लहान मुलांना आपण नेहमी विचारतो की, मोठ्यापणी तुला काय व्हायचे? त्यावर पायलट, वकील, इंजिनिअर, डॉक्टर, शास्त्रज्ञ किंवा पोलीस असे उत्तर मिळते. पण तुम्ही जर हा प्रश्न सात वर्षांच्या क्लो ब्रिजवाटर या मुलीला विचाराल तर तिचे उत्तर ऐकून तुम्ही हैराण होऊन जाल. महत्त्वकांक्षी क्लोला मोठ्यापणी जगातील सर्वात मोठी इंटरनेट कंपनी ‘गुगल’मध्ये काम करायचे आहे.बरं नुसते काम करण्याचे तिचे स्वप्न नाही. त्याची तयारी तिने आतापासूनच सुरू केलेली आहे. गुगलचे बॉस अर्थातच सीईओ सुंदर पिचई यांना तिने नोकरीचा अर्ज वजा पत्रसुद्धा लिहिले आहे. आपल्या वाकड्यातिकड्या परंतु तेवढ्याच गोड-निरागस भाषेत तिने गुगलमध्ये नोकरी करण्याची इच्छा बोलून दाखविली. पत्रात ती लिहिते की, ‘माझ्या वडिलांनी मला सांगितले की, गुगलमध्ये नोकरी करताना मी बीन बॅगवर बसू शकते, घसरगुंडीवर मजा करू शकते आणि कार्ट राईडिंगही करू शकते.’ तसेच तिने कॉम्प्यटर आवडत असल्याचे व टॅबवर गेम खेळता येत असल्याचेही सांगितले. इंग्लंडमध्ये हिअरफोर्ड येथे राहणाऱ्या क्लोला मोठेपणी गुगलबरोबच चॉकलेटच्या कारखान्यात काम आणि आॅलिम्पिकमध्ये पोहण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. बहिणीबद्दल सांगताना ती म्हणते की, माझी लहान बहिणसुद्धा खूप हुशार आहे परंतु तिला फक्त बाहुलीसोबत खेळायला आवडते. माझे सर्व शिक्षक मला शब्बासकी देतात. पत्राच्या शेवटी ती लिहिते की, माझे पत्र वाचल्याबद्दल धन्यवाद. हे माझे दुसरेच पत्र असून या आधी मी केवळ माझ्या वडिलांना नाताळानिमित्त पत्र लिहिले होते.क्लोने लिहिलेले हे पत्र तिचे वडिल अँडी ब्रिजवाटर यांनी लिंक्डइनवर पोस्ट केले. इंटरनेटवर व्हायरल झाल्यावर ते पोहचले थेट गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांच्यापाशी. सात वर्षांच्या या मुलीच्या लिखाणाने तेदेखील खूप प्रभावित झाले आणि तिच्या पत्राला उत्तर दिले. पिचई यांनी पाठवलेले उत्तर अँडी यांनी सोशल मीडियावर शेअर केले.पिचई यांनी लिहिले की, प्रिय क्लो, तुझ्या पत्रासाठी धन्यवाद. तुला कॉम्प्युटर आणि रोबोट आवडतात हे वाचून खूप आनंद वाटला. मला खात्री आहे की, तु तंत्रज्ञानविषयीची जिज्ञासा कायम ठेववण्यासाठी प्रयत्नशील राहशील. तु जर कठोर मेहनत घेतली तर तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होतील. मग ते गुगलमध्ये काम करण्याचे असो वा आॅलिम्पिकमध्ये पोहण्याचे. तुझे शिक्षणपूर्ण झाल्यावर तुझ्या नोकरीच्या अर्जाची मी वाट पाहतोय. तुला आणि तुझ्या कुटुंबाला माझ्या शुभेच्छा! सुंदर पिचईसारख्या अत्यंत व्यस्त व्यक्तीने सात वर्षांच्या मुलीच्या पत्राला असे उत्तर दिल्याने क्लोचे वडिल फार भारावले. ते म्हणतात, ‘मला वाटले नव्हते की ते कधी रिप्लाय करतील. परंतु त्यांनी पाठवलेल्या पत्रामुळे माझ्या मुलीला खूप आनंद झाला असून तिचा कॉम्प्युटरमधील रस वाढला आहे.’ काही वर्षांपूर्वी क्लो कार अपघातामध्ये जखमी झाली होती. बरी झाल्यावर वडिलांनी तिला इंग्लंडमधील गुगल आॅफिसमध्ये नेले होते. तेव्हापासून तिला तेथे काम करण्याची इच्छा निर्माण झाली होती.