शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tokyo Olympics: भारताच्या ऐतिहासिक यशाचे पाच हिरो, ज्यांनी संपवला ऑलिम्पिकमधील ४१ वर्षांपासूनचा पदकाचा दुष्काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 1:50 PM

1 / 8
भारतीय पुरुष हॉकी संघाने आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत जर्मनीवर ५-४ ने मात करत तब्बल ४१ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवले. भारतीय हॉकी संघाने तिसरा क्रमांक पटकावत कांस्यपदकावर कब्जा केला.
2 / 8
भारतीय हॉकी संघाने १९८० मध्ये ऑलिम्पिकमधील शेवटचे सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर भारताला एकाही ऑलिम्पिक स्पर्धेत पदकावर नाव कोरता आले नव्हते. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताने जबरदस्त कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र उपांत्य फेरीत भारताला २-५ ने पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले होते. मात्र आज जर्मनीला मात करत भारताने कांस्यपदकावर नाव कोरले. भारताच्या या ऐतिहासिक विजयात पाच खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. ते पुढीलप्रमाणे.
3 / 8
भारत आणि जर्मनीमध्ये झालेल्या या लढतीत भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीने गोल केला. त्यानंतर भारताने पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश मिळाले नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीने वर्चस्व राखले. मात्र दुसऱ्या क्वार्टरमधील काही मिनिटांमध्येच भारताकडून सिमरनजीत सिंगने गोल करून भारताला बरोबरी साधून दिली.
4 / 8
दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी एकापाठोपाठ एक असे गोल केले. यादरम्यान, भारताने तीन तर जर्मनीने दोन गोल केले. जर्मनीने दोन मिनिटांच्या आत दोन गोल करून भारतावर ३-१ अशी आघाडी घेतली. मात्र भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केले. यादरम्यान हार्दिक सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताची पिछाडी २-३ अशी कमी केली.
5 / 8
हार्दिक सिंगनंतर भारतासाठी तिसरा गोल हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला ३-३ अशी बरोबरी साधून दिली. अशाप्रकारे या क्वार्टरमध्ये एकूण ५ गोल झाले.
6 / 8
तिसऱ्या क्वार्टरला सुरुवात झाल्यावर भारताने अधिकच आक्रमक पवित्रा घेतला. रूपिंदर पाल सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करून भारताला ४-३ असे आघाडीवर नेले.
7 / 8
रुपिंदरपाल सिंगने गोल केल्यानंतर केवळ पाच मिनिटांनीं सिमरनजीत सिंगने गोल करून भारताची आघाडी ५-३ अशी वाढवली. सिमरनजीतचा हा सामन्यातील दुसरा गोल होता. त्यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीच्या विंडफेडर याने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. मात्र भारताने अखेरपर्यंत आपली आघाडी आणि ५-४ अशी टिकवली आणि सामन्यावर कब्जा केला.
8 / 8
या सामन्यात जर्मनीने चार गोल केले असले तरी भारताचा गोलरक्षक श्रीजेशचे गोलरक्षण भारताच्या यशात महत्त्वपूर्ण ठरले. श्रीजेशने सामन्यातील शेवटच्या काही सेकंदात जर्मनीचे आक्रमण थोपवून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
टॅग्स :india at olympics 2021भारत ऑलिंपिक 2021Hockeyहॉकी