शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...आणि या शेतकऱ्याने दोन देशांची सीमारेषाच बदलली, यंत्रणांची धावाधाव, कारण वाचून म्हणाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 6:16 PM

1 / 9
शेतकरी साधारणपणे आपल्या शेतीच्या कामात गुंतलेले असतात. मात्र एका शेतकऱ्याने शेतात वावरत असताना चक्क दोन देशांची सीमारेषाच बदलल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. बेल्जियममधील या शेतकऱ्याने केलेल्या कृतीमुळे तो सध्या जगात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र आपल्या कृतीमुळे दोन देशांमधील सीमारेषा बदलल्याचे या शेतकऱ्याच्या गावीही नाही.
2 / 9
सीएनएनने दिलेल्या एका रिपोर्टनुसार ही घटना फ्रान्स आणि बेल्जियममधील सीमारेषेवरील आहे. तसेच बेल्जियमच्या सीमेवरील शेतकऱ्याने ही चूक केली आहे. या शेतकऱ्याच्या शेतात जाणाऱ्या रस्त्यावर एक दगड होता. मात्र शेतात ये जा करताना त्रास होत असल्याने या शेतकऱ्याने हा दगड जागेवरून सरकवून बाजूला केला. मात्र हा दगड फ्रान्स आणि बेल्जियममधील सीमारेषा दर्शवणारा दगड होता हे या शेतकऱ्याला माहिती नव्हते.
3 / 9
शेतकऱ्याने हा दगड ज्या भागात सरकवला तो फ्रान्सचा भाग होता. म्हणजेच या शेतकऱ्याने फ्रान्सची जमीन कमी केली आणि बेल्जियमची जमीन वाढवली. शेतकऱ्याने हा दगड मूळ जागेपासून सुमारे ८ फूट आतल्या बाजूने सरकवला.
4 / 9
एक स्थानिक इतिहास तज्ज्ञाने जंगलात फिरताना दोन देशांमधील सीमा दर्शवणारा दगड सरकलेला असल्याचे पाहिले, तेव्हा या घटनेचा उलगडा झाला. त्यानेच याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर येथे अधिकाऱ्यांची गर्दी झाली.
5 / 9
मिळालेल्या माहितीनुसार हा दगड शेतात जाताना संबंधित शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरच्या मार्गात येत असे. त्यामुळे या दगडामुळे हा शेतकरी त्रस्त होता. अखेर त्याने हा दगड वाटेतून हटवला.
6 / 9
दरम्यान, या घटनेची जगभरात चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशांकडून याबाबत अधिकृत वक्तव्य जारी झाले आहे. बेल्जियममधील संबंधित भाग एरक्वेलाइन्सचे महापौर डेव्हिड लाव्हॉक्स यांनी हसत सांगितले की, त्या शेतकऱ्याने बेल्जियमला मोठा आणि फ्रान्सला लहान देश बनवले. मात्री ही चांगली कल्पना नाही. मात्र माझं शहर मोठं झाल्याने मी खूश होतो.
7 / 9
तर फ्रान्सच्या स्थानिक महापौरांनी सांगितले की, आम्ही एका नव्या सीमावादापासून वाचण्यात यशस्वी ठरू. तसेच या प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल. आता या शेतकऱ्याला तो दगड मूळ जागी ठेवण्यास सांगण्याचा बेल्जियमच्या स्थानिक अधिकाऱ्यांचा विचार आहे.
8 / 9
बेल्जियमच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित शेतकऱ्याने आमचे म्हणणे ऐकले नाही तर त्याच्यावर कारवाई करण्यात येऊ शकते. तसेच हा विषय बेल्जियमच्या परराष्ट्र मंत्रालयाकडेही जाऊ शकतो. त्यामुळे १९३० पासून निष्क्रिय असलेला फ्रेंको-बेल्जियम सीमा आयोग पुन्हा सक्रिय होऊ शकतो.
9 / 9
फ्रान्स आणि बेल्जियममध्ये सुमारे ६२० किमी लांब सीमारेषा आहे. वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा पराभव झाल्यानंतर १८२० मध्ये ही सीमारेषा आखली गेली होती. तसेच या शेतकऱ्याने जो दगड हटवला तो १८१९ मध्ये स्थापित करण्यात आला होता.
टॅग्स :FarmerशेतकरीFranceफ्रान्सInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके