- सारिका पूरकर-गुजराथी पूर्वी टीव्ही असलेलं त्यातही रंगीत टीव्ही असलेलं घर म्हणजे श्रीमंताचं घर समजलं जात होतं. आता मात्र टीव्ही सगळ्यांच्याच घरातली गरजेची वस्तू बनू लागलाय. पूर्वी एका शटरमध्ये टीव्हीला बंदिस्त करुन ठेवलं जात होतं. जेणेकरुन येता-जाता त्याला कोणी हात लावून तो खराब करु नये. आता टीव्ही सर्वत्र खुलेआम लावले जातात. शिवाय जमाना आहे तो एलईडी, एलसीडी टीव्हीचा. हॉलमधील मोठ्या भिंतीवर मोठ्या आकारात हे टीव्ही आता होम थिएटरचा फिल देत आहेत. हे एलसीडी, एलईडी टीव्ही हॉल, बेडरुमची शान वाढवताहेत. पण त्यांची शान पण वाढवायला नको का? त्यासाठीच एलसीडी, एलईडी लावलेल्या ओक्याबोक्या भिंतीला डेकोरेट केलं तर? टीव्हीची भिंतही खूपच बोलकी होईल! टीव्हीमागील भिंती सजवताना..१) टीव्हीमागील भिंतीवर तुम्ही फोटोजचा कोलाज साकारु शकता. यात फॅमिली फोटोज, निसर्ग देखावे, काही सुंदर विचार यांचा समावेश करता येईल. शिवाय काही आकर्षक फेब्रिक फ्रेम करुन लावण्याचा ट्रेण्डही आहे तो देखील या कोलाजमध्ये ट्राय करता येईल.२) टीव्हीच्या मागे त्याच्या आकारापेक्षा मोठे शेल्फ उभारा. हे शेल्फ लाकडी, काचेचे असू शकतात. या शेल्फवर फोटो, छोटे फ्लॉवर वासे, इनडोअर प्लान्ट्स, संग्रह केलेल्या विविध वस्तू आकर्षक पद्धतीनं सजवता येतील. यामुळे टीव्हीच्या प्लेन लूकवरुन नजर हटून या वस्तूंवर गेल्यामुळे डोळेही सुखावतात.३) मिक्स मिडिया . अर्थात विविध वस्तू एकाच ठिकाणी सजविण्याचा प्रकार. तो तुम्ही टीव्हीमागील शेल्फवर, किंवा डेस्कटॉप टीव्ही असेल तर त्याच्या भोवतालच्या जागेवर ट्राय करु शकता. पुस्तकं, लॅम्पशेड्स, इनडोअर प्लान्ट डेस्कटॉपभोवती आणि मागील भिंतीवर विविध फ्रेम्स लावून मिक्स मिडियाचा हटके लूक मिळवता येतो. रचना फक्त सुंदर हवी. घेतल्या वस्तू आणि ठेवून दिल्या असं नको. ४) मध्यम आकारात टीव्ही डेस्कटॉपवर असेल तर मागील भिंतीवर तुम्ही फेब्रिक म्युरल बनवू शकता. आकर्षक रंगातील, प्रिंटचे फेब्रिक गोलाकार, ओवल आकारात फ्रेम करा अन्यथा प्लायवर चिकटवून घ्या. आणि या प्लायच्या तुकड्यांची रचना टीव्हीमागे करा. प्रसन्न लूक मिळेल. फ्लोरल, डॉट प्रिंटचे फेब्रिक शक्यतो घ्या.५) टीव्ही भिंतीवर लावला असेल तर टीव्हीचंच रुपांतर सुंदर फ्रेममध्ये करता येईल. त्यासाठी टीव्हीच्या आकाराचीच फ्रेम बनवून टीव्हीभोवती फिट करा. ही फ्रेम बनवताना टिपिकल फोटो फ्रेमचे रंग नको. तर फिकट हिरवा, आकाशी, निआॅन अशा रंगात फ्रेम बनवा. टीव्हीफ्रेम भिंतीवर शोेभून दिसेल.६) सध्या टीव्ही कम उंचीच्या डेस्कवर ठेवून त्यामागे शेल्फ उभारण्याचा ट्रेण्ड लोकप्रिय होतोय. या शेल्फवर तुम्ही पुस्तकं, लॅम्पशेड्स, फोटोज मांडू शकता. डेस्कची उंची स्टॅण्डर्ड बेडसाईजच्या उंचीची (१६ इंच) हवी.७) कमी उंचीच्या डेस्कटॉप टीव्हीमागील भिंतीवर षटकोनी शेल्फची साखळी आकर्षक रचनेत साकारा. यात तुम्ही कॅण्डल्स, तुमच्या मुलांना मिळालेल्या ट्रॉफीजची मांडणी करु शकता.८) अगदी सोपी-सुटसुटीत सजावट हवी असेल तर टीव्हीमागील भिंतीवर पाना-फुलांचं डिझाईन असलेला वॉलपेपर लावा.९) डेस्कटॉप टीव्हीभोवती, वरील भिंतीवर, शेल्फवर, डेस्कवर तुमच्याकडील पुस्तकांची रचना करता येईल. लायब्ररीचा वेगळा लूकही मिळेल आणि टीव्हीच्या भिंतीलाही थोडा सिरियसनेस मिळेल. १०) तीन भागातही ही टीव्ही सजावट करता येते. खाली डेस्क बनवा, नंतर टीव्ही लावायला पॅनल आणि त्यावर एक अजून पॅनल (जो प्लेन प्लायचा तुकडा असेल). खालच्या डेस्कवर काही छोटी शिल्पं, कॅण्डल्स ठेवता येतील. मधल्या टीव्हीचा पॅनल असा बनवा की मध्ये टीव्ही आणि टीव्हीच्या डावी उजवीकडे दोन खिडक्यांचा लूक मिळेल. यात तुम्ही आकर्षक पॉट्स ठेवू शकता. वरच्या प्लेन पॅनल (जो माळ्यासारखा असेल) असेल त्यावर फोटोज, स्पिकर्स ठेवता येतील.११) व्हिण्टेज लूक हवा असेल जुन्या लाकडी फळ्यांचे पॅनल टीव्हीमागे बनवा. त्यावर टीव्ही लावा.१२) दरवेळेस टीव्हीमागेच सजावट नको असेल तर भिंतीवर टीव्हीशेजारील मोकळ्या जागेवरही सजावट करता येते.