- मयूर पठाडेरोज आपण काय खातो? पिझ्झा, बर्गर, सॅँडविच, बटाटावडा, फ्रेंच फ्राईज, चिप्स, हॉट डॉग... असलं बरंच काही.. घरच्या जेवणापेक्षा बऱ्याचदा अशाच गोष्टींचा मारा आपण पोटावर करत असतो. यानं आपलं पोट भरतं का?, नक्कीच भरतं, पण खरंच असल्या अरबट-चरबट, जंक फूड, फास्ट फूड खाण्याचा आपल्या शरीराला काही उपयोग होतो का? - नाहीच, पण त्याची चटकच अशी िलागते की त्यानं राहवतच नाही. शिवाय आपल्या आजूबाजूचे मित्रमैत्रिणी भूक लागल्यावर आणि नाही लागली तरी पोटभरीसाठी येताजाता हेच तोंडात टाकत असतात. त्याचीच मग क्रेझ होते.पण ही सवय जर मोडायची असेल, आणि हेल्दी खाण्याची सवय जर आपल्याला लावायची असेल, तर काय केलं पाहिजे?तुम्ही म्हणाला, हे अरबट चरबट खाणं तुम्ही आम्हाला सोडायला सांगाल.. आमचं जाऊ द्या, पण सोशल मिडीयाचे तज्ञ आणि हेल्थ एक्सपर्ट यांनी एक अत्यंत हटके अभ्यास केला. हा अभ्यास सांगतो, तुम्हाला जर खाण्या-पिण्याच्या हेल्दी सवयी लावायच्या असतील तर सोशल साईट्सवर ‘फूड पॉर्न’ पाहा...घाबरू नका.. ‘फूड पॉर्न’ म्हणजे असली तसली कोणतीही गोष्ट नाही. तरुणांच्या जगात पॉप्युलर असलेली आणि नेट सॅव्ही तरुणांमध्ये हा शब्द सर्रास वापरला जातो आणि त्यांच्यात तो चांगलाच पॉप्युलरही आहे. ही एक न्यू-एज टर्म आहे.‘फूड पॉर्न’ म्हणजे खाण्यापिण्याच्या पदार्थांची अत्यंत आकर्षक पद्धतीने केलेली मांडणी आणि या पदार्थांची चित्रे.. तरुणाई सोशल मिडियावर पडीकच असते. या तरुणाईसमोर जर हे फूड पॉर्न सातत्यानं गेली, तर त्यांच्यात आहाराच्या चांगल्या सवयी लागण्याची शक्यता वाढू शकते असं हा अभ्यास सांगतो.विचार करा, आईस्क्रीमनं शिगोशिग भरलेला कोन आणि त्यातून वितळणारं आईस्क्रीम, पिझ्झावर टॉपअप केलेलं चिझ, केकवरुन ओघळणारं चॉकलेट.. असं काही पाहिल्यावर आपल्या तोंडाला पाणी सुटतं की नाही?हेल्दी फूड हॅबिट्सचंही असंच आहे. सोशल साईटवर पडिक असणाऱ्या किंवा त्यावर रोज नित्यनेमानं फेरफटका मारणाऱ्या तरुणाईसमोर जर ‘फूड पॉर्न’ वारंवार पडलं तर त्यांच्याही आरोग्याच्या सवयी सुधरू शकतात. त्यासाठी आरोग्यदायी आहाराच्या आकर्षक इमेजेस म्हणजेच ‘फूड पॉर्न’ जर तरुणाईला वारंवार दाखवल्या गेल्या, तर आपली आगामी पिढी नक्कीच सुदृढ बनेल असा या संशोधकांना विश्वास आहे.म्हणूनच कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे हे संशोधक सांगतात, ‘फूड पॉर्न’च्या या टेम्टिंग इमेजेस तरुणाईला दाखवाच.. आणि मग बघा.. काय फरक पडतो ते!