शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दुखण्यावर घेऊ नका सतत गोळी जाईल किडनीचा बळी, पाहा काय आहेत लक्षणं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 1:11 PM

1 / 9
वेदनाशामक औषधींचे सततचे सेवन हे किडनी निकामी होण्याचे प्रमुख कारण आहे. अनेकजण लहान-सहान दुखीवर वेदनाशामक गोळ्या घेतात. पण या गोळ्यांच्या सततच्या सेवनाने किडनी निकामी होते.
2 / 9
गोळ्या डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय मिळत असल्या तरी त्या वापरताना सावधानता बाळगायला हवी. सतत वेदनाशामक गोळ्या घेतल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम शरीरातील इतर अवयांपेक्षा मूत्रपिंडावर होतो. त्यामुळे दुखणे कशाचे आहे, हे तपासून उपचार करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
3 / 9
वारंवार लघवीला जाणं, लघवीला जळजळ होणं, लघवी पूर्णपणे न होणं, पोटाच्या खालच्या भागात दुखणं, थंडी-ताप येणं किंवा लघवीतून पू-रक्त येणं. या आजारावर योग्य वेळेत आणि योग्य उपचार करणं जरूरी असतं. जेणेकरून किडनीचं कार्य कमी होण्याचा किंवा रक्तात जंतुसंसर्ग पसरण्याचा धोका कमी होतो.
4 / 9
सर्वसामान्यांमध्ये स्वतःच्या शरीराबद्दल, शरीरातील अवयवांच्या कार्याबद्दल अत्यंत कमी माहिती असते. त्यामुळे आजाराची लक्षणे लवकर लक्षात येत नाहीत. उच्च रक्तदाब हे किडनीच्या आजाराचे एक महत्त्वाचे लक्षण असू शकते. रक्तातील अशुद्धता दूर करणे हे किडनीचे महत्त्वाचे कार्य आहे.
5 / 9
याचबरोबर रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे, हिमोग्लोबिन निर्मिती, हाडे बळकट राखण्याचे कामही किडनी करते. त्यामुळे वर्षातून एकदा रक्तदाब व लघवी तपासून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ॲनिमिया झाला असेल तर त्याची कारणेही शोधायला हवी. त्वचा कोरडी पडणे, खाज येणे, जेवण न जाणे या किडनीसंबंधी आजाराच्या काही पायऱ्या आहेत.
6 / 9
काही रुग्णांना एखाद्या गोळीनेही त्रास होतो. ॲस्पिरीनमुळे हृदय तसेच मेंदूकडे जाणाऱ्या वाहिन्यांत ब्लॉकेज निर्माण होतात. काही वेळा जठराला ओरखडे पडून रक्तस्त्राव होतो. दुखीसाठी देण्यात येणाऱ्या ‘कॉक्स टू इन्हिबीटर’मुळे मोठ्या आतड्यांमध्ये अल्सर झालेले रुग्ण उपचारासाठी येतात. काही गोळ्यांमुळे मूत्रपिंडावर प्रभाव पडतो, असे मूत्रपिंडविकार तज्ज्ञ डॉ. सुधीर केणी यांनी सांगितले.
7 / 9
वेदनाशामक गोळी आजार बरा करीत नाही. शरीरातील एखादा अवयव दुखू लागला की तेथून मेंदूला रसायनांच्या माध्यमातून संदेश पाठविले जातात. पॅरासिटेमॉल असलेल्या गोळ्या मेंदूकडे येणारे व तेथून जाणारे वेदनेचे संदेश अडविण्याचे काम करतात आणि त्यामुळे वेदना होत असल्याचे लक्षात येत नाही. आयबुप्रोफेन असलेल्या गोळ्या वेदना होत असलेल्या ठिकाणी काम करतात. वेदना उत्पन्न करणाऱ्या रसायनांवर नियंत्रण ठेवून दाह कमी होतो. वेदनाशामक गोळ्यांमुळे फायदा होतो, पण काही वेळा गंभीर परिस्थितीही निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया मूत्रपिंडविकार तज्ज्ञ डॉ. गौरव राणावत यांनी दिली.
8 / 9
मूत्रपिंडाचे आजार लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. माहितीच्या अभावामुळे आजाराचे निदान व उपचार यामध्ये झालेला उशीर आजारातील गुंतागुंत वाढवण्यास कारणीभूत ठरतो. लहान मुलांची शरीररचना व शरीर प्रक्रिया प्रौढांपेक्षा बरीच वेगळी असते. त्यामुळे बालपणातील व प्रौढ वयातील मूत्रपिंडाचे विकार, त्यामागील कारणे आणि त्यावरील उपचार यात बरेच अंतर आहे.
9 / 9
प्रौढांमधील मूत्रपिंड विकाराचा उगम प्रामुख्याने मधुमेह, रक्तदाब यापासून सुरू होतो. परंतु बाल वयात हे दोन आजार क्वचितच आढळून येतात. बाल वयात आनुवंशिक आजार, जन्मजात व्यंग, जंतूसंसर्ग, नेफ्राटिक सिंड्रोम ग्लोमेरुलोनेफ्रायटिस हे मूत्रपिंड विकारास प्रामुख्याने कारणीभूत होतात.
टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर