शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus: लस किंवा औषध नसतानाही बरा होतोय कोरोना?... माहित्येय का कसा?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 6:26 PM

1 / 10
चीनमध्ये हाहाकार उडवून दिल्यानंतर जगातील 163 देशांमध्ये कोरोना विषाणूने दहशत निर्माण केली आहे. चीन, इटली, इराण, स्पेनमधील कोरोनाबळींचा आकडा धडकी भरवणाराच आहे.
2 / 10
भारतात कोरोना बाधितांची संख्या 148 झाली आहे आणि त्यात महाराष्ट्रातील रुग्ण सर्वाधिक, म्हणजेच 42 आहेत, तर देशात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
3 / 10
कोरोनावर नेमकं असं औषधं किंवा लस नसल्यानं, रोज वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या पाहून प्रत्येकाच्याच मनात भीती आहे. घसादुखी, कोरडा कफ, ताप, डोकेदुखी, श्वसनास त्रास यापैकी एखादं जरी लक्षण दिसलं, तरी काही मंडळी घाबरत आहेत. परंतु, इतकं घाबरायचं खरंच कारण नाही.
4 / 10
जगाचा विचार केल्यास, 1 लाख 96 हजारांहून अधिक नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा झाली असली, तरी 81 हजारांहून अधिक जण ठणठणीत बरे होऊन हॉस्पिटलमधून घरीही गेलेत. भारतात 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय.
5 / 10
कोरोनावर ना कुठली लस आहे, ना औषध; मग हे रुग्ण बरे कसे होत आहेत, असा प्रश्न काही जणांना पडलाय. अशी कोणती शक्ती आहे, जी या रुग्णांना बरी करतेय, हे काहींना समजत नाहीए.
6 / 10
वास्तविक, आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी अनेक सूक्ष्म जीवांचे हल्ले परतवून आपला आजार पळवून लावत असतात. म्हणूनच, बऱ्याचदा सर्दी, खोकला, ताप किरकोळ असेल तर आपण औषधाविनाही बरे होते. कारण, या पांढऱ्या पेशींच्या ताकदीवर अवलंबून असलेली आपली रोगप्रतिकारकशक्ती.
7 / 10
कोरोनाचा विषाणू अन्य विषाणूंपेक्षा थोडा मोठा आहे आणि नवा आहे. तो प्राण्यांच्या शरीरातून आला आहे. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती चांगली असलेल्या व्यक्ती या विषाणूशी लढू शकतात. त्यांच्या शरीरात तो फार काळ टिकाव धरू शकत नाहीए.
8 / 10
म्हणूनच, ज्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्या व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने डॉक्टर प्रयत्न करतात. खोकला किंवा ताप असल्यास त्यावरची औषधं रुग्णांना दिली जातात. श्वास घ्यायला त्रास होत असेल तर व्हेंटिलेटर सपोर्ट दिला जातो. परंतु, त्या रुग्णाचं शरीर कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी तयार करणं, हाच मुख्य उद्देश असतो.
9 / 10
रोगप्रतिकारकशक्तीच्या जोरावर आणि योग्य वेळी उपचार मिळाल्यानंच हजारो रुग्ण कोरोना विषाणूवर मात करून बरे झालेत. त्यामुळे हात धुणं आणि स्वच्छता बाळगण्यासोबतच इन्युनिटी वाढवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. ही शक्ती फक्त कोरोनाच नव्हे, तर अनेक आजार आपल्यापासून दूर ठेवेल.
10 / 10
हिरव्या पालेभाज्या, कंद, फळं, हळद, बदाम, लसूण, सी व्हिटॅमिन देणारे लिंबू, आवळा, संत्री, ओट्स या पदार्थांचा आहारात समावेश करणं, योग्य प्रमाणात पाणी पिणं आणि कोवळी सूर्यकिरणं अंगावर पडू देणं खूप फायदेशीर ठरू शकतं. योगासनं आणि छंद जोपासूनही आपण मनाचं आरोग्य जपू शकतो.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस