- मयूर पठाडे एखाद्या सलूनमध्ये, ब्युटी पार्लरमध्ये हेअर कट करायला तुम्ही जाता, तेव्हा काय करता? आपल्याला आवडणार्या पार्लरमध्ये आपण जातो आणि सरळ आपल्याला आवडेल तशी हेअरस्टाईल करतो. पण हे करत असताना आपल्या त्या कापलेल्या केसांचं आपण काय करतो?- खरं तर काहीच नाही. त्या फेकलेल्या केसांचं आपल्याला काही अप्रूपच नसतं. कारण आपल्याला माहीत असतं, महिना-दोन महिन्यात हे वाढलेले केस कापण्यासाठी, नवी हेअरस्टाईल करण्यासाठी आपल्याला पुन्हा इथे यायचंच आहे.पण कल्पना करा, ज्यांच्या डोक्यावर केसच नाहीत किंवा कॅन्सरसारख्या आजारामुळे, ब्रेन सर्जरीमुळे किंवा ज्यांच्या डोक्यावर आता परत कधीच केस उगवणार नाहीत, त्यांना या केसांच महत्त्व किती असेल? कॅन्सरमुळे आणि सततच्या केमोथेरपीमुळे ज्या रुग्णांच्या डोक्यावरचे केस भसाभसा गळून पडतात आणि काही दिवसांतच डोक्यावरचं केसांचं जंगल जाऊन तिथे वैराण वाळवंट तयार होतं, त्यांना आपल्या या अवस्थेचं काय वाटत असेल?डॉक्टरांसहित अनेक तज्ञ आणि स्वत: पेशंट याबाबत सांगतात, प्रत्यक्ष आजारापेक्षाही आपल्या डोक्यावर आता केस नाहीत, पुढेही येतील की नाही याची शाश्वती नाही याचीच आम्हाला सर्वात जास्त भीती वाटते. आपल्याच भकास चेहर्याकडे पाहाताना त्या आरशीही भीती आणि तिटकारा वाटायला लागतो. आपला चेहरा इतरांनीच काय, आपण स्वत:ही कधीच पाहू नये असं वाटायला लागतं. अशा लोकांकडे पाहून तरी हेअरस्टाईल करताना फेकून दिल्या जाणार्या आपल्या या केसांचा जरा विचार करा. ज्यांच्या डोक्यावर केस नाहीत, त्यांना आपल्या डोक्यावर पुन्हा केस दिसण्यासाठी एकच मार्ग असतो, तो म्हणजे केसांचा विग घालणं. पण तेही इतकं सहज, सोपं आणि स्वस्त नाही. चांगल्या विगसाठी 25 ते 30 हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो. सर्वसामान्य माणसं, जी आधीच कॅन्सरसारख्या आजारानं, त्याच्यावरच्या उपचारानं आणि खर्चानं हतबल झालेली असतात, त्यांच्यासाठी नुसत्या केसांसाठी आणि तेही नकली केसांसाठी एवढा खर्च करणं आवाक्याबाहेरचंच असतं.पण अशाच लोकांसाठी अनेक स्वयंसेवी संस्था (एनजीओ)आता पुढे आल्या आहेत. विगमेकर्सच्या मदतीनं रुग्णांना ते फुकट विग पुरवतात. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक रुग्णांच्या चेहर्यावर मावळलेलं हसू पुन्हा उमललं आहे. त्या त्या रुग्णांच्या चेहेर्यानुसार आणि त्यांच्या चेहेरेपट्टीला साजेसा विग तयार केला जातो आणि तो त्यांना भेट दिला जातो. साध्या केसांमुळे अनेक रुग्णांचा आत्मविश्वास कमालीचा वाढून ते आपल्या आजारपणाला हसत हसत सामोरे जातात हे सिद्धदेखील झालं आहे. त्यामुळे अशा स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधून आपण त्यांना आपले केस दान करू शकता. त्यातून तयार होणारे विग अनेक रुग्णांच्या चेहर्यावर हसू फुलवतील. शिवाय या दानासाठी कोणतेही कष्ट घेण्याची गरज नाही. जे आपण फेकून देतो, त्यातूनच पुण्य मिळविण्याची ही किमया आहे. रुग्णांना का हवा असतो विग? कॅन्सरसारख्या आजाराशी झगडताना रुग्णांना त्यांच्या डोक्यावरचे केसही गमवावे लागतात. त्याचं त्यांना अपार दु:ख होतं, पण त्याहीपेक्षा ज्या रुग्णांना लहान मुलं आहेत, त्यांच्यासमोर आपण अशा अवस्थेत जाऊ नये, मुलांना त्यामुळे मोठा धक्का बसेल आणि आपल्यापेक्षाही हा धक्का पचवणं मुलांना जड जाईल, असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे अनेक रुग्ण आपल्याला जीवापेक्षाही प्रिय असणार्या आपल्या मुलांपुढे या अवस्थेत जाणं टाळतात. केसांच्या विगमुळे त्यांच्या मनावरचं हे प्रचंड मोठं दडपण त्यामुळे हलकं होतं. कोणाशी संपर्क साधाल? मदत चॅरिटेबल ट्रस्ट, हेअर एड, सारगाक्षेत्र कल्चरल अँण्ड चॅरिटेबल सेंटर, हेअर फॉर होप. यासारख्या अनेक स्वयंसेवी संस्था केसदान जनजागृतीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन कार्य करतात. विशेषत: मोठय़ा शहरातं, महानगरात या संस्था विशेषत्वानं कार्यरत आहेत. रुग्ण आणि दाते यांच्यातल्या संपर्काचं आणि रुग्णांना केसांचे विग मोफत देण्याचं काम ते करतात.