शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: लस घेतल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू होण्याची किती धोका, ICMRच्या पहिल्या स्टडीमधून समोर आली अशी माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 6:44 PM

1 / 9
कोरोनाविरोधातील लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना विषाणूचा शरीरावर होणारा परिणाम घेण्यासाठी करण्यात आलेल्या संशोधनाचा एक नवा अहवाल समोर आला आहे. हा अहवाल आयसीएमआरने तयार केला आहे. कोरोनाविरोधातील लस घेतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या लोकांच्या जीनोम विश्लेषणावर आयसीएमआरचा हा अहवाल आधारलेला आहे.
2 / 9
आयसीएमआरचा हा अहवाल भारतातील असा पहिला अहवाल आहे जो लसीकरणानंतर बाधित झालेल्या लोकांचा अभ्यास करून तयार करण्यात आला आहे. ६७७ लोकांवर करण्यात आलेल्या या अभ्यासामध्ये लसीकरण झालेले बहुतांश लोक हे डेल्टा व्हेरिएंटमुळे बाधित झाल्याचे समोर आले आहे.
3 / 9
भारताच्या १७ राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामधून एकूण ६७७ लोकांची आरटी-पीसीआर चाचणी केली होती. त्यामधील सुमारे ४८२ लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे होती. तर उर्वरित २९ टक्के लोकांना लक्षणे नव्हती.
4 / 9
यामध्ये ६९ टक्के लोकांना ताप, ५६ टक्के लोकांना डोकेदुखी आणि मळमळणे, ४५ टक्के लोकांना खोकला, ३७ टक्के लोकांना गळ्यामध्ये खवखव २२ टक्के लोकांना वास आणि चव जाणे, ६ टक्के लोकांना जुलाब आणि ६ टक्के लोकांना श्वास घेण्यास त्रास आणि १ टक्के लोकांना डोळ्यांत जळजळ आणि डोळे लाल होण्यासारथी लक्षणे दिसून आली.
5 / 9
या संशोधनानुसार भारतातील दक्षिण, पश्चिम, पूर्व आणि उत्तर-पश्चिम क्षेत्रामध्ये मुख्यत्वेकरून डेल्टा आणि कप्पा व्हेरिएंटमुळे बहुतांश लोक बाधित झाले आहेत. तर उत्तर आणि मध्य क्षेत्रामध्ये अल्फा, डेल्टा आणि कप्पा या तीन व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. मात्र यामधील सर्वाधिक लोक (८६.०९ टक्के) हे डेल्टा व्हेरिएंटमुळे बाधित झाले आहेत.
6 / 9
दिलासादायक बाब म्हणजे या संशोधनामध्ये लसीकरणानंतर बाधित झालेल्यांचा मृत्यूदर खूप कमी दिसून आला आहे. संशोधनामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या लोकांपैकी ७१ जणांनी कोव्हॅक्सिन घेतली होती. तर ६०४ जणांनी कोविशिल्डचा डोस घेतला होता. दर दोन व्यक्तींनी चीनमध्ये तयार झालेली सिनोफार्म ही लस घेतली होती. या सर्वांपैकी केवळ ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
7 / 9
संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार लस घेतल्यानंतर कोरोनामुळे बाधित ९.८ टक्के लोकांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. तर केवळ ०.४ टक्के लोकांचा मृत्यू झाला. म्हणजेच कोरोनाविरोधातील लस ही विषाणूपासून सुरक्षा प्रदान करते हे स्पष्ट झाले. तसेच लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यूचा धोकाही कमी होतो.
8 / 9
WHO च्या म्हणण्यानुसार केवळ लसच कोरोनाच्या व्हेरिएंटपासून लोकांना वाचवू शकते. डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांना प्रसारमाध्यमांशी संवात साधताना सांगितले की, अत्यंत संक्रामक असलेला डेल्टा व्हेरिएंट वेगाने फैलावत आहे आणि रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची बहुतांश गरज ही जिथे लसीकरणाचा रेट कमी आहे, अशाच ठिकाणी दिसून येत आहे.
9 / 9
दरम्यान, डॉ. स्वामिनाथन यांनी इशारा देताना सांगितले की, लसीकरण केलेले लोक जरी सुरक्षित झालेले असले तरी ते संसर्ग ट्रांसमिट करू शकत नाहीत असे नाही, अशा लोकांमध्ये कुठलेच लक्षण दिसून येत नाही. त्यामुळे असे लोक लोकांमध्ये जाऊन सहजपणे संसर्गाचा फैलाव करू शकतात.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याIndiaभारतHealthआरोग्य