- सारिका पूरकर -गुजराथीआपल्या पृथ्वीला ग्लोबल वॉर्मिंगपासून वाचवायचं असेल तर ‘झाडं लावा, झाडं जगवा’असं सगळीकडे वारंवार सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात मात्र असं घडत नाही. मोजके पर्यावरणप्रेमी सोडले तर झाडांकडे पाहायला कोणाला वेळच नाहीए. आपण याबाबत काही करू शकतो का?तर हो... सध्या जी झाडं जिवंत आहेत ती तरी आपण कत्तलीपासून वाचवू शकतो. तुम्हाला माहीतच असेल की, आपण सारे ज्या कागदावर लिहितो, तो झाडांपासूनच बनतो. म्हणजे कागद तयार करण्यासाठी हजारो झाडांची कत्तल होत असते. आपण कागद फेकून देतो तेव्हा त्या झाडाला काय वाटत असेल? जरा विचार करा, कागद फेकण्याआधी आपण त्याचा पुनर्वापर करू शकतो का? सूचतंय काही? नसेल सूचत तर ही गंमत करून पाहा.आपण रद्दीपेपर किंवा जुन्या मासिकांच्या कागदांपासून भिंतींवर टांगता येतील असे सुंदर ‘वॉलहॅँगिंग’ बनवू शकतो. कागदाच्या पुर्नवापराचा असा आखीव रेखीव पुर्नवापर करूनही आपण झाडे वाचवायला मदत करू शकतो.पेपरपासून वॉलहॅगिंग कसं कराल?* यासाठी घरातलं जुनं वर्तमानपत्र, जाड पुठ्ठा, फेव्हिकॉल, कात्री, स्केल आणि पेन हे साहित्य जमवा.* सर्वांत आधी वर्तमानपत्रातून ४ इंच लांबी-रुंदीचे भरपूर चौकोनी तुकडे कापून घ्या. जाड पुठ्ठ्यावर एखादी मध्यम आकाराची ताटली ठेवून तिच्याभोवती पेननं गोलाकार आखून तो कापून घ्यावा. * कागदचा चौकोनी तुकडा घेऊन त्याचे चार कोपरे उभे दिसतील असे धरा. नंतर वरचा-खालचा भाग तसाच राहू द्या आणि उजवीकडचा भाग डावीकडच्या भागावर अलगद चिकटवा. चणे-फुटाण्यासाठी जसा कोन असतो, तसाच हा कोन दिसेल. असे बरेच कोन तयार करून ते वाळू द्या.* कोन चांगले वाळले की गोलाकार कापलेला पुठ्ठा घ्या. या गोलाकारात आपल्याला बाहेरून आत याप्रमाणे कोन चिकटवायचे आहेत. त्यासाठी कोनाच्या तळाला फेविकॉल लावून तो कोन गोलाकाराच्या वरच्या भागात असा चिकटवा की त्याचा बहुतांश भाग गोलाकाराच्या बाहेर राहील आणि टोक आत चिकटलं जाईल. त्याच्याशेजारी त्याच पद्धतीनं दुसरा मग तिसरा असे कोन चिकटवत जा. पहिली रांग पूर्ण करा. वाळू द्या. * आता गोलाकाराच्या वरच्या भागात जे कोन चिकटवले आहेत, त्याखाली दुसरी रांग तयार करायची आहे. त्यासाठी पुन्हा कोनाच्या खालच्या भागाला फेव्हिकॉल लावा अन् पहिल्या रांगेतल्या दोन कोनांच्या मधोमध हा दुसऱ्या रांगेतले कोन चिकटवा. * आपले हे वॉलहॅँगिग भरगच्च दिसण्यासाठी गोलाकारात आणखी तिसऱ्या रांगेतही पेपरकोन चिकटवून घ्या.* पेपरकोनच्या तीन रांगा पूर्ण झाल्यावर मधोमध कृत्रिम फुलं, सॅटिन कापड लावून सुशोभित करू शकता. पुठ्ठ्याला पाठीमागून दोरीचे लूप बनवा आणि ते भिंतीवर टांगा. याच प्रकारे तुम्ही लहान कोन बनवून, ते तीन गोलाकारांत चिकटवून तीन पीसचं वॉलहॅँगिंगही बनवू शकता. जुन्या मासिकातील रंगीत कागदांचा वापर केल्यास हे वॉलहँगिग आणखी उठावदार दिसू शकेल.