शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जीवघेणा म्युकोरमायकोसिस आताच का फोफावतोय? खुद्द एम्सच्या संचालकांनी दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 6:09 PM

1 / 15
संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाने अनेकांचे बळी घेतले आहे. यातच आता म्युकोरमायकोसिस अथवा काळ्या बुरशीचा संसर्ग, या रोगानेही तोंड वर कढून भयाचे वातावरण निर्माण केले आहे. यातच म्युकोरमायकोसिसचा हवा, माती आणि अन्नातूनही प्रसार होऊ शकतो, अशी धक्कादायक माहिती खुद्द एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (AIIMS director Randeep guleria) यांनी दिली आहे. याच बरोबर तो आताच एवढ्या मोठ्या प्रमाणावर का फोफावत आहे, यावरही त्यांनी भाष्य केले. (Mucormycosis can spread through air, Soil and food also says AIIMS director Randeep guleria)
2 / 15
खरे तर, अशा प्रकारचा संसर्ग कोरोना पूर्वीही आढळून येत असे. मात्र, त्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. मात्र, आता कोरोनामुळे हा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फोफावताना दिसत आहे. कोरोना मधून बरे होत असलेल्या किंवा झालेल्या रुग्णांमध्ये सीएएम म्हणजे कोरोनाविषाणू रोगाशी संबंधित म्युकोरमायकोसिस होत असल्याचे आढळून आले आहे.
3 / 15
कोरोनाबाधितांना म्युकोरमायकोसिसचा अधिक धोका का? कोरोनावर उपचार करताना वापरलेल्या औषधांमुळे लिंफोसाइट्स म्हणजे प्रतिकारशक्तीचा घटक असणाऱ्या श्वेतपेशींची संख्या कमी होण्याची शक्यता असते. श्वेतपेशींचे तीन प्रकार असतात, त्यापैकी एक प्रकार रोगकारक जीवांपासून- जीवाणू, विषाणू, व परजीवी यांपासून शरीराचे रक्षण करतो. या पेशी कमी झाल्यामुळे लिंफोपेनिया स्थिती उद्भवते आणि यामुळे बुरशीजन्य संसर्गाला कोविड-19 रुग्णाच्या शरीरात शिरकाव करण्याची संधी मिळते. महत्वाचे म्हणजे, ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती व्यवस्थित काम करू शकत नाही, अशा लोकांना म्युकोरमायकोसिसची लागण होण्याची शक्यता अधिक असते.
4 / 15
ही बुरशी कोठे आढळते? म्युकोरमायकोसिससंदर्भात बोलताना एका पत्रकार परिषदेत डॉ. गुलेरिया म्हणाले, म्युकोरमायसीट्स नामक तंतुमय बुरशीचे तंतू म्युकोरमायकोसिसला कारणीभूत ठरतात. ते हवेत, मातीत, आणि अगदी अन्नातही आढळतात. हवेतील कवकधारी कनांच्या माध्यमातून ते शरीरात शिरकाव करू शकतात किंवा त्वचेला कापणे/भाजणे, अशी दुखापत झाली असल्यास ते त्वचेवरही आढळतात. या संसर्गाचे वेळेवर निदान झाल्यास, संभाव्य अंधत्व किंवा मेंदूचा संसर्ग टाळता येऊ शकतो.
5 / 15
मास्कला पर्याय नाही - म्यूकोरमायकोसिसपासून बचाव करण्यासंदर्भात गोलेरिया म्हणाले, मास्क घालण्याला पर्याय नाही. हवेतील बुरशीचे सूक्ष्मकण व तंतू नाकावाटे सहज शरीरात प्रवेश करू शकतात. यामुळे, संसर्गास अटकाव करण्याच्या दृष्टीने मास्क घालण्याचे महत्त्व दुपटीने वाढते. बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या/ तेथे भेट देणाऱ्या लोकांनी याकडे खासकरून लक्ष द्यायला हवे. एवढेच नाही, तर मास्क दररोज निर्जंतुकही करायला हवे. याच बरोबर, (ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरणाऱ्यांच्या बाबतीत) ह्युमिडीफायर म्हणजेच आर्द्रताजनक स्वच्छ ठेवणे व वेळोवेळी बदलणे आवश्यक आहे. तसेच, ह्युमिडीफायरच्या बाटलीत जंतुविरहित सामान्य सलाईन वापरले पाहिजे व ते दररोज बदलायला हवे, असेही गुलेरिया म्हणाले.
6 / 15
संसर्गाची लक्षणेही अवयवानुसार भिन्न - म्युकोरमायकोसिसचा मानवी शरीराच्या कोणत्या अवयवावर हल्ला होतो, यानुसार त्याचे प्रकार पडतात. या संसर्गाची लक्षणेही त्या-त्या अवयवानुसार भिन्न असतात. - नाकाच्या पोकळीशी व मेंदूशी संबंधित म्युकोरमायकोसिस- या बुरशीचे सूक्ष्मकण नाक अथवा श्वासाद्वारे शरीरात गेल्यास याचा संसर्ग होतो. याचा परिणाम नाक, डोळ्याची खोबण, तोंडाची पोकळी यांवर होतो. हा संसर्ग मेंदूपर्यंतही पसरू शकतो. याच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, नाक चोंदणे, नाकातून स्राव (हिरव्या रंगाचा) वाहणे, सायनसमध्ये वेदना, नाकातून रक्त येणे, चेहऱ्यावर सूज, चेहऱ्यावरील संवेदना नष्ट होणे व त्वचा डागाळणे यांचा समावेश होतो.
