- मोहिनी घारपुरे - देशमुखरोज रोज पंजाबी ड्रेस किंवा जीन्स नाहीतर लेगिन्स-जेगिन्स घालून वैतागला असाल तर पलाझो पॅण्ट्स नक्की ट्राय करा आणि आपल्या रोजच्या आउटफीटला एक ब्रेक द्या!हल्ली अनेक फॅशनेबल मॉडर्न तरूणींच्या वॉर्डरोबमध्ये हक्काचं थान मिळवलेली पॅण्ट म्हणजे पलाझो. पायघोळ अशी ही पॅण्ट कंबरेपासून पायाच्या टोकापर्यंत त्रिकोणी आकार घेत घोट्यापाशी चांगलीच रूंदावलेली असते. काहीशा तलम कपड्यांमध्ये ही पॅण्ट अधिक शोभते मात्र कॉटनमधील पलाझोलाही तितकीच पसंती मिळते हे विशेष. विशेषत: उन्हाळ्यातील फॅशनकरीता या पलाझोंची हमखास निवड केली जाते. साधारणत: 60 च्या दशकाच्या शेवटी आणि 70च्या दशकाच्या सुरूवातीला या पलाझोचा ट्रेण्ड रूजला. आपल्याकडे परवीन बाबी, झीनत अमान या अभिनेत्रींच्या काळात हा ट्रेण्ड आला. इतकं च नव्हे तर अनेक नटांनीही केवळ स्टाइल म्हणून काही चित्रपटात या पलाझोसदृश पॅण्ट्स वापरल्या आहेत असं दिसून येतं. मात्र पुरूषांपेक्षाही महिलांसाठीच्या पलाझोचा बॉटम अत्यंत सैल आणि मोठा असतो. विशेषत: कॉटन, क्रेप किंवा सिल्कच्या स्लीव्हलेस किंवा थ्रीफोर्थ बाह्यांच्या कुर्ती या पलाझोजवर अधिक उठून दिसतात तसेच त्यावर गळ्यात जर एखादा स्मार्ट्सा स्टोल घेतला तर आणखीणच ऐटबाज लूक येतो.या पलाझोज आपल्याकडे अद्याप घराबाहेर घालण्यास मोठ्या संख्येनं महिलांनी फारशी पसंती दिली नसली तरीही घरातल्या कपड्यांमध्ये मात्र या पलाझो पॅण्टसला अग्रक्रम दिला जातो. या पॅण्ट बाहेरही घालता येऊ शकतात फक्त त्या तितक्या नीटनेटक्या कॅरी करणंही अत्यावश्यक असतं अन्यथा सगळाच गबाळपंथी अवतार होतो. अनेक मुलींना मात्र घरातल्या घरात उठबस करायला या पलाझो पॅण्ट्सच बऱ्या वाटतात. असं असलं तरीही अलिकडे आॅनलाईन शॉपिंगच्या अनेक वेबसाईट्सवर पलाझो विविध आकर्षक कपड्यांमध्ये उपलब्ध आहेत, तसेच मोठ्या ब्रॅण्डेड शोरूम्समध्येही पलाझोचा एक वेगळा काऊण्टर पहायला मिळतो. या पलाझो हिवाळ्यात आणि पावसाळ्यात घालणं केवळ अशक्य असल्यान विशेषत: समर फॅशन म्हणूनच या लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यामुळेच यंदाच्या उन्हाळ्यात एखादी पलाझो वापरून पहायला हरकत नाही ... ,नाही का ?