- अमृता कदमफिरायला जायचं, म्हणजे मौजमजा आणि निवांतपणासाठी. पण पर्यटनाकडे एवढ्याच मर्यादित दृष्टिकोनातून आता बघितलं जात नाही. त्यामुळेच हेल्थ टूरिझम, मेडिकल टूरिझम, आर्ट टूरिझम असे फिरण्याच्या उद्देशानुसार पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार विकसित होत आहेत. तुम्हीही जर पर्यटनाचा असा वेगळ्या अँगलनं विचार करत असाल आणि तुमच्या पर्यटनाच्या उद्देशामध्ये मौजमजेसोबतच फिटनेसचाही समावेश असेल तर सामान पॅक करा, मॅट गुंडाळा आणि भारतातल्या योगशिक्षणासाठी सर्वोत्तम अशा ठिकाणांना भेट द्या. ग्लॉसी एअर-कंडिशन्ड स्टुडिओमध्ये योगा करण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात योगशिक्षणाचा अनुभव तुमच्या आरोग्य आणि मन:शांतीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.ओशो मेडिटेशन रिसॉर्ट, पुणेतुमच्या धकाधकीतून शांततेचा अनुभव आणि योगाचा सर्वांगिण अभ्यास करायचा असेल तर पुण्यातल्या ओशो मेडिटेशन रिसॉर्टला नक्की भेट द्या. कोरेगाव पार्क भागात 28 एकरांच्या परिसरात वसलेल्या या ठिकाणी तुम्हाला प्राचीन आश्रमपद्धती आणि आधुनिक रिसॉर्टमधल्या सोयीसुविधांचा मेळ पाहायला मिळेल. मेडिटेशम सेंटर्स, योगा आणि ध्यानधारणेसाठी हिरव्यागार बागा, स्वीमिंग पूल, स्पा आणि बरंच काही तुम्हाला या रिसॉर्टमध्ये पाहायला मिळेल. तुमच्या सवडीनुसार इथे तुम्ही योगाभ्यासाचे कोर्सेस निवडू शकता. तुशिता मेडिटेशन सेंटर, धर्मशालाधर्मशालासारख्या निसर्गसौंदर्याचं वरदान लाभलेल्या आणि बौद्ध संस्कृतीचा पगडा असलेल्या या मेडिटेशन सेंटरमध्ये शांततेला अत्यंत महत्त्व दिलं जातं. ही शांतता केवळ बाह्य गोष्टींपुरतीच मर्यादित नाही, तर मन:शांतीवरही इथे भर दिला जातो. तुम्ही केवळ पर्यटकाच्या भूमिकेतून या सेंटरला भेट देत असला तरीही तुम्हाला योगा आणि मेडिटेशनच्या रोजच्या वर्गांना उपस्थित राहण्यासाठी आग्रह केला जातो. आयुर्वेद योगा मेडिटेशन रिसॉर्ट, कुन्नूरया केंद्राच्या आजूबाजूचं निसर्गसौंदर्यच तुम्हाला रिलॅक्स करण्याचं निम्मं काम करु न टाकेल. तामिळनाडूतल्या कुन्नूर या सुंदर भागात चहांच्या मळ्याशेजारीच निलगिरीच्या जंगलांनी वेढलेल्या जागी हे रिसॉर्ट वसलं आहे. इथे योगाभ्यासासोबतच तणावामुळे निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांच्या उपचारांवरही भर दिला जातो. योगाभ्यास शिकल्यानंतर तुम्ही स्वयंसेवक म्हणूनही इथे काम करु शकता. योग विद्या स्पिरिच्युअल रिट्रीट्स, केरळअध्यात्माच्या पारंपरिक पद्धती आणि हठ योगाचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत योग्य ठिकाण. जगभरातून येणारे प्रशिक्षित संन्यासी आणि योगाचे अभ्यासक योगविद्याधामध्ये शिकवण्यासाठी म्हणून येतात. तुमची योगा शिकण्याची सुरूवात असेल, तर 10दिवसांचा योगाचा कोर्स करु शकता. तुमचे योगाचे बेसिक्स शिकून झाले असतील तर तुम्ही इंटेन्सिव्ह कोर्ससाठीही प्रवेश घेऊ शकता. अगदी योगा शिकण्यासाठी जायचं नसेल, तरी एक अनुभव म्हणून तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.आनंदा इन द हिमालया, नरेंद्रनगरहिमालयाच्या सौंदर्याचा आनंद घेत असतानाच थोडा आरोग्याचाही विचार करत असाल तर आनंदाला भेट द्यायलाच हवी. इथे बिहार स्कूल आॅफ योगाची तंत्रं शिकवली जातात. ध्यानधारणेचंही तंत्रशुद्ध प्रशिक्षण इथे मिळेल. तुमच्या मनाच्या आणि शरीराच्या आंतर्बाह्य शुद्धीकरणावर, तणाव नियंत्रणावर तसेच वजन कमी करण्यावर या केंद्रात विशेष भर दिला जातो. इशा योग केंद्र, तामिळनाडूकोईमतूरपासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर वेलिनगिरी पर्वतरांगांमध्ये हे योग केंद्र वसलेलं आहे. सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी स्थापन केलेल्या इशा फाऊंडेशनचा आश्रम आणि इशा योग केंद्राला अनेक देशी-विदेशी योग अभ्यासक तसेच पर्यटकही भेट देतात. योगाच्या पारंपरिक पद्धतींचं शिक्षण घेण्याचा तुमचा विचार असेल तर तुम्ही इथे नक्की जाऊ शकता.