शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 1:32 PM

1 / 6
ऋजुता दिवेकर आपल्या सोशल मीडियाच्या हॅन्डलवरून आपल्या चाहत्यांशी सतत संवाद साधत असतात. आरोग्याशी संबंधित सकस पर्याय सुचवतात. आहार, विहाराचे महत्त्व सांगतात. कोणत्या ऋतूमध्ये कोणता आहार घ्यावा हेही सांगतात. अलीकडेच त्यांनी वाढत्या उन्हाळ्यावर रामबाण म्हणून तीन घरगुती उपाय सांगितले आहेत.
2 / 6
ऋजुता दिवेकरांचा जास्तीत जास्त भर हा लोकल फूड अर्थात स्थानिक विक्रेत्यांकडून भाजी-पाला-फळं घेण्याकडे कल असतो. ऋतूनुसार बाजारात आलेली फळं खा, हा त्यांचा सल्ला असतो. एवढंच काय, तर वजन वाढेल या भीतीने आंबा न खाणाऱ्या लोकांनाही त्यांनी बिनधास्तपणे आंब्याचा आस्वाद घ्या सांगितले आहे. त्याबद्दल माहिती त्यांच्या हॅन्डल्सवर मिळेलच! इथे आपण पाहणार आहोत, त्यांनी सांगितलेला SST फॉर्म्युला! SST अर्थात स्वस्त, सुंदर आणि टिकाऊ!उन्हाळ्यात या तिन्हींचा मेळ कोणत्या माध्यमातून बसवायचा ते पाहू.
3 / 6
उन्हाळ्यात आपला सगळा फोकस आंब्यावर असतो. पण याच काळात आणखीही सुमधुर फळं बाजारात येतात. कलिंगड, खरबूज, जांभळं, शहाळं! यातच शहाळ्याचं मिनी स्वरूप असलेला ताडगोळा उन्हाचा दाह शांत करणारा ठरतो. बाजारात अनेक विक्रेते पानाच्या पुरचुंडीत ताडगोळे बांधून विकतात. शहाळ्याप्रमाणे ताडगोळ्याची प्रकृती थंड असल्याने शरीराला त्याचे अनेक लाभ होतात. सोलून घेतलेला ताडगोळा हातात धरला असता, जेली किंवा काळीज हातात धरल्याचा भास होतो आणि जिभेवरून पोटात गेल्यावर गारेगार वाटतं!
4 / 6
उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ खावेसे काय तर बघावेसेही वाटत नाहीत. खाल्ले तरी ते पचत नाहीत. जळजळ, पोटदुखी, वात, जुलाब असे विकार होतात. म्हणून आपल्या प्रकृतीला मानवेल असा दहीभात रोज आहारात समाविष्ट करावा. आपले पूर्वज जेवणाचा शेवट दहिभाताने करायचे. नव्हे तर, जेवण पूर्ण झाल्याची ती खूण असायची. दही भातात फोडणी घालून दही बुत्ती हाही प्रकार केला जातो. पण तेही करायचं नसेल तर छान वाफाळता भात, कवडीचं गार दही, चवीनुसार मीठ घालून, तोंडी लावायला लोणचं घेऊन दही भाताचा आस्वाद घ्या. पोट शांत राहील.
5 / 6
गुलकंद न आवडणारी व्यक्ती दुर्मिळच! मात्र चमचाभर गुलकंद थेट तोंडात न टाकता पेलाभर पाण्यात टाका. गुलकंद विरघळू द्या. तळाशी राहिलेल्या पाकळ्या मस्त चावून खा. रोज रात्री झोपण्यापूर्वी गुलकंदाचं पाणी प्या. यामुळे तुमचा दिवसभराचा क्षीण जाईल, प्रकृती उत्तम राहील आणि शांत झोप लागेल.
6 / 6
तर असा हा SST फॉर्म्युला स्वस्त, सुंदर आणि मस्त आहे की नाही? चला तर आजपासूनच या तिन्ही गोष्टींचा वापर सुरु करूया आणि वाढत्या उन्हाळ्यातही निरोगी राहूया.
टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलHealth Tipsहेल्थ टिप्स