- सारिका पूरकर-गुजराथीडिजिटल कॅमेऱ्याच्या तसेच स्मार्ट फोनच्या जमान्यात आणि सेल्फीच्या टे्रण्डमध्ये फोटोजच्या हार्ड कॉपीज काढण्याचं प्रमाण कमी झालंय हे खरं. मात्र अल्बम बनवण्याची हौस अजूनही आहे. म्हणूनच लग्नसमारंभ, वाढदिवस याकाळात काढलेल्या फोटोजचे अल्बम आवर्जून बनवले जातात. शिवाय कुठे प्रेक्षणीय स्थळी फिरून आल्यानंतर तिथे काढलेल्या फोटोंचेही आवडीनं अल्बम केले जातात आणि आल्या गेलेल्यांना कौतुकानं दाखवलेही जातात. तसेच घरात आई-बाबांच्या काळातील, तसेच आपल्या लहानपणीचे बरेच फोटोज असतात. अशा जुन्या फोटोंचेही अल्बम असतात. अल्बम हौसेनं बनवले जातात, बऱ्याचवेळा ते उघडून पाहिले आणि दाखवलेही जातात. पण एकदा का त्यातलं अप्रूप आणि कौतुक संपलं तर मग हे अल्बम कपाटात कोंडून ठेवल्यासारखे राहतात. जुन्या फोटोंना असं कुठेही दडवून ठेवण्यापेक्षा त्या फोटोंना हाताशी घेऊन त्यांच्यापासून काही क्रिएटिव्ह करुन पाहिलं तर. फोटोत जपून ठेवलेल्या आठवणी कायम डोळ्यासमोर राहतील असं बरंच काही तयार करता येतं.आपले फोटो, तसेच मासिक आणि वर्तमानपत्रात आपल्याला आवडलेले, जपून ठेवावेसे वाटणारे फोटोही यासाठी वापरता येतात. अट मात्र एकच, या फोटोंचा कागद मात्र गुळगुळीत हवा. फोटोबोर्डएक हार्डबोर्डचा तुकडा घ्या (१२ इंच रुंद आणि २४ इंच उंचीचा असावा ). हार्डबोर्डच्या कडा गडद रंगात रंगवून घ्या. वाळू द्या. तुमच्याकडे तुमच्या परिवाराचे जे जे सुंदर फोटोज आहेत, त्यांची निवड करा. साधारण ३०-३५ फोटोज लागतील. आता या फोटोजचे २ इंच लांबी-रुंदीत तुकडे कापून घ्या. आवश्यक भागच तेवढा आपल्याला घ्यायचाय. काही फोटोज कापण्याजोगे नसतील तर ते तसेच राहू द्या. हार्डबोर्डवर हे फोटोजचे तुकडे मॉड पॉज (एक प्रकारचा ग्लू)नं चिकटवून घ्या. शेजारी-शेजारी हे फोटो चिकटवत चला.संपूर्ण हार्डबोर्डवर फोटोजची रचना तुमच्या आवडीप्रमाणे करा. पुन्हा एकदा फोटोंवर मॉड पॉजचा हलका कोट लावून वाळू द्या. या फोटोबोर्डला थर्माकॉलच्या सहाय्यानं नावही देता येतं. भंतीवर हा फोटोबोर्ड छान दिसतो.फोटो कोस्टर्सगुळगुळीत कागदाच्या मासिकातील रंगीत फोटोज सीडीच्या आकारात कापून घ्या. शक्यतो पाना-फुलांचे, प्राणी-पक्ष्यांचे हे फोटोज हवेत. जुन्या सीडीवर हे फोटोज मॉड पॉज ग्लूनं चिकटवून घ्या. वाळल्यानंतर पुन्हा वरुन मॉड पॉजचा पातळ कोट लावून घ्या. ते वाळलं की कोस्टर्स तयार. लॅम्पशेडतुम्हाला जे फोटो जे लॅम्पशेडवर हवेत त्यांची निवड करा. एका लॅम्पशेडवर (आकारानुसार अवलंबून) पाच ते सहा फोटोज बसतात. लॅम्पशेडवर मॉड पॉज ग्लूच्या सहाय्यानं तुम्हाला हव्या त्या रचना साकारत फोटो चिकटवून घ्या. वाळल्यानंतर वरुन पुन्हा मॉड पॉज ग्लूचा कोट द्यायला विसरु नका, एवढी सुंदर लॅम्पशेड तुम्हाला कोणत्याच स्टोअरमध्ये मिळणार नाही.विशेष म्हणजे या लॅम्पशेडला असलेला पर्सनल टच बाहेरच्या कोणत्याही दुकानातून विकत मिळणार नाही.मॅॅग्नटे्ससॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्यांची झाकणं घ्या (प्लॅस्टिकची नकोत, मेटलची हवीत.) एका कॉइनच्या आकारात गोलाकार फोटोज कापून घ्या, (झाकणाच्या आतील बाजूच्या गोलाकारात हवा.) बाजारात रेझीन मिळतं. तेही एक प्रकारचं ग्लूच असतं. ते सूचनेनुसार बनवून घ्या. झाकणाच्या आतील बाजूत फोटो ठेवून वरुन रेझीन ओता. चांगले वाळू द्या. झाकणाच्या बाजूनं चुंबक चिकटवून टाका. हे मॅग्नेट्स फ्रीज, कपाटं यांवर लावा.