- सारिका पूरकर-गुजराथी‘जुनं ते सोनं’ असं म्हणण्याची वेळ आलीय आता पुन्हा एकदा. दिवसेंदिवस भारतीय तसेच त्या त्या त्या राज्यातील पारंपरिक पदार्थांना खवय्यांकडून प्रचंड मागणी वाढतेय. एरवी हॉटेलमध्ये जायचं ते चायनीज हक्का नूडल्स, पिझ्झा, बर्गर्स, सॅण्डविचेस हे वेगळ्या म्हणण्यापेक्षा विदेशी चवींच्या पदार्थांच्याा आकर्षणापोटी. आता चित्र बदललं आहे. देशभरातील हॉटेल्समध्ये भारतीय चवीच्या पारंपरिक पदार्थांना मागणी वाढली आहे. भारतीय पाककलेत प्रचंड व्हरायटी उपलब्ध आहे. विविध मसाले, विविध पद्धती वापरुन एकापेक्षा एक भन्नाट चवीचे पदार्थ आपल्याकडे तयार होतात. डाळ, भात, पुलाव, भाज्या, चटण्या, कोशिंबीरी, गोडाचे पदार्थ या प्रत्येक प्रकारात शेकडो प्रकार बनवले जातात. हेच नाही तर भजी, पकोडे, कटलेट, पापड यांसारख्या स्टार्टर्समध्ये, सूप, सार, लोणची, रायता या तोंडी लावण्यातही प्रचंड चवींचा समृद्ध खजाना आपल्याकडे आहे. शिवाय देशभरातील खाऊगल्लीत तयार होणाऱ्या प्रांतीय पदार्थांना तर जगभरात तोड नाहीये. पंजाबचे छोले भटूरे, फेसाळलेली लस्सी, लखनौचे कबाब, पराठे, महाराष्ट्राची पिठलं-भाकरी, पुरणपोळी, राजस्थानची डाळबाटी, गुजरातचा ढोकळा, बंगालचे रसगुल्ले, दक्षिण भारतातील इडली-डोसा या पदार्थांनी तर पौष्टिकता, चवीतील वैविध्यता यामुळे भारतीयांच्या जिभेवर आणि मनात कायमची जाग पटकावलीय. मधल्या काळात फास्ट फूडचं आकर्षण वाटत होतं. परंतु सध्या भारतीय पदार्थांमधील न्यूट्रिशन व्हॅल्यू, त्यातील सात्विकता याचं महत्व खवय्यांना पटू लागलं आहे, म्हणूनच ‘आॅथेन्टिक इंडियन फूड’ ला प्रचंड मागणी आहे. खवय्येगिरीच्या दुनियेत झालेला बदल हा हॉटेल व्यावसायिकांनी उचलून धरला आहे. भारतभरात पारंपरिक चवीचे परंतु विस्मरणात गेलेले पदार्थ तयार केले जाताहेत. त्यासाठी खास रेस्टॉरण्ट्स, हॉटेल्स सुरु करण्यात आले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर मोगलाई , मालवणी, कोकणी , उडपी , पंजाबी पदार्थ यांची खासियत असलेले, ती चव उपलब्ध करुन देणारे हॉटेल्स मोठ्या प्रमाणावर सुरु झाले आहेत. त्याचबरोबर नाश्त्यामध्ये महाराष्ट्राची तेजतर्रार मिसळ-पाव, वडापाव सेंटर्स, कॉर्नर्स, पॉर्इंट्स प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत. पारंपरिक चवीबरोबरच घरच्या जेवणाची चव म्हणूनही मिरचीचा ठेचा, कढी-खिचडी यासारखे घरगुती पदार्थही हॉटेलमधील थाळीत समाविष्ट होऊ लागले आहेत. एकूणात हॉटेलिंगचा नवा ट्रेण्ड, नवी बाजारपेठ भारतीय पदार्थांनी निर्माण केलीय. जगभरात इंडियन फूड लोकप्रिय करण्यासाठी या बदलाचा फार मोठा हातभार लागणार आहे. हैदराबाद येथे करण्यात आलेल्या एका सर्व्हेक्षणात तर असे आढळून आलंय की डॉमिनोजच्या पिझ्झाला मागे टाकत हैदराबादी बिर्याणीला नागरिक अधिक पसंती देत असून लवकरच नाश्त्याच्या प्लेटमध्येही सर्वत्र बिर्याणी दिसण्याची शक्यता आहे. येत्या २-३ वर्षात सर्वत्र बिर्याणीच्या माध्यमातून जवळपास ५०० कोटींपेक्षा जास्तीची उलाढाल होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. यासंदर्भात बिर्याणी बाय किलोचे संस्थापक कौशिक रॉय यांनी म्हटलंय की, बिर्याणीत पो्रटिन्स, कार्बाेहायड्रेट्स भरपूर असतात. शिवाय चवीला अतिशय टेस्टी, त्यामुळे एक परिपूर्ण डिश म्हणून बिर्याणी हे इटलीच्या पिझ्झा आणि चीनच्या चायनीज नूडल्सला दमदार उत्तर ठरणार आहे. भारतात सध्या पार्सल संस्कृतीही झपाट्यानं विकसित होत आहे. हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा घरी निवांत बसून खाण्याकडे कल वाढतोय. यातूनच क्विक सर्व्हिस रेस्टॉरण्ट्सची संख्याही वाढतेय. बिर्याणीच्या बाबतीतही या रेस्टॉरण्ट्समध्ये पार्सलला मागणी वाढली आहे. या रेस्टॉरण्ट्समध्ये घरच्या चवीचे, भारतीय पारंपरिक पदार्थ फेवरिट आहेत. ६० टक्के लोकं घरी आणि ४० टक्के लोकं हॉटेलमध्ये बिर्याणी खाताहेत.भविष्यात ३० मीनिटात बिर्याणी पार्सल घरपोच देण्याचे उद्दिष्ट दिल्लीतील ‘बिर्याणी ब्ल्यूज’चे रेमण्ड अॅण्ड्रयूज यांनी बोलून दाखवले आहे. ते पुढे म्हणताय की आमच्या हॉटेलमध्ये अमेरिकन, चायनीज पदार्थांपेक्षा दालमाखनी, पावभाजी, छोले भटुरे, मसाला डोसा या पदार्थांनी त्यांच्या हॉटेलमध्ये लोकप्रिय पदार्थांच्या यादीत पहिले पाच क्रमांक पटकाविले आहेत. थोडक्यात भारतीय पाककलेत भरपूर मसाले असतात, खूप तेल-तूप असते असा एक आक्षेप नेहमीच नोंदवला जातो. परंतु भारतीय खाद्यसंस्कृतीइतका चव आणि पौष्टिकता यांचा संगम जगातील कोणत्याच खाद्यसंस्कृतीत आढळत नाही म्हणूनच ही संस्कृती जगभरात लोकप्रिय करण्यासाठी हा ट्रेण्ड खूप मोठी संधी आहे.