-मोहिनी घारपुरे- देशमुख वॉर्डरोबमध्ये असल्याच पाहिजेत अशा दोन स्टायलिश पॅण्टस म्हणजे ट्यूलिप आणि धोती. अलिकडच्या काळातल्या या दोन्ही स्टायलिश पॅण्ट्स महिलांच्या सौंदर्यात अधिकच भर घालण्यात यशस्वी ठरलेल्या आहेत. त्यांपैकी धोती हा प्रकार खरंतर पुरूषी वर्चस्व असलेला. पण फॅशनच्या जगात असा स्त्री पुरूष भेद नाहीच. उलट फॅशन विश्वानं अनेक नवे आयाम सौंदर्याला दिले आहेत, त्यापैकीच एक धोती आणि ट्युलिप पॅण्टस.धोतीची फॅशनखरंतर आपल्याकडे पुरूषांच्या पारंपरिक पोषाखाचा भाग असलेली धोती महिलांच्या वॉर्डरोबमध्ये केव्हा स्थानापन्न झाली ते लक्षातही आलं नाही. सुरूवातीला धोती स्टाईलच्या सलवारी आणि त्यावर कुर्ती असा पेहराव पंजाबी ड्रेसमधील स्टाईल म्हणून स्वीकारला गेला. त्यानंतर हळूच या धोती सलवार मागे पडत त्याऐवजी धोती पॅण्टसनी वॉर्डरोबमध्ये जागा मिळवली. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सनी बाजारपेठेत या धोती पॅण्ट्समध्ये भरपूर प्रकार आणले. विशेषत: रंग आणि कापडाचा पोत यांत वैविध्य आणून या धोती पॅण्टसमध्ये व्हरायटी आणलेल्या दिसतात. सिंगल कलर, मल्टी कलर, लेस बॉर्डर, लायक्रा , कॉटन, क्रेप , शिफॉन अशा कित्तीतरी प्रकारच्या धोती पॅण्ट्स दिसायलाही अत्यंत आकर्षक दिसतात.अत्यंत आरामदायी अशा या पॅण्टस उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातही वापरता येतात. पावसाळ्यातही हलक्या शिडकाव्यांमध्ये या धोती पॅण्टस सहज वापरता येतात. या पॅण्टसवर शॉर्ट कुर्ती, वेस्टर्न टॉप्स, नी लेंग्थ कुर्ती देखील घालता येतात. ट्यूलिप पॅण्टसधोती पँट्सप्रमाणेच सध्या ट्यूलिप पॅण्टसचीही भरपूर क्र ेझ आहे. फॅशनेबल रहाणाऱ्या आधुनिक तरूणींच्या वॉर्डरोबमध्ये ट्यूलिप पॅण्टस हमखास आढळतील. गेल्या वर्षी तर फॅशन इंडस्ट्रीमध्ये या ट्यूलिप पॅण्ट्सनी एकच धुम केली होती. उन्हाळी फॅशन म्हणून या ट्यूलिप पॅण्टस आणि स्कर्टसनी हक्काचं स्थान मिळवलं आहे. ट्यूलिपच्या फुलाप्रमाणेच या पॅण्टसला आकर्षक पद्धतीनं कट दिलेले असतात. विशेषत: पायाच्या घोट्यापाशी अशा रितीनं आकार दिलेला असतो जणू ट्यूलिपच्या पाकळ्याच असं वाटतं. ट्यूलिप स्कर्ट्सचंही सौंदर्य अशा कट्सनेच खुलवलेलं असतं. काहीशा तलम, झुळझुळीत कपड्यांमध्ये या पॅण्ट्स शिवल्या जातात. तसेच स्कर्टसाठीही सुंदर फॉल येईल असाच कपडा आणि फ्रेश कलर्स वापरले जातात. या पॅण्टसवर शॉर्ट शर्ट, शॉर्ट कुर्ता घातल्यास त्याचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. या पॅण्टस घातल्या की पायात मात्र हाय हील्स, स्टेलेटोजच घालायला हवेत. तरच या दोन्हीही पॅण्टसद्वारे तुमची देहबोली आणि शरीरसौष्ठव अधिक खुलेल यात शंका नाही.