शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेने चीन युद्धावेळी दगा दिलेला; आता आपणहून महाविनाशक बॉम्‍बर घेऊन भारतीय आकाशात आला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 4:51 PM

1 / 9
भारतीय शहर बंगळुरूमद्ये सध्या आशियाचा सर्वात मोठा एअर शो एअरो इंडिया २०२३ सुरु झाला आहे. यामध्ये जगभरातील शेकडो कंपन्यांनी भाग घेतला आहे. या शोमध्ये सर्वाधिक चर्चा अमेरिकेच्या हवाई ताकदीची होत आहे. भारत जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्रे खरेदीदार आहे, परंतू त्याने अमेरिकेच्या लढाऊ विमानांपासून चार हात लांब राहणेच पसंद केले आहे. याच अमेरिकेची लढाऊ विमाने आज भारतीय आकाशात घिरट्या घालत आहेत.
2 / 9
अनेक दिवसांपासून अमेरिका भारताला आपल्या गोटात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, पण आजपर्यंत भारत बाजूलाच राहिला आहे. भारताला आपले गिऱ्हाईक बनविण्यासाठी आणि चीनला डिवचण्यासाठी अमेरिकेने जगातील सर्वात शक्तीशाली विमान महाविनाशक B-1B बॉम्‍बर आणले आहे. तसेच रडारच्या कक्षेत न येणारे एफ-35, एफ-18 ही लढाऊ विमाने पाठविली आहेत.
3 / 9
या विमानांद्वारे अमेरिका एका बाणात अनेक शिकार करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने आपल्या हवाई ताफ्यात बहुतांश पाश्चिमात्य देशांच्या लढाऊ विमानांचा समावेश केला आहे. काही रशियन आहेत. फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. परंतू भारताने आजवर एकही अमेरिकी लढाऊ विमान घेतलेले नाही.
4 / 9
भारतीय हवाई दल अमेरिकेचे Sikorsky हेलिकॉप्टर, AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टर आणि CH-47 चिनूक हेलिकॉप्टर वापरते. भारतीय हवाई दल C-130 हरक्यूलिस आणि C-17 वाहतूक विमानांचा मोठ्या प्रमाणावर वापर करते. ही सर्व अमेरिकेचीच विमाने आहेत. परंतू यात एकही लढाऊ विमान नाही.
5 / 9
अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनी लॉकहीड मार्टिनने भारताला डोळ्यासमोर ठेवून F-21 नावाचे वेगळे लढाऊ विमान विकसित केले आहे. F-35 नंतर आता अमेरिकेने आपले B-1B लान्सर बॉम्बर मंगळवारी बेंगळुरूला पाठवले आहे. बोन या नावाने ओळखले जाणारे हे बॉम्बर अमेरिकन हवाई दलातील पारंपरिक शस्त्रे वाहून नेणारे सर्वात मोठे विमान आहे. अमेरिकन बॉम्बर्सने अँडरसन एअर फोर्स बेस ग्वाम येथून उड्डाण केले आहे.
6 / 9
एरो इंडिया 2023 मध्ये अमेरिकेच्या सुपर-विध्वंसक बॉम्बरचे आगमन हे दर्शवते की भारतासोबतची अमेरिकेची धोरणात्मक भागीदारी किती महत्त्वाची आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. B1B बॉम्बर हे लांब पल्ल्याचे सुपरसॉनिक बॉम्बर आहे. अनेक तासांच्या सततच्या उड्डाणानंतर ते भारतात पोहोचले आहे. हे बॉम्बर आणि F-35 लढाऊ विमान पाठवून अमेरिकेने चीन व रशियाला मोठा संदेश दिला आहे.
7 / 9
भारतीय पॅसिफिक प्रदेशात चीनच्या वाढत्या ठामपणाला आळा घालण्यासाठी अमेरिकेने हे बॉम्बर ग्वाममध्ये तैनात केले आहेत. अमेरिकेला आपली लढाऊ विमाने भारताला विकायची आहेत. अमेरिकन फायटर F-18 भारतीय नौदल आणि F-35 वायुसेनेच्या ताफ्यात येऊ शकते. भारत ते विकत घेणार की नाही याबाबत काहीही स्पष्ट नसले तरी.
8 / 9
विश्लेषकांच्या मते, अमेरिकेच्या कठोर नियमांमुळे आणि पाकिस्तानला F-16 लढाऊ विमाने दिल्याने भारत हे टाळत आहे. एवढेच नाही तर भारताचा अमेरिकेवरही विश्वास नाही.
9 / 9
1962 मध्ये चीनसोबतच्या युद्धादरम्यान भारताने लढाऊ विमाने आणि इतर शस्त्रे मागितली होती. अमेरिकेने रडार आणि वाहतूक विमाने दिली पण फायटर जेट देण्यास नकार दिला होता. परंतू त्याचवेळी पाकिस्तानला F-104 स्टार लढाऊ विमाने दिली होती.
टॅग्स :Americaअमेरिकाchinaचीन