-मयूर देवकर‘तू सुंदर नाहीस, मर तू. तू मेली तरी कुणालाही काहीही फरक पडणार नाही. कुणी रडणारही नाही. कुणी तुझ्या अंत्यसंस्कारालाही येणार नाही. दे जीव, तू जीव दिलेलाच बरा’ असं कुणी कुणाला एरव्ही म्हणेल का? ते ही सोशल मीडियात? आणि ते ही एका बारा वर्षाच्या मुलीला?पण अलीकडेच असं घडलं. आणि जगभर त्या बातमीनं सोशल मीडिया अभ्यासक अस्वस्थ झाले. कॅनडातील फर्स्ट नेशन येथील १२ वर्षांच्या दोन मुलींना आत्महत्त्या करण्यासाठी प्रवृत्त करणारे मेसेज सोशल मीडियावर त्यांना पाठवण्यात आल्याचं आढळलं. त्यांपैकी एका मुलीच्या आईने ते सर्व मेसेज फेसबुकवर शेअर केले, जेणेकरून दुसऱ्या कोणाला अशा प्रकारच्या त्रासातून जावे लागू नये.वयात येणारी, मनमोकळेपणानं सारं खुलेआम शेअर करणारी तरुण मुलं. त्यांच्या दु:खावर अशी मिठाची पोती कुणी का म्हणून ओतत असेल? का छळत असेल त्यांना?आणि आपलं आयुष्य, मनातल्या वेदना अशा जाहीर मांडून ठेवणाऱ्या तरुण मुला-मुलींच्याही एक गोष्ट का लक्षात येत नाही?ती गोष्ट म्हणजे, तुम्ही मांडत असलेलं दु:ख सोशल मीडियावर अनेक ांसाठी केवळ मनोरंजन असतं. लोक वाचतात, चार घटका चर्चा करतात. हसतात. मनोरंजन करून घेतात. आपली खिल्ली उडवण्यासाठी इतरांना एक कारण मिळतं. तुमच्या मनाचा, भावनांचा जराही विचार न करता‘लूज कॉमेंट्स’ पास केल्या जातात. ‘सायबर बुलिंग’ किंवा ‘सायबर अब्युज’ हे आता फार प्रचलित शब्द बनले आहेत, हे सारं म्हणजे तेच. अगदी जीवघेणं. टोकाचं. मुलांचं आॅनलाइन अॅक्टिव्ह राहण्याचं प्रमाण जसंजसं वाढतंय आणि यूजर्सचं वय जसं जसं कमी होतंय तशी ही आॅनलाइन कुचंबना अनेकांसाठी भयावह होत चालली आहे. आपल्या आयुष्यात घडणारी एकूण एक लहानसहान गोष्ट इतरांशी शेअर करण्याची घाई, वृत्ती आणि चटकही अनेकांसाठी एक मोठं संकट घेऊन येते.आपण हे सारं लिहितो. ते म्हणजे इंटरनेटच्या जगातल्या आपल्या डिजिटल पाऊलखुणाच. आपण पुसायच्या म्हटल्या तरी त्या पुसल्या जात नाहीत. ‘हेटर्स’ म्हणजे दुसऱ्यांना छळणारे जे असतात ते मग या पाऊलखुणांवरून चालत आपला माग काढत राहतात. छळत राहतात आपल्याला. त्यामुळे आपला आॅनलाइन वावर किती मर्यादित आणि कोणत्या स्वरूपाचा ठेवायचा याचा विचार केलेला बरा. केवळ लाइक्स मिळवण्यासाठी किंवा ‘कूल’ म्हणून मिरवण्यासाठी सोशल मीडियाचा अविचारी वापर करणं हे अत्यंत धोक्याचं आहे. आपल्या मनातला राग, चीड व्यक्त करण्यासाठी जरी हे उत्तम व्यासपीठ असलं तरी ते सारं वाचतंय कोण याकडेही लक्ष ठेवायला हवं? कशावरून फक्त आपले मित्रच वाचत असतील? काही समाजकंटक, काही नतद्रष्ट लोक ते ही आपला मजकूर वाचून कमेण्ट करत असतील, किंवा त्यातून आपल्याशी सलगीही करण्याचा प्रयत्न करत असतील. त्यात मनानं खचलेल्या, दु:खीकष्टी मुला-मुलींना गोड बोलून जाळ्यात ओढणारे कमी असतात असं नाही. आपल्या फोटोला किती लाइक्स मिळतात यावरून आपलं सामाजिक वजन आणि लोकप्रियता अनेकजण स्वत:च्या नकळतही ठरवून टाकतात. ते कमी मिळालं की अजून उदास होतात. डिप्रेस्ट होतात. एकटेपणा असतोच तो जास्त छळायला लागतो. मग परस्पर स्पर्धा सुरू होते, भला तेरी लाइक्स मेरी लाइक्स से जादा कैसी? आणि इतरांच्या नजरेतून स्वत:ला तोलणं सुरू होतं.. त्यातून मग इतरांनी केलेले अपमान, जाहीर टीका हे सारं जास्त जिव्हारी लागतं. इतकं की डिप्रेशनच्या दरीत अनेकजण खोल लोटून देतात स्वत:ला..आपल्याला काही करता येईल?‘डिप्रेशन’, ‘स्ट्रेस’, ‘नैराश्य’ हे शब्द तरुणांचं वर्णन करताना सहज वापरले जातात. त्यामुळे आपल्या मनातील खदखद बाहेर पाडण्यासाठी ते सोशलमीडियाचा वापर करतात. आपल्या फ्रेण्ड लिस्टमधील कुणी जर रागानं किंवा नैराश्यानं काही पोस्ट शेअर करत असेल ते ‘कॅज्युअली’ घेऊ नका. त्यांची टिंगल करू नका. त्याची चेष्टा तर नकोच.त्यापेक्षा त्यांना फोन करा, जाऊन भेटा. त्यांच्या पोस्टवर सकारात्मक कमेंट करा, धीर द्या. आणि जर कोणी त्यांना चुकीचा सल्ला देत असेल तर तो वेळीच थांबवा. इतरांचं रडगाणं आणि आपलं मनोरंजन असं करू नका. रोजच्या वागण्या-बोलण्यातूनही जर व्यक्तीच्या स्वभावात काही बदल दिसत असतील तर त्वरित विचारपूस करा. ‘आपली कुणालाच काळजी नाही’ अशी धारणा बहुतेकांची असते. त्यामुळे आपल्या सभोवताली किंवा फ्रेण्ड सर्कलमध्ये प्रत्येकाशी अधूनमधून वैयक्तिक संपर्क साधला पाहिजे. हीच गोष्ट पालकांनाही लागू होते. पालकांनीसुद्धा मुलांच्या आॅनलाइन अॅक्टिव्हिटीवर नजर ठेवली पाहिजे.निदान असं वागू नये..हे तर सर्वांनाचा माहीत आहे की, फेसबुकवर अतिखासगी माहिती शेअर करू नये. त्याचप्रमाणे आपल्या खासगी भावनांचेदेखील खुलं प्रदर्शन मांडू नये. प्रत्येक वेळी पोस्ट करण्यापूर्वी एक विचार करावा की, मी जे हे शेअर करतोय ते खरोखरंच जगाला माहीत होणं गरजेचे आहे का? मी कोणत्या हॉटेलमध्ये जातो, काय खातोय, कोणासोबत आहे. याची इत्थंभूत माहिती लोकांशी शेअर करण्याची खरंच गरज आहे का? असं सतत जगाला ओरडून ओरडून सांगितले पाहिजेच का? का म्हणून दुसऱ्यांच्या ‘अप्रुव्हल’चा अट्टाहास धरून बसावा? एखाद्या मुद्द्यावर साधक बाधक चर्चा असेल तर ठीक पण उगीच आपल्या दैनंदिन कार्यक्रमाची यादीच फेसबुकवर टाकण्यात कोणतं सोशल नेटवर्किंग होतं? समाजमाध्यमांचा आपण कसा उपयोग करतो यावरून त्यांची उपयुक्तता सिद्ध होत असते. त्यामुळे ‘घेतला घास की, टाक ‘एफबी’वर’ अशा वागण्यामुळे ‘लांडगा आला रे आला’सारखी गत होण्याची शक्यता अधिक असते. तो लांडगा येऊ न देणं हेच जास्त हिताचं..