- माधुरी पेठकरॠतुनुसार खाण्यापिण्याच्या आवडी निवडी बदलतात. तशा पावसाळ्यातही बदलतात. पण पावसाळ्यात आपल्याला जे प्रामुख्यानं खायला आवडतं आणि जे पर्याय उपलब्ध असतात त्यातले बरेच पदार्थ आरोग्यास हानिकारक असतात. हे पदार्थ खाण्यास जितकी मजा वाटते तितकेच ते पचवताना शरीराला त्रास होतो. त्याचा परिणाम म्हणजे पावसाळ्याच्या काळात केवळ खाण्यापिण्याच्या चुकीच्या आवडीनिवडीमुळे आपण स्वत:हून आजारांना निमंत्रण देतो. 7 प्रकारचे पदार्थ आणि अन्नघटक आहेत जे आपण पावसाळ्याच्या काळात न घेणंच जास्त फायदेशीर असतं. पावसाळ्यात जिभेची चटक नियंत्रणात ठेवली तर अनेक आजार आटोक्यात राहू शकतात.1) भजीपावसाची पहिली सर कोसळण्याचा अवकाश की अस्सल आणि आंबट शौकिन खवय्यांना भजी खावीशी वाटतात. मग काय पाऊस रिमझिम असो की मुसळधार पाऊस आहे म्हणजे भजी हवीतच. मग संध्याकाळच्या चहासोबत बऱ्याचदा भजी खाल्ली जातात. भजींची चव कितीही चटकदार असली तरी ती पावसाळ्याच्या काळात पचवणं अवघडच. आणि ही भजी जर तुम्ही बाहेरच्या टपऱ्यांवर खात असाल तर मग आजारांना आयतं आवताणच. त्याला कारण म्हणजे ते भजी तळण्यासाठी वापरत असलेलं तेल. भजींचं पीठ भिजवण्यासाठी वापरलं जाणारं पाणी या दोन गोष्टींमुळे पोटाचे विकार होतात.भजी खाण्याची लहर आलीच तर मग बाहेरच्यापेक्षा ती घरी बनवून खावीत. पण वारंवार नाही. कारण भज्यांसाठी वापरलं जाणार बेसन हे पचनास त्रासदायकच असतं. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात आपल्या पोटाला आणि पचनसंस्थेला छळायचं नसेल तर भजी कमी खाणं आणि ती घरी खाणंच चांगलं. 2) चाटपाणीपुरी, ओलीभेळ , रगडा पॅटीस यासारखे पदार्थ खायला कोणी फक्त पावसाळ्याचीच वाट पाहातं असं नाही. चाट हा प्रकार येता जाता खावासा वाटणाराच आहे. पण पावसाळ्याच्या काळात चाटला आराम दिलेला बरा. पावसाळ्यात होणारे बरेच आजार हे पाणीजन्य असतात. म्हणजे पाण्यापासून होणारे असतात. चाटच्या गाड्यांवर चाट बनवताना वापरलं जाणारं पाणी दुषित असण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटदुखी, कावीळ, जळजळ, मळमळ यासारखे आजार होवू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात सरळ पाणीपुरीच्या पुऱ्या घरी आणाव्यात आणि त्यासाठीच्या चटण्या घरी बनवून घरच्याघरी पाणीपुरीचा लिमिटेड आस्वाद घेणं जास्त चांगलं. 3) समोसा/ कचोरी.चटपटीत खावसं वाटलं की स्वस्तात मस्त समोसा आणि कचोरीचा पर्याय शोधला जातो. पण बाहेर गाड्यांवर जे समोसे आणि कचोऱ्या मिळतात ते तळताना वापरलेलं तेलं पुन्हा पुन्हा वापरलं जातं. अशा तेलाचे पदार्थ घात करतत. शिवाय समोस्यामध्ये बटाट्याच्या भाजीचं मिश्रण असतं. बऱ्याचदा सकाळपासून बनवलेली भाजी रात्री आठ वाजतासुध्दा समोसे करताना वापरली जाते. पावसाळ्याच्या आर्द्र वातावरणात बऱ्याचदा ती उतरते. तसेच समोसा आणि कचोरीच्या पारीसाठी मैदा वापरला जातो. मैदा सारखा पोटात जाणं हे पोटाच्या आरोग्यासाठी घातकच. त्यामुळे पावसाळ्यात समोसा कचोरी टाळलेली बरी. शिवाय समोसा कचोरी वारंवार खाण्यात आल्यास वजन वाढतं. 4) गाड्यांवरचं चायनीज फूडपावसाळ्याच्या काळात चायनीज फूड टाळलेलंच बरं. अशा गाड्यांवर चायनीज पदार्थ बनवताना अशुध्द पाणी वापरलं जातं. त्याचा त्रास होतो. शिवाय हे पदार्थ बनवताना अजिनोमोटो, भरपूर मसाले, रंगासाठी कृत्रिम रंग वापरले जातात. जे आरोग्यास अतिशय हानिकारक असतात. पोटदुखी, मळमळ, उलट्या, डायरिया यासारखे आजार चायनीज पदार्थांच्या अतिसेवनामुळे होतात. म्हणूनच गाड्यांवरचं चायनीज टाळून हुक्की आल्यास घरीच चायनीज बनवावं. अजिनोमोटोऐवजी आपलं मीठ वापरावं. आणि कृत्रिम रंग टाळावेत तसेच सॉसेसचा कमी वापर करावा. असं चायनीजही उत्तम लागतं. 5) पालेभाज्या.पालेभाज्या आरोग्यास उपयुक्त असतात. पण पावसाळ्यात नाही. पावसाळ्यात पालेभाज्या भरपूर मिळतात शिवाय पालेभाज्यांचे प्रकारही खूप मिळतात. पण या काळात पालेभाज्या जपून खाल्लेल्याच बऱ्या. पावसाळ्यत पालेभाज्यांना लागलेली माती ही हानिकारक असते. त्यात चिखलातले जंतू असतात. या जंतूंमुळे पोटाचे विकार होतात. त्यामुळे रोजच्या जेवणात पालेभाजी टाळावी. पालेभाजी चांगली धुवून मगच त्याची भाजी करावी. 6)गाड्यांवरची सरबतं.पावसाळ्याच्या काळात मुळातंच सरबत, फळांचे रस कमी प्रमाणात घ्यायचे असतात. आणि त्यातच जर गाड्यांवरचे ज्युसेस तर अवश्य टाळावीत. कारण गाड्यांवर ज्युसेस तयार करायला सोपं जावं म्हणून फळं आधीच सोलून कापून ठेवली जातात. पावसाळ्यात जास्त वेळ सोलून कापून ठेवलेली फळं हानिकारक ठरतात. अशा फळांच्या ज्युसेसमधून जंतूसंसर्ग होतो. त्यामुळे पावसाळ्यात सरबत, ज्युसेस टाळावीत. अख्खं फळं खाण्यास प्राधान्य द्यावं. फळं खातांना ती जास्त वेळे सोलून आणि कापून ठेवू नये. 7) कार्बोनेटेड शीत पेयंकार्बोनेटेड शीत पेयांमुळे शरीरातील खनिज द्रव्यं कमी होतात. ही पेयं पचनशक्तीचं कार्य बिघडवतात. पावसाळ्यात तर मुळातच पचनसंस्था मंदपणे काम करत असते. शरीरातून जास्त घाम द्रवत नाही. अशा परिस्थितीत ही शीत पेयं पिणं अनारोग्यदायी असतं.