7 / 15
-फुफ्फुसांचा म्युकोरमायकोसिस- बुरशीचे सूक्ष्मकण श्वासावाटे शरीरात शिरून श्वसनसंस्थेत पोहोचतात तेव्हा त्यांचा फुफ्फुसांवर परिणाम होतो. ताप, छातीत दुखणे, खोकला, खोकल्यातून रक्त पडणे ही यायची लक्षणे आहे.
8 / 15
या बुरशीचा परिणाम जठर व आतडी, त्वचा आणि इतर अवयवांवरही होऊ शकतो मात्र, सर्वात जास्त आढळणारा प्रकार म्हणजे नाकाच्या पोकळीशी व मेंदूशी संबंधित म्युकोरमायकोसिस.
9 / 15
कोरोना बाधित रुग्णांनी अशी घ्यावी काळजी - मधुमेही (अनियंत्रित मधुमेह) + स्टेरॉइडचा वापर + कोविड पॉझिटिव्ह - या तिन्हींचे एकत्र अस्तित्व असल्यास रुग्णाला म्युकोरमायकोसिस संसर्गाचा धोका उत्पन्न होतो. म्हणून, मधुमेहींनी त्यांच्या रक्तशर्करेची पातळी सातत्याने लक्ष देऊन नियंत्रित ठेवायला हवी.
10 / 15
करोनाची सौमय लक्षणे असलेल्यांनी स्टेरॉइड घेणे टाळावे - स्टेरॉईड्सचा गैरवापर झाल्याने व्यक्तीच्या रोगप्रतिकारशक्तीवर थेट परिणाम होतो. यामुळे काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कोविडचा सौम्य संसर्ग असणाऱ्या रुग्णांनी स्टेरॉईड्स घेणे टाळलेच पाहिजे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवरील उपचारांमध्ये स्टेरॉईड्सचा काहीही उपयोग होत नाही. तर दुसरीकडे, स्टेरॉईड्स घेण्याने म्युकोरमायकोसिससारखे दुसरे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. कोविडमधून बरे झाल्यावरही बुरशीजन्य संसर्गाचा मोठा धोका स्टेरॉईड्स वापरण्याने निर्माण होतो. म्हणून, एखाद्या कोरोना बाधित व्यक्तीची रक्तातील प्राणवायूची पातळी सामान्य असेल आणि ती वैद्यकीय दृष्ट्या सौम्य लक्षणगटात मोडत असेल तर स्टेरॉईड्सचा वापर पूर्णपणे टाळलाच हवा.
11 / 15
स्टेरॉईड्स घेणाऱ्यांनी त्यांची रक्तशर्करा पातळी नित्यनियमाने तपासत राहिली पाहिजे. बहुतेक वेळा, मधुमेह नसणाऱ्या व्यक्तीची रक्तशर्करा पातळी स्टेरॉईड्स घेतल्यावर मोठ्या प्रमाणात वाढून 300 ते 400 पर्यंत पोहोचू शकते. म्हणून, अशा व्यक्तीची शर्करा पातळी सातत्याने तपासणे व त्यावर लक्ष ठेवणे अत्यावश्यक ठरते.
12 / 15
हाती असलेल्या आकडेवारीनुसार, स्टेरॉईड्स जास्तीत जास्त 5 ते 10 दिवसांसाठीच दिले पाहिजे. शिवाय, स्टेरॉईड्स रक्तशर्करा वाढवून ठेवतात आणि तिच्यावर नंतर नियंत्रण मिळविणे फार कठीण जाते. परिणामी, बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका वाढतो, असेही डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.
13 / 15
किरकोळ लक्षणांकडेही दुर्लक्ष नको - नाक व डोळ्यांभोवती लालसरपणा आणि वेदना, ताप (सामान्यतः कमी), नाकातून रक्त येणे, नाक किंवा सायनसचा भाग चोंदणे, डोकेदुखी, खोकला, श्वासाची लांबी कमी होणे, उलटीतून रक्त पडणे, मानसिक स्थिती बदलणे, आणि आंशिक दृष्टिहीनता
14 / 15
डॉक्टर्स आणि अन्य आरोग्य सेवा कर्मचारी यांची जबाबदारी- कोविड -19 रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठविताना म्युकोरमायकोसिसच्या प्रारंभिक लक्षणांविषयी माहिती द्या, उदा- चेहऱ्याशी संबंधित वेदना, चोंदणे, अतिरिक्त स्राव, दात सैल होणे, छातीत दुखणे आणि श्वास अपुरा पडणे.
15 / 15
गेल्या आठवड्यातील एका पत्रकार परिषदेत एम्सचे संचालक डॉ.रणदीप गुलेरिया यांनी या रोगाच्या वाढत्या प्रमाणाबद्दल माहिती विशद केली. “पूर्वी म्युकोरमायकोसिस हा रोग सर्वसाधारणपणे डायबिटीस मेलिटस असणाऱ्या - म्हणजे ज्या रुग्णांमध्ये रक्तशर्करेची पातळी अत्यधिक आहे अशा- रुग्णांमध्ये आढळून येत होता. केमोथेरपी चालू असणारे कर्करोगाचे रुग्ण, अवयवरोपण झालेल्या व्यक्ती आणि इम्युनोसप्रेसंट्स (प्रतिकारशक्तीला दुर्बल करणारी औषधे) घेणाऱ्या व्यक्तींनाही हा रोग होत असे. परंतु आता करोना आणि त्यावरील उपचारांमुळे म्युकोरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे.
टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसAIIMS hospitalएम्स रुग्णालयdoctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल