- मोहिनी घारपुरे-देशमुखपावसाळा सुरू होण्याचे वेध सगळ्यांनाच लागलेले आहेत. पाऊस पडायला लागल्यावर मोर पिसारा फुलवून थुईथुई नाचतो. तसेच फॅशनच्या जगतातही डिझायनर्सना मोर खुणावू लागतो. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा असं म्हणत म्हणत साड्या, शालू, पैठणी साऱ्याजणी मोराच्या नक्षीकामानं अधिकाधिक सुंदर दिसू लागतात.खरंच, फॅशनच्या जगात पारंपरिक पद्धतीच्या साड्या आणि ड्रेसेसवर मोराची डिझाईन नेहमीच इन असते. आणि ती सदैव इन राहिल यात शंका नाही. मोराच्या सौंदर्याचे इतके प्रचंड प्रकार कपड्यांवर दिसतात की विचारता सोय नाही. साडीबरोबरच कुर्ती, ओढणी, सलवार अशा कोणत्याही ट्रॅडिशनल, सेमीट्रॅडिशनल कपड्यांवर मोराची नक्षी हमखास आढळते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोर तोच असला तरी प्रत्येक कपड्यावर त्याचं रूप, रंग निरनिराळं दिसतं. किंबहुना मोराच्या डिझाईनच्या दोन कपड्यांवरील डिझाईन अगदी समसमान असं सापडणं तसं विरळाच.कधी पिसारा फुलवलेला तर कधी फांदीवर बसलेला मोर, कधी आपल्या लांडोरीसोबत एकाच फांदीवर बसून तिच्याकडे बघणारा मोर तर कधी वारली चित्रातील चॉकलेटी, काळ्या पार्श्व रंगावर आपला तोरा दाखवत पिसारा फुलवलेला पांढरा मोर, अशा या मोराच्या हजारो तऱ्हा . कपड्यावर मोराच्या नक्षीचा डौल इतका सुंदर, सुबक दिसतो की पाहणाऱ्याला तो घ्यावासा वाटतो आणि विकणाऱ्याला चांगला दामही मिळतो. विशेषत: पैठणी खुलते ती या जरतारीच्या रंगीबेरंगी मोरामुळे. तर कुर्ती खुलतात वारली चित्रांतील मोरांच्या तोऱ्यामुळे. सोनेरी चंदेरी जर लावून मोराच्या नक्षीला वेगळाच उठाव दिलेला असतो. त्याचबरोबर निळ्या हिरव्या रंगातच नव्हे तर कपड्याच्या रंगावर जो रंग खुलून दिसेल त्याप्रमाणे रंगांची निवड करून मोराला नटवलं जातं आणि तसे रंगीबेरंगी मोरही अनेक कपड्यांवर फारच शोभून दिसतात.फॅशनच्या जगतात, पाश्चात्य कपड्यांवर जरी मोर फारसा आढळला नाही तरी खास भारतीय धाटणीच्या कपड्यांवर मात्र मोराच्या सौंदर्यपूर्ण नक्षीला तोड नाही हेच खरे...तुमच्याही वॉर्डरोबमध्ये एखादी तरी साडी मोरांच्या नक्षीची असणारच !आहे ना ?