एकिकडे ट्रम्प यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड आणि दुसरीकडे ५०० आणि १०००च्या नोटा रद्द असे दोन मुद्दे ट्रेंडिंग होत असताना साहेबांच्या देशाच्या पंतप्रधान थेरिसा मे सध्या सोशल मीडियावार प्रचंड गाजत आहेत.पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच भारत दौऱ्यावर आलेल्या थेरसा यांनी येथील पारंपरिक वेशभूषा असलेली साडी परिधान करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. बंगळुरूमधील श्री सोमेश्वर मंदिरात थेरसा यांनी सोनरी व हिरव्या रंगाची साडी घालून दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत दोन पुजारीदेखील होते.तीन दिवसीय दौऱ्यामध्ये थेरेसा यांनी बंगळुरूमध्ये असताना व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून हलासुरू भागातील या प्रसिद्ध मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मनोभावे भगवान शंकराची पूजा केली. मंदिर प्रशासनाकडून त्यांना या भेटीची आठवण म्हणून भेटदेखील देण्यात आली. युरोपियन महासंघातून (ईयू) बाहेर पडण्याच्या बाजूने कौल (ब्रेक्झिट) मिळाल्यावर पूर्व पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर थेरेसा मे यांची इंग्लंडच्या पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. मार्गारेट थॅचरनंतर ब्रिटिश प्राईम मिनिस्टर होणाऱ्या त्या दुसºया महिला आहेत.बंगळुरूमध्ये आल्यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. निवडक व्यवसायिकांशी मग त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी एक शासकीय प्राथमिक शाळा आणि विमानकंपनी ‘एअरबस’ला सेवा पुरवणाऱ्या हाट-टेक कंपनीला भेट दिली. बरं साडी परिधान करण्याची त्यांची ही काही पहिलीच वेळ नाही. थेरेसा मे यांनी अनेक समारंभांमध्ये साडी आणि इतर भारतीय पोषाख घालून वेळोवेळी हजेरी लावलेली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्या दिवशी त्यांनी आॅफिसला जाताना साडी घातल्याची बातमी प्रचंड गाजली होती. मात्र, ती अफवा ठरली.भारत आणि भारतीय लोकांशी निगडित कार्यक्रमांना थेरेसा आवर्जुन भारतीय ड्रेसला प्राधान्य देतात. ‘एशियन रिच लिस्ट लाँच’ या कार्यक्रमाला त्यांनी सलवार कमीज घातली होती. त्यांच्या या भारतप्रेमामुळे भविष्यात ब्रिटनसोबत आपले संबंध आणखी मजबुत होतील, अशी आशा आहे. ते बाकी असो, थेरेसा मे साडीमध्ये अत्यंत शालीन आणि सुंदर दिसतात हे खरं! त्यांच्या या चॉईसमुळे जागतिक पातळीवर पारंपरिक भारतीय वेशभूषा ठळक उठून दिसेल. हो ना!