- सारिका पूरकर-गुजराथीअसं म्हणतात की आॅफिसचं काम घरी आणू नये. परंतु, आता दिवसाचे १८-२० तास कामाचे झालेत. त्यामुळे साहजिकच घरीच आॅफिस असणं आवश्यक आणि सोयिस्कर झालं आहे. कारण घरातल्या आॅफिसमुळे महत्वाची कामं घरबसल्या होऊ लागली आहेत, शिवाय महिलांसाठी तर वर्क फ्रॉम होम अर्थात घरी बसून काम ही संकल्पनाही लाभदायी ठरु लागली आहे. थोडक्यात प्रत्येक घरात छोटेखानी आॅफिस ही आता काळाची आणि बदलत्या कामाच्या शैलीची गरज बनली आहे. तुमच्या घरातही आहे का आॅफिस असेच? मग त्या आॅफिसच्या सजावटीसाठी काही केलंय तुम्ही? आता आॅफिसच ते.. ते काय सजवायचं? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो पण सजावटीची गरज आॅफिसलाही असते. स्वच्छ, नीट नेटक आणि आकर्षक आॅफिस असेल तर काम करायला उत्साह येतोच शिवाय कामासाठी म्हणून आलेल्यांनाही आपल्या आॅफिसकडे पाहून प्रसन्न वाटतं. घरातलं आॅफिस सजवायचं कसं?१) घरी आॅफिसची रचना करताना पुस्तकांचे कपाट, कॉम्प्युटर टेबल एकाच ठिकाणी ठेवायला हवे. तसे ते ठेवून घ्या. बसण्यासाठी आॅफिस चेअर्सच वापरा, जेणेकरुन तो कम्फर्ट मिळेल. सहज मुव होता येईल. आॅफिससाठी संपूर्ण वेगळी खोली उपलब्ध नसेल तर मोठ्या खोलीत पार्टिशन करुन आॅफिस बनवा. असं मटेरिअल वापरून घरातील टेरेस, बाल्कनीही आॅफिस म्हणून वापरू शकता.२) पुस्तकांच्या कपाटास (लाकडी असेल तर) निळसर राखाडी रंगात रंगवा. आॅफिससाठी जी काही जागा उपलब्ध आहे, त्या जागेवर छानसे रग अंथरा. यासाठी पारंपरिक डिझाईन्सचे रग नकोत. त्याऐवजी स्टार्क पॅटर्न रग छान वाटतात.३) आॅफिसमधील भिंतीवर एखादं छानसं पेटिंग लावू शकता. मात्र हे पेंटिंग तुम्हाला सकारात्मक उर्जा, संदेश देणारं हवं.४) भिंतींना शक्यतो पांढरा रंग किंवा फिकट रंगच द्या, जेणेकरुन जास्त प्रकाश परावर्तित होऊन फ्रेशनेस कायम राहील. ब्राऊन रंगाचा वापरही आॅफिसच्या इंटिरिअरसाठी करता येतो. वूड पॅनल्स भिंतीवर लावता येतात.५) आॅफिसची महत्वाची कागदपत्रं, तसेच स्टॅपलर, पिन्स, पेपरवेट, पेन इ.स्टेशनरी ठेवण्यासाठी उपलब्ध जागेचा योग्य वापर करा. टेबलची ड्रॉवर्स तर असतातच शिवाय जोडीला छोटेखानी कपाटं मिळतात, त्याचाही वापर करु शकतात. स्टोअरेजला कंटेपररी लूक हवा असेल तर पेपर आॅर्गनायझर्स, बास्केट्स, वॉल शेल्फ, ओपन स्टोअरेज सिस्टिमचाही उपयोग करता येतो. ६) घरातील आॅफिसमध्ये प्रकाशयोजनाही महत्वाची आहे. शक्यतो नैसर्गिक प्रकाश जास्त येईल याची काळजी घ्या. मोठ्या खिडक्या ज्या खोलीत असतील तेथे तुम्ही आॅफिस करु शकता. तसेच रात्री काम करण्यासाठी ओव्हरहेड लाईट, टेबललॅम्प हे चांगले पर्याय आहेत. आकर्षक लॅम्पशेडचा वापर करुनही या आॅफिसला डेकोरेटिव्ह लूक देता येतो. मात्र त्यासाठी मोठे तसेच डिझाईनचे लॅम्पशेड नकोत. फॉर्मल लूक देणारे लॅम्पशेड हवेत.७) जर तुमच्या घरच्या आॅफिसमध्येही तुमच्या व्यवसायाशी निगडित व्यक्ती येत राहणार असतील तर त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था हवी. त्यासाठी छोटा सोफा, एक सेंटर टेबल ठेवायला हवा. शक्य झाल्यास खुर्च्याही ठेवण्यास हरकत नाही.८) जर तुम्हाला आॅफिससारखे टिपिकल आॅफिस घरी नको असेल तर तुम्ही बेडरुम, हॉलमध्येही एखादा टेबल अरेंज करुन कॉर्नर आॅफिस तयार करुन तेथे वर्क विथ फॅमिली हा पर्यायही निवडू शकता.९) पांढऱ्या रंगाचा डेस्क, अल्फाबेट डिझाईनचा, मॅप (नकाशा) वॉलपेपर,कॉर्कबोर्ड यांचा वापर करुनही घरच्या आॅफिसला मॉडर्न टच देता येतो.