- मृण्मयी पगारे.‘ब्लॅक हेडस’. सौंदर्यातला प्रमुख अडथळा. चेहेऱ्याच्या अगदी दर्शनी भागात हे येतात.कितीही लोशन आणि क्रीम्स लावा ते काही जाण्याचं नाव घेत नाही. मृत त्वचा आणि तेल यामुळे निर्माण होणारा छोटा काळा डाग म्हणजे ब्लॅक हेडस. हे ब्लॅक हेडस नाकाच्या भोवती तर कधी गालावर दिसतात. कधी पाठ, मान आणि हातावरही दिसतात. ब्लॅकहेडसवर उपचार करणं अवघड वाटत असलं तरी त्यावरचे उपचार अगदीच सोपे आणि सहज आहे. त्यासाठी कुठे दुकानात नाही तर आपल्या स्वयंपाकघरात जाण्याची गरज आहे. स्वयंपाकघरातले आठ घटक ब्लॅक हेडसना कायमचं निकालात काढू शकतात.1.बेकिंग सोडा.बेकिंग सोडा हा फक्त बेकच्या पदार्थांमध्ये वापरला जाणारा किंवा स्वच्छतेसाठी उपयुक्त घटक आहे असं नाही. सौंदर्य उपचारातही बेकिंग सोड्याला खूप महत्त्व आहे. अॅण्टिसेप्टिक गुणधर्मामुळे बेकिंग सोडा त्वचेसाठी फायदेशीर ठरतो. बेकिंग सोडा त्वचेसाठी वापरल्यास त्वचेवरच्या मृतपेशी निघून जातात. त्वचा मऊसूत होते. बेकिंग सोडयानं ब्लॅकहेडसही निघून जावू शकतात. त्वचेचा पी एच बेकिंग सोड्यानं वाढतो. त्यामुळे त्वचेवर अतिरिक्त तेल निर्माण होत नाही.आणि त्यामुळे ब्लॅकहेडसही निर्माण होत नाही.यासाठी एका चिनी मातीच्या वाटीत एक चमचा बेकिंग सोडा घेवून त्यात थोडं पाणी मिसळावं. बेकिंग सोड्याची पेस्ट तयार होइल इतकं पाणी घालावं. ही पेस्ट त्वचेवर जिथे ब्लॅक हेडस आहे तिथे लावावी. दहा मीनिटं सुकू द्यावी आणि मग कोमट पाण्यानं लेप धुवून टाकावा. आठवड्यातून किमान दोनदा हा उपचार करावा. 2. दालचिनीदालचिनी हा मसाल्यातला सुगंधी घटक. यामुळे पदार्थांना एक वेगळाच स्वाद येतो. पण या मसाल्याचा वापर करून चेहेऱ्यासाठी सुगंधी पावडर तयार करता येते. ज्याचा उपयोग ब्लॅक हेडस काढणाऱ्या लेपासाठी करता येतो. दालचिनीमध्ये अॅण्टिबॅक्टेरिअल घटक असतात. दालचिनीच्या वापरामुळे खडबडीत त्वचा निघून जाते. दालचिनीच्या पावडरचा उपयोग बॉडी स्क्रबसारखा होतो. त्यामुळे त्वचा मऊ होवून उजळतेही.ब्लॅकहेडसाठी दालचिनीचा वापर करताना एक चमचा दालचिनी पावडर घ्यावी त्यात दोन चमचे मध मिसळावं. हा लेप ब्लॅकहेडसवर लावावा. हा लेप पंधरा मीनिटं त्वचेवर ठेवावा. नंतर क्लीन्जरनं चेहेरा धुवावा. चेहेरा मऊ रूमालानं टिपून घ्यावा. नंतर त्यावर मॉश्चरायझर लावावं. हा उपाय त्वचेवर रोज करता आला तर उत्तम. 3. ओटमीलसकाळच्या नाश्त्यात ओटमीलला अतिशय महत्त्व आहे. ओटमील मध्ये असलेल्या भरपूर पोषणमूल्यांमुळे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी ओटमीलचा उपयोग फायदेशीर ठरतो. ओटमील क्लीन्जरसारखं काम करतं. त्वचेवरील ब्लॅकहेडस ओटमीलमुळे निघून जातात. ओटमीलमध्ये अॅण्टिआॅक्सिडंट असतात जे त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम असतात तसेच ओटमीलमध्ये दाहविरोधी घटक असल्यानं ज्यांच्या त्वचेला खाज येते त्यांच्यासाठीही ओटमील फायदेशीर ठरतं.ब्लॅकहेडसाठी ओटमील वापरताना पॅकेटवर लिहिलेल्या सूचनेनुसार ते शिजवावं. ते शिजवताना त्यासाठी बाटलीबंद पाणी वापरावं. त्यात दूषित घटक नसतात. शिजवल्यानंतर हे ओटमीलचं मिश्रण गार होवू द्यावं. आणि नंतर मग ते ब्लॅकहेडस असलेल्या ठिकाणी लावावं. दहा ते पंधरा मीनिटं ते तसंच ठेवावं. आणि मग कोमट पाण्यानं ते धुवून काढावं. 4. लिंबाचा रसलिंबाच्या रसात त्वचेला उपयुक्त असणारे अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड, सायट्रिक अॅसिड असतं. जे अॅस्ट्रीजण्ट म्हणून काम ंकरतं. आणि म्हणूनच लिंबाचा रस त्वचेला लावल्यास मृतत्वचा निघून जाते. लिंबाच्या रसात असलेल्या सी जीवनसत्त्वामुळे आणि अॅण्टिआॅक्सिडंट गुणमधर्मामुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं. त्वचेवरील डाग निघून जातात.ब्लॅकहेडसाठी लिंबाचा रस वापरताना एक चमचा लिंबाचा रस घ्यावा. त्यात कापसाचा बोळा बुडवून तो बोळा ब्लॅकहेडस असलेल्या ठिकाणी लावावा. दहा मीनिटं हा रस त्वचेवर सुकू द्यावा. नंतर थंड पाण्यानं चेहेरा धुवून काढावा. दिवसातून एकदा तरी लिंबाचा रस चेहेऱ्याला लावला तर उत्तम फायदा मिळतो. 5. ग्रीन टीग्रीन टीमध्ये असलेल्या जीवनसत्त्वामुळे आणि अॅण्टिआॅक्सिडंटमुळे त्वचेवरचं अतिरिक्त तेल निघून जातं. त्वचेवरील पुरळमुळे होणारा दाह ग्रीन टीच्या उपयोगामुळे कमी होतो. तसेच भविष्यात त्वचा खराब होत नाही.ब्लॅकहेडसाठी ग्रीन टीचा उपयोग करताना एक कप पाणी चांगलं उकळून घ्यावं. नंतर ग्रीन टीची एक बॅग त्यात बुडवावी. बॅग नसेल तर सेंद्रिय ग्रीन टीची दोन चमचे पूड पाण्यात टाकावी. हे मिश्रण एक तास तसंच ठेवावं. नंतर ते गाळून घ्यावं. हे द्रावण ब्लॅकहेडसवर टाकावं. ते दहा मीनिटं सुकू द्यावं. नंतर चेहेरा गार पाण्यानं धुवावा. तो मऊसूत कापडानं टिपून नंतर चेहेऱ्यावर मॉश्चरायझर लावावं. 6. मधमधात जीवाणूविरोधी घटक असतात तसेच मधात अॅण्टिसेप्टिक घटकही असतात. त्वचेवरचे किटणू, घाण ही मधाच्या वापरानं निघून जाते. मधामुळे चेहेऱ्याची त्वचा घट्ट होते. सुरकुत्या पडत नाही. तसेच चेहेऱ्यातला ओलावाही वाढतो. काहींना मात्र मधाची अॅलर्जी असू शकते. त्यांनी आधी आपल्याला अॅलर्जी तर नाही ना हे बघून मध वापरावं.ब्लॅकहेडसाठी मध वापरताना एक चमचा शुध्द मध गरम करावं. किंवा मध एका वाटीत घेवून ती वाटी गरम पाण्यात ठेवावी. नंतर हे मध ब्लॅकहेडस असलेल्या ठिकाणी लावावं. ते दहा मीनिटं तसंच ठेवावं. नंतर कोमट पाण्यात कापूस बुडवून चेहेरा स्वच्छ करावा. 7 हळदऔषधी गुणमधर्मात हळदीचा हात कोणीच धरू शकत नाही. ब्लॅकहेडसाठी हळद वापरताना कस्तुरी हळद वापरावी. ही हळद खाण्यासाठी वापरली जात नाही. थोडी कस्तुरी हळद घ्यावी. त्यात थोडं पाणी किंवा नारळाचं तेल घालून त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट ब्लॅकहेडसवर लावावी. दहा पंधरा मीनिटांनी चेहेरा कोमट पाण्यानं धुवावा. हा उपाय रोज केला तर ज्यांना ब्लॅकहेडस नाही आहे त्यांना पुढे भविष्यातही ब्लॅकहेडसचा धोका राहात नाही. 8. सैंधव मीठसैंधव मीठाच्या वापरामुळे मृत त्वचा आणि अतिरिक्त तेल निघून जातं. एक चमचा सैंधव मीठ घ्यावं. ते अर्धा कप गरम पाण्यात मिसळावं. त्यात चार थेंब आयोडिन घालावं. ते मिश्रण मीठ विरघळेपर्यंत हलवत राहावं. नंतर हे मिश्रण जरा कोमट होवू द्यावं. कोमट झाल्यावर जिथे जिथे ब्लॅकहेडस आहे तिथे ते चोळावं. ते चेहेऱ्यावर सुकू द्यावं. आणि नंतर कोमट पाण्यानं चेहेरा धुवावा. आणि सुती कापडानं चेहेरा टिपून काढावा.