उन्हाळ्याच्या ॠतूत कितीही चांगली तयारी केली तरी उन्हाच्या झळा आणि सतत येणारा घाम यामुळे सगळी तयारी वाया जाते. उन्हामुळे त्वचा खराब होवू नये म्हणून त्वचेला अनेक प्रकारचे क्रीम्स आणि लोशन्स लावून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न होतो. पण उन्हामुळे फक्त त्वचाच नाही तर केसांचंही नुकसान होतं. याकाळात जर केसांकडे नीट लक्ष दिलं नाही , उन्हाळ्यात केसांचं जर नीट पोषण झालं नाही तरमात्र केसांची एवढी हानी होते की ती नंतर इतर ॠतूतही भरून येत नाही. उन्हाळ्यात केसांना जीवनसत्त्वं आणि खनिजं हवी असतात. केसांच्या मुळांना हलक्या हातानं मसाज हवा असतो. आणि यासाठी मेडिकल स्टोअरमधली लोशन आणि सिरम गरजेची नसतात तर फळं-फूलं-पानांचा अर्क, दही दूध गरजेचं असतं. तेवढं जर दिलं तर उन्हाळ्यात केसांना रूक्षपणा येत नाही, केस मजबूत राहतात, केसांची चमक आणि मऊपणा टिकून राहू शकतो. नारळाचं दूध आणि पपईचा मसाजकेसांना सतत कलरिंग केल्यामुळे केस रूक्ष होतात. केसांचा हा रूक्षपणा घालवण्यासाठी मसाज उपयोगी पडतो.हा मसाज दोन प्रकारे करता येतो.1) हा मसाज करण्यासाठी ताज्या नारळाचं दूध घ्यावं त्यात दोन चमचे आॅलिव्ह आॅइल घालावं आणि त्यानं केसांच्या मुळांशी मसाज करावी.2) एक कप पपयाच्या गराची पेस्ट आणि पाव कप बदामाचं दूध घ्यावं. आणि या मिश्रणानं केसांच्या मुळांशी मसाज करावी.3) मसाजानंतर केस हर्बल शाम्पूने धुवावेत. मेथ्यांची पेस्ट-कोरफडीचा गर- आॅलिव्ह तेलकेसांची गुंतावळ होणं ही खरंतर अनुवांशिक समस्या आहे. आणि म्हणूनच एक दोन दिवसांच्या उपायांनी ही समस्या सुटू शकणार नाही. यासाठी नियमित उपचारंच आवश्यक आहे. यासाठी अर्धा कप मेथ्यांचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत घालावेत. दुसऱ्या दिवशी त्याची बारीक पेस्ट करावी. एक कप पपईच्या गराची पेस्ट पाव कप नारळाचं किंवा आॅलिव्हचं तेल आणि अर्धा कप कोरफडीचा गर घ्यावा. हे सर्व घटक चांगले एकजीव करावे. आणि थोडं थोडं मिश्रण घेवून केसांना आणि केसांच्या मुळांना त्याचा मसाज करावा. दिवसातून दोनदा मसाज करावा. हा उपाय नियमित ठेवल्यास केसांंवर त्याचा परिणाम जाणवतो.शिकेकाई, आवळा आणि ब्राह्मीकेस उन्हाळ्यात निस्तेज दिसतात. केसांचा हा निस्तेजपणा घालवण्यासाठी चार चमचे शिकेकाई पावडर, चार चमचे मेथ्यांची पावडर, चार चमचे आवळ्याची पावडर, चार चमचे ब्राह्मी पावडर आणि चार थेंब रोजमरी तेल घ्यावं. हे सर्व घटक दही आणि दोन अंड्याच्या बलकात व्यवस्थित एकत्र करावं आणि या मिश्रणानं केसांची आणि केसांच्या मुळांची मसाज करावी. वीस मिनिटानंतर केस हर्बल शाम्पूनं धुवावेत.खराब केसांसाठीदोन अंडी, दोन चमचे आॅलिव्ह आॅइल, दोन चमचे दही, दोन चमचे दूध, दोन चमचे हिबिसस फुलांची पेस्ट हे घटक घ्यावे. या सर्वांची मिक्सरमधून बारीक पेस्ट करावी. त्यात तीन थेंब लवेंडर आॅइल टाकावं. आणि या मिश्रणानं केसांची आणि केसांच्या मुळांची मसाज करावी. मसाज केल्यानंतर वीस मीनिटांनी सौम्य हर्बल शाम्पूनं केस धुवावे. केस धुतांना एक मग कोमट पाणी घ्यावं त्यात दोन चमचे चहाचा अर्क आणि एक चमचा लिंबूचा रस टाकावा. आणि ते मगभर पाणी केसांवर टाकावं. नंतर साध्या पाण्यानं केस धुवावेत.केस गळत असल्यासमेथ्यांच्या दाण्यांची पेस्ट आणि हिबिसस फुलांचा अर्क घ्यावा. हे साहित्य कोरफडीच्या रसात एकत्र करावं. आणि हा रस केसांना आणि केसांच्या मुळांना लावावा.