स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक क्रांतिकारकांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि आझाद हिंद रेडिओचे प्रक्षेपण ज्या घरातून झाले ती मुंबई येथील ‘लक्ष्मी निवास’ वास्तू विक्रीस काढण्यात आली आहे. व्हिक्टोरियन पद्धतीचा हा बंगला शंभर वर्षे जुना आहे. घराचे स्थापत्य, गोलाकार जिना, मोठमोठ्या बाल्कनी आणि घोड्यांचा तबेला अशा गोष्टी स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन जातात.वीस हजार चौ. फूट एवढ्या विशाल जागेवर पसरलेल्या या बंगल्यात गोमुख आणि सिंहाच्या मुखाचे शिल्प पाहायला मिळतात. आपल्या देशाच्या सुवर्ण इतिहासाचा एक अमूल्य साक्षीदार असे वर्णन या घराचे करता येईल. घरातील लाकडी फर्निचर तर घराला एकदम अँटिक लूक आणते. काही ठिकाणी तर १७ फूट उंच छत आहे. तबेल्याच्या जागेचा वापर आता पार्किंग म्हणून केला जातो.राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, अरुणा असफ अली, अच्युत पटवर्धन यासारखे स्वातंत्र्यसेनानी या बंगल्यात राहिलेले आहेत. घरासमोर मोर आणि घोड्याचे प्लॅस्टिक शिल्प गुजराती लाकडी-स्थापत्यशास्त्राची नक्कल आहे. अशा या इतिहासकालीन घरात राहण्याची इच्छा कोणाला नाही होणार.