- सलोनी सरगम सुंदर दिसण्यासाठी कोण काय करेल, याचा खरंच काही नेम नाही. कोणी प्लास्टिक सर्जरी करतं, कोणी ट्रान्सप्लान्टेशन करतं तर कोणी काही. आता ही अमेरिकन मॉडेलच पाहा. सुंदरतेच्या हव्यासापोटी ती काय करीत असेल? आश्चर्य वाटेल, आपली कांती नितळ दिसावी यासाठी ती चक्क स्वत:च्याच रक्तापासून बनवलेलं क्रीम वापरते! या प्रसिद्ध मॉडेलचं नाव आहे हॅले बाल्डवीन! अर्थात असं करणारी ती काही पहिलीच मॉडेल, सुंदरी नाही. याआधी प्रसिद्ध रिअँलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशिअन हिनंही 2013मध्ये जाहीर केलं होतं, तिच्या सौंदर्याचं गुपित! तीदेखील आपल्या त्वचेच्या सुंदरतेसाठी स्वत:च्या रक्तापासून तयार केलेल्या क्रिमचा वापर करीत होती. तिच्या या खुलाशानंतर जगभर प्रचंड खळबळ उडाली होती. किम कर्दाशिअननंतर हॅले बाल्डविननं तिचाच कित्ता गिरवताना पुन्हा एकदा नव्यानं खळबळ उडवली आहे. स्वत: हॅले बाल्डविननंच ‘लूक मॅगझिन’कडे हा खुलासा करताना सांगितलं, एका त्वचारोगतज्ञानं बनवलेलं लोशन मी माझ्या कांतीच्या सौंदर्यासाठी वापरते. हा तज्ञ नियमितपणे माझ्याकडे येतो. माझ्या हातातलं रक्त काढल्यानंतर एका मशीनमध्ये त्यावर प्रोसेसिंग केलं जातं. एका खास मशीनमधून ते फिल्ट केल्यानंतर त्यातून ब्लड सेल्स वेगळे काढले जातात. या प्रकाराला म्हणतात ‘व्हॅम्पायर फेशिअल’! हॅले बाल्डविन सांगते, मी माझ्या स्किनबाबत खरोखरच खूपच ‘सायको’ आहे आणि त्यासाठी मी काहीही करण्यास तयार असते आणि माझ्या त्वचेची मी खूप काळजीही घेते. वीस वर्षीय सुंदरी हॅले बाल्डविन ही प्रसिद्ध अभिनेते स्टिफन बाल्डविन यांची मुलगी आहे. खरंतर हॅले बाल्डविनला व्हायचं होतं, प्रोफेशनल बॅले डान्सर, पण पायाला दुखापत झाल्यामुळे हे करिअर तिला अध्र्यावरच सोडावं लागलं आणि नंतर ती मेडिकल टर्मिनॉलॉजीकडे वळली. त्यानंतर तिला ओढ लागली ती मॉडेलिंगची आणि आता त्यातच ती करिअर करते आहे.मॉडेलिंगच्या करिअरसाठी अर्थातच तुमच्या चेहर्याला आणि सौंदर्याला आत्यंतिक महत्त्व असतं. तुम्हाला कायम सतेज, सुंदर आणि तरुण राहावं लागतं. ती त्यासाठीची पहिली आणि बेसिक गरज आहे. त्यामुळेच हॅले बाल्डविननं आता आपलं सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी आधार घेतला आहे तो स्वत:च्याच रक्तापासून बनवलेल्या क्रीमचा. त्याचा तिला किती फायदा झालाय?आता हे मोजमाप आपण करण्यात काय फायदा?हॅले बाल्डविन म्हणते या क्रिमचा मला प्रचंड फायदा झालाय आणि होतोय.आता ती म्हणतेय, तर होतच असणार तिला फायदा! नाही का?.