- सारिका पूरकर- गुजराथीमध्यंतरी नाशिक शहरातील उड्डाणपुलाखालील भिंतींवर सुंदर चित्रं रेखाटून निरुपयोगी, दुर्लक्षित आणि त्यामुळे गुटख्याच्या पिचकाऱ्यांच्या बळी ठरलेल्या भिंतींना नवं रुप देण्यात आलं होतं. स्ट्रीट आर्टचा हा प्रयोग नाशिकमध्येच करण्यात आलेला नसून जगभरात तो खूप लोकप्रिय आहे. जगभरातील प्रमुख शहरांमध्ये स्ट्रीट आर्टचा आविष्कार सध्या मोठ्या प्रमाणावर बघायला मिळत आहे. आत्तापर्यंत स्ट्रीट आर्टचा प्रयोग फक्त प्रमुख परिसरातील भिंती, शाळांच्या भिंती यावर सुंदर चित्रं सामाजिक संदेश, शैक्षणिक आशय रेखाटण्यासाठी होताना दिसत होता, आता मात्र स्ट्रीट आर्टनं आपल्या घरात प्रवेश केलाय. होय, घराच्या भिंतींना पर्सनलाईज्ड, सिग्नेचर लूक देण्यासाठी स्ट्रीट आर्ट ट्रेण्ड झपाट्यानं लोकप्रिय होतोय. चारचौघांपेक्षा आपलं घर काहीसं हटके दिसावं, त्यात स्वत:चं असं वेगळेपण दिसावं याकरिता या स्ट्रीट आर्टद्वारे घराच्या भिंती सजवल्या जात आहेत. कसा होतोय वापर?स्ट्रीट आर्टमध्ये सहसा आपल्याला मोठी चित्रं रेखाटलेली आढळतात. घरामध्येही ही कला साकारताना मोठीच चित्रं रेखाटली जाताहेत. पण चित्रं मात्र अगदी वेगळी असावीत यासाठी आग्रह धरला जातोय. स्वत:ची, परिवाराची सेल्फी, काही चित्रपटांची पोस्टर्स, क्रिकेट, टेनिस, फूटबॉल या खेळांमधील हिरो खेळाडू, काही कार्टून कॅॅरॅक्टर्स, लोककथांमधील पात्रं अशी चित्रं घरातील बेडरुम, बाहेरील भिंती, टेरेसच्या भिंती, प्रवेशद्वार येथे ग्राफिटीच्या माध्यमातून एकदम नवीन ढंगात, नवीन रुपात साकारले जात आहेत. त्यामुळे घराला एकदम कलरफूल, फ्रेश तसेच पर्सनल टच मिळतो. घरसजावटीचा नेहेमीपेक्षा वेगळा प्रयोगपूर्वीपासून घराच्या भिंती या वारली, मधुबनी पेटिंग्जनं सजविल्या जात असत. मात्र घरातील भिंतींवरील ही चित्रकला एका ठराविक विषयांपर्यंत, ठराविक पॅॅटर्नपुरतीच मर्यादित होती. घरातील भिंतीवर म्युरल्स साकारतानाही एका भिंतीवर ठराविक आकारातच ती साकारली जायची, संपूर्ण भिंतीवर म्युरल्स रेखाटले जात नसत. मात्र स्ट्रीट आर्ट ट्रेण्डमुळे या पारंपरिकतेला छेद देऊन काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. तसेच घरातील भिंतीवर स्ट्रीट आर्ट साकारुन स्वत:ची स्पेस, स्वत:चं व्यक्तिमत्व, स्वत:ची आवड यांना या कलेच्या माध्यमातून एक्सप्लोअर केलं जातंय. दिल्लीचे योगेश साईनी यांनी यांसदर्भात म्हटलंय, की ‘माझ्या टीमनं नुकतंच एका घरातील भिंतीवर पुरातन संदूकचं चित्र रेखाटलं आहे, तसेच एका घरात सुंदर फुलं तर अजमेरी गेट येथील एका हवेलीच्या गच्चीच्या भिंतीवर तेथील लोक संस्कृतीचं चित्रं रेखाटलं आहे.’ यावर नजर खिळतेच!राजीव मेहता या दिल्लीतील एका व्यावसायिकानं त्यांच्या बंगल्याच्या संरक्षक भिंतींवर फुलं आणि झाडांचे सुंदर चित्रं रेखाटून घेतलं . त्यामुळे त्या बंगल्याची भिंत इतकी सुंदर दिसत आहे की रस्त्यावरुन जाणारा-येणारा प्रत्येकजण या भिंतीकडे पाहतो आणि प्रसन्न होतो. शिवाय नेहमीच्या त्याच त्या रंगातील संरक्षक भिंतींपेक्षा ही भिंत हटके ठरलीय. स्ट्रीट आर्टनं दिल्लीकरांना खूप वेड लावलं आहे. आयटी प्रोफेशनल आसिफ खेर यांनी रोमन हॉलिडे आणि प्रसिद्ध फूटबॉलपटू मेस्सी, रोनाल्डो यांना भिंतीवर साकारलं आहे. इंटिरिअर डिझायनर तनया खन्ना यांनी गच्चीच्या भिंतीवर पक्षी आणि झाडे यांचं चित्र साकारलं आहे. त्या म्हणतात, ‘हे पक्षी, झाडं पाहून माझी रोजची सकाळ खूप प्रसन्न होऊन जाते.’ नव्या ट्रेण्डवर पसंतीची मोहोरस्ट्रीट आर्टचा वापर इंटिरिअरसाठी वेगानं लोकप्रिय होतोय. आर्ट आॅन द वॉलच्या क्रितिका महिंद्रा यांनी सांगितलंय की, ‘स्ट्रीट आर्ट आर्टिस्ट्सना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही करतोय आणि गेल्या चार वर्षात घरातील भिंतीवर स्ट्रीट आर्ट साकारण्याचा ट्रेण्ड खूप हिट झालाय. आत्तापर्यंत आम्ही ७० हून अधिक घरातील भिंतीवर ही कला साकारली आहे. प्रत्येकाला आपल्या घराला कस्टमाईज्ड लूक हवा आहे आणि त्यासाठी स्ट्रीट आर्ट हा बेस्ट आॅप्शन ठरत आहे.