- मोहिनी घारपुरे- देशमुख वाघाची कातडी अंगावर घेऊन एकेकाळी माणूस आपलं निसर्गापासून संरक्षण करीत असे हे तर सर्वांना माहितच आहे. त्यानंतर काळ लोटला, अनेक वर्ष लोटली. माणूस प्रत्यक्ष स्वत: वस्त्र, कापड तयार करून त्या कापडाचे पोषाख, पेहराव करू लागला. मात्र तरीही वाघाच्या कातडीची आणि प्राण्यांच्या केसांपासून बनवलेल्या वेगवेगळ्या कपड्यांची जागा त्याच्या मनात कायमच राहिली. त्यामुळेच गेली कित्येक वर्ष फॅशनच्या जगतात. टायगर प्रिंट्सच्या कपड्यांची क्रेझ टिकून आहे. टायगर प्रिंट्सचे कपडे घालून मिरवावंस वाटणं हे खरंतर विशेषच. वाघाची कातडी जशी असते अगदी तंतोतंत तशीच प्रिंट असलेले कपडे घालून चारचौघात मिरवणं अगदी कोणत्याही ऋतूत छान, रिच आणि रॉयलच वाटते. सेक्सी दिसण्यासाठीही कित्येकदा या टायगर प्रिंट्सच्या कपड्याला पसंती दिली जाते. त्याचबरोबर फरचे कपडे, फरची किनार असलेले जॅकेट्स, ड्रेसेस, श्रग्स, आदी तऱ्हेतऱ्हेच्या कपड्यांना परदेशातील स्त्रीयांच्या वॉर्डरोबमध्ये स्थान मिळतंच . आपल्याकडेही फरचे कपडे आणि टायगर प्रिंट्सची चलती आहे. त्यातूनही हे कपडे कोणत्याही ॠतूत घालता येत असल्यानं या प्रिंट्सचा किमान एखादा तरी कपडा आपल्या वॉर्डरोबमध्ये असलाच पाहिजे असं वाटतं. सध्या बाजारात टायगर प्रिंट्सचे पाश्चात्य धाटणीचे टॉप्स, मॅक्सी, वनपीस वगैरे जोरदार विकले जात आहेत. इतकंच नव्हे तर चपलांवर किंवा टी-शर्टवर वाघ, सिंहाची चित्रं असतात. लहान मुलांच्या कपड्यांमध्येही या वाघ,सिंहाच्या चित्रांचा आणि प्रिंट्सचा अगदी खूबीनं वापर केला जातो. जेणेकरून लहान मुलांना त्याचं आकर्षण वाटावं. तसेच महिलांच्या साड्यांवरही टायगर प्रिंट्स उमटल्या वाचून राहिलेल्या नाहीत. मग असल्या या रॉयल आणि आकर्षक लुक देणाऱ्या टायगर प्रिंट्सचे कपडे तुमच्या वॉर्डरोबमध्येही असायलाच हवेत. अगदी आवर्जून! थ्रीडी प्रिंट्सदोन तीन वर्षांपूर्वीपासून फॅशनच्या दुनियेत थ्री डी प्रिंट्सनी देखील धुमाकूळ घातला आहे. या प्रिंट्स थ्री डायमेन्शनल असल्यानं त्यांचा लुक एकदमच भारी दिसतो. अनेक आंतरराष्ट्रीय डिझायनर्स या थ्री डी प्रिंट्समध्ये नवनवीन प्रकार आणत आहेत तर अनेकजण त्यावर अजून संशोधन करून पेहरावांमध्ये वैविध्यता आणत आहेत. सध्या बाजारात थ्री डी टी-शर्ट आणि टॉप्सची चलती आहे.