेत.गेली दहा वर्षे वसंत ॠतूमध्ये या गावात पेण्टिंगची स्पर्धाही होते. यावेळेस परीक्षक गावातल्या प्रत्येक घराला भेट देतात आणि त्यातून सर्वांत सुंदर घराची निवड करतात. त्यामुळे काहीजण आपल्या घरांना केवळ या स्पर्धेच्या वेळेसच सजवतात. मारिया किंवा दान्ता दिमॉनसारख्या हौशी आज्जीबाई वर्षभर आपल्या रंगकामात मग्न असतात.या नक्षीकामातली फुलं रेड पॉपीज, गुलाब किंवा डेझीच्या फुलांशी साधर्म्य साधणारी असली तरी ती काल्पनिक असतात. म्हणजे कल्पनेनं फुलांचे वेगवेगळे आकार चितारले जातात. त्यामुळे या घरांच्या भिंतीवर असलेली फुलं तुम्हाला कोणत्याही घराच्या अंगणात किंवा बागेत पाहायला मिळणार नाहीत. इतिहास, कला, स्थापत्य यांच्या अभ्यासकांना तर पोलंड आकर्षून घेतोच पण हा युरोपियन देश गेल्या काही वर्षांत सामान्य पर्यटकांनाही आपल्याकडे खेचतोय. त्यामुळे तुमचाही पोलंडला जायचा विचार असेल तर तीच तीच ठराविक पर्यटनस्थळं पहायला थोडा फाटा द्या आणि या ‘सदाबहार’ गावाला भेट द्या.