सारिका पूरकर-गुजराथीघरातील छोट्या-छोट्या वस्तूंना जर घरगुती वस्तूंनीच सजवलं तर खूप काही क्रिएटिव्ह करता येतं. उगाचच किचकट कलाप्रकारांना हाताळण्यापेक्षा, महागडी शोपीस आणण्यापेक्ष या छोट्या गोष्टींमधील मोठ्या क्रिएटिव्हिटीचा आनंद घेता येतो. घर सजवण्याचे सोपे प्रयोग१) जुन्या पद्धतीचा लाकडी स्टूल असेल तर तो घ्या. त्याला पांढऱ्या रंगात रंगवून घ्या. वाळला की उलटा ठेवा. आता पाय ठेवण्यासाठीची जागा वर येईल, त्या भागावर घरातील जुन्या कपड्यांच्या पिशव्या शिवून त्या अडकवा. यात तुम्ही छोट्या-छोट्या वस्तू ठेवूू शकता.२) काचेचा आकर्षक जार घ्या. यात तुमच्या आवडीचा अॅक्रेलिक रंग ओतून घ्या. फार नको, दोन चमचे पुरेसा होईल. रंग ओतल्यावर जारभर तो रंग जार फिरवत फिरवत पसरवून घ्या. रंग वाळला की बघा किती छान इफेक्ट मिळेल. बाहेरुन तुम्ही आऊटलाईनरनं हवे ते डिझाईन काढून सजवू शकता. सुंदर फ्लॉवर वासे तयार.३) फुलं ठेवण्यासाठी जसा वासे असतो ना तसे लहान आकाराची फुलं, कळ्या ठेवण्यासाठीही छोटा वासे असतो. तो तयार करण्यासाठी प्लॅस्टिकचे छोटे ग्लास, काचेचे छोटे ग्लास घ्या. आकर्षक रंगीत फुगे घेऊन त्याचा वरचा भाग , जेथून हवा भरतो तो थोडासा कापून टाका. आता फुगा ग्लासभोवती पूर्ण गुंडाळून घ्या. ग्लास रंगीत दिसेल, वरच्या भागावर थोडे होल करुन यात कळ्या, छोटी फुले अरेंज करा. असे चार-पाच रंगीत वासे एकत्र ठेवता येतील.४) घराच्या, गाडीच्या, कपाटाच्या, आॅफिस ड्रॉवर्सच्या चाव्या त्याच त्या रंगात पाहून बोअर झालात ना ! त्यांचा मेकओव्हर करुन टाका. बाजारात ग्लिटर्स मिळतात (पूड आणि लिक्विड स्वरुपात) पूड वापरत असाल तर चावीच्या वरच्या भागावर फेविकॉल लावून पूडमध्ये घोळवा. बस्स, लखलखीत चावी तयार. लिक्विड वापरत असाल तर ब्रशनं थेट चावीवर लावून वाळू द्या.५) लहान-मोठया आकारातील झाडाच्या वाळलेल्या फांद्या घ्या. कात्रीनं त्याचे छोटे तुकडे कापून घ्या. कुंड्यांवर, फ्लॉवरपॉट्सवर हे तुकडे चिकटवून हटके लूक मिळवा.७) आकर्षक रंगातील पेपर कप घ्या (जे कप केकसाठी वापरतात, जरा जाडसर कागद हवा) त्यांच्या कडा कापून फुलाचा आकार द्या. प्लेन कप आणि फुलाचा आकार दिलेला कप लायटिंगच्या बारीक दिव्यांमध्ये अडकवा. फुलांची लायटिंग तयार होईल.८) वर्तमानपत्राचे दोन आडवे समान तुकडे करा. प्रत्येक तुकड्याच्या एका कोपऱ्यावर झाडूची काडी ठेवून गुंडाळी करुन घ्या. शेवटचे टोक चिकटवून काडी काढून घ्या. अशा पेपर स्ट्रॉ तयार करुन घ्या. आता एक स्ट्रॉ घेऊन ती हातानं दाबून चपटी करा आणि पेनाभोवती गुंडाळून घ्या. टोक चिकटवून घ्या. असेच भरपूर रोल बनवून घ्या. या रोलचा वापर करुन तुम्ही सुंदर बाऊल, टी-कोस्टर्स, वॉल हॅँगिंग, फोटो फ्रेम, डेकोरेटिव्ह मिरर, लॅम्पशेड बनवू शकता.अशा उपायांनी आपलं घर तर सुंदर दिसतंच शिवाय आपल्यातली ‘क्रिएटिव्हिटी’ही बाहेर येते